म्हणून भारतातला हा जिल्हा १५ नाही तर १८ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो…

१५ ऑगस्ट १९४७ ला देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला आणि देशाला स्वतंत्र मिळालं. तेव्हापासून देशभरात सगळीकडे १५ ऑगस्ट मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदाचा ७५ वा स्वातंत्र दिन अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच देशाच्या कानाकोपऱ्यात जय्यत तयारी सुरु झालीये.

पण, देशाचा एक भाग असाही आहे, जो १५ ऑगस्ट नाही तर १८ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

तो भाग म्हणजे पश्चिम बंगालचा नादिया जिल्हा. जो आजही १८ ऑगस्ट देशाचा स्वातंत्रदिन साजरा करतात.

यामागचं कारण म्हणजे १९४७ ची फाळणी. जेव्हा ब्रिटिश भारत सोडून जात होते, तेव्हा देशाचे अनेक भाग भारतीय संघराज्याचा भाग नव्हते. स्वातंत्र्याच्या वेळी होत असलेल्या फाळणीच्या प्रक्रियेमुळे अनेक क्षेत्रांमध्ये संभ्रम होता कि, ते भारताचा भाग होतील कि पाकिस्तानचा. असचं काही नादिया जिल्ह्याच्या बाबतीतही घडली.

तर १२ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचे रेडिओवर सांगण्यात आले. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात भारताच्या स्वातंत्र्याविषयी रेडिओवर झळकलेल्या बातम्यांमध्ये असे म्हटले होते की, नादिया जिल्ह्याचा पाकिस्तानमध्ये समावेश केला जात आहे. रेडिओवर या बातमीनंतर हिंदूबहुल नादिया परिसरात बंड पेटलं.

खरं तर हे सगळं प्रशासकीय चुकीमुळं घडलं होत. ही चूक  होती सर रॅडक्लिफ यांची, ज्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनाच्या रेषा आखल्या होत्या. रॅडक्लिफने चुकीचा नकाशा बनवला होता, ज्यामुळे नादिया जिल्हा भारताऐवजी पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आला होता.

पाकिस्तानच्या लोकांनी इथल्या लोकांच्या मालमत्तेवर कब्जा करण्यास सुरुवात केली. त्या अस्थिर परिस्थितीमध्ये, कृष्णानगरच्या महाराणी ज्योतिर्मय देवी, श्यामा प्रसाद मुखर्जी, काबू लाहिरी यांच्या नेतृत्वाखाली या दोन विभागांना भारतात समाविष्ट करण्यासाठी चळवळ सुरू झाली. कारण फाळणीच्या मसुद्यात, हिंदू बहुसंख्य क्षेत्रे भारत आणि मुस्लिम बहुल पाकिस्तानच्या अंतर्गत असतील, असे ठरवण्यात आले होते.

मात्र, स्वातंत्र्यापूर्वी नादियामध्ये कृष्णानगर सदर, मेहेरपूर, कुष्टीया, चुआडंगा आणि रानाघाट असे पाच उपविभाग होते. हे सर्व क्षेत्र पूर्व पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले.

ही बातमी पसरल्यानंतर नादियामध्ये खळबळ उडाली आणि दोन दिवस परिसरात दंगल उसळली. ब्रिटिश सरकारच्या निर्णयाच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. इथल्या महिलांनी दोन दिवस त्यांच्या घरात चुल्ही पेटवली नव्हती. ब्रिटिश राजवटीच्या निर्णयाविरोधात बहुतांश लोक रस्त्यावर उतरले. एकप्रकारे येथे दोन धर्मांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली.

दरम्यान, नादिया जिल्ह्यातील मुस्लिम पाकिस्तानात सामील होण्याच्या बातमीने खुश होते. मुस्लिम लीगच्या काही नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसह कृष्णनगर सार्वजनिक वाचनालयात पाकिस्तानी झेंडे फडकवले होते. या नेत्यांनी रॅली काढून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पण नादिया जिल्ह्यातील परिस्थिती खूपच बिकट झाली.

लोकांचा उठाव इतका वाढला की, ब्रिटिश सरकारला या जनतेच्या आक्रोशापुढं झुकावं लागलं आणि त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. जेव्हा नादियाच्या घटनांची बातमी देशाचे शेवटचे व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटन यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी त्वरित कारवाई केली आणि रॅडक्लिफ यांना चूक सुधारण्याचे आदेश दिले. यानंतर नादिया जिल्ह्यातील राणाघाट, कृष्णनगर आणि करीमपूरचे शिकारपूर भारतात सामील झाले.

याच सुधारणेच्या प्रक्रियेस थोडा वेळ लागला आणि १७ ऑगस्टच्या मध्यरात्री भारतात नादिया जिल्ह्याचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली.

नवीन निर्णयानंतर, १८ ऑगस्ट रोजी कृष्णनगर लायब्ररीमधून पाकिस्तानचा झेंडा खाली करण्यात आला. तेथे भारतीय तिरंगा फडकवण्यात आला.

अशा प्रकारे, नादियाच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये स्वातंत्र्याचा पहिला उत्सव १८ ऑगस्ट १९४७ ला साजरा होऊ शकला.

भारतीय राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ बनवलेल्या पूर्वीच्या कायद्यानुसार, सामान्य नागरिक २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टलाच भारतीय ध्वज फडकवू शकत होते. १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नादिया जिल्ह्याच्या लढ्याची आठवण म्हणून स्वातंत्र्य सेनानी प्रमथनाथ शुकुल यांचे नातू अंजन शुकुल यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आव्हान दिले.

पण हा ध्वजारोहण कायदा त्यांच्या आड आला. त्यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर १९९१ साली केंद्र सरकारने १८ ऑगस्ट रोजी त्यांना नदीत ध्वज फडकवण्याची परवानगी दिली. तेव्हापासून १८ ऑगस्टला नादिया जिल्हा आणि त्या अंतर्गत शहरांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जाऊ लागला. 

हे ही  वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.