गोऱ्यांची मक्तेदारी मोडत ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा करणं भारतामुळेचं शक्य झालंय !

एक गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलाने वाली हो…. चाहे गोरी हो या…..थांबा.. पुढचं बोलत नाही.. कारण घात केलाय गोऱ्यानी आपला, चहा पाजून पाजून..

संध्याकाळच्या निवांत वेळी कडक चहा आणि समोसा असं परफेक्ट कॉम्बिनेशन ठरलेलं असत. चहा शिवाय आपला दिवस सुरु होत नाही. रोजच्या जीवनात चहा हा पाहिजेच. मग ते मित्रांसोबत सुट्टा (सिगरेट) घेताना असो नाहीतर कांदा पोह्यांचा कार्यक्रम असो. चाय नहीं तो कुछ नहीं.

त्यामुळंच चहा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. चहाला आज जे काही स्थान भारतात मिळतंय ना त्याला एकमेव कारण म्हणजे आपले लफंगे ब्रिटिश बंधू आहेत. त्यांनी भारतावर तर आक्रमण केलच पण सोबतच चहाचा प्याला पण आपल्या गळी उतरवला.

पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे भारताने या चहाचं महत्व जगभरात पोहचवून ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा करायला भाग पाडलं.

पण यात एक विषय आहे तो म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ नक्की असतो कधी ?  १५ डिसेंबर की  २१ मे… 

तर १५ डिसेंबर २००५ साली ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवसा’ची सुरूवात नवी दिल्ली येथे झाली होती. त्यानंतर हा दिवस श्रीलंकेत साजरा केला गेला. तिथून तो जगभरात साजरा केला जाऊ लागला. भारत, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, टांझानिया व्यतिरिक्त इतर अनेक देश १५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करायला लागले. 

पुढे भारताला असं वाटलं कि जगभरात हा ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा झाला पाहिजे. 

यासाठी मिलान येथे चार वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय खाद्य आणि कृषी संघटनेने (एफएओ) आंतरसरकारी गटाच्या बैठकीत भारताने असा एखादा दिवस असावा असा प्रस्ताव मांडला होता. 

ग्रामीण अर्थव्यवस्थेतील चहाच्या योगदाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी भारताने दिलेल्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली. संयुक्त राष्ट्र महासभेने चहाच्या औषधी गुणधर्मासोबतच सांकृतिक महत्व मान्य केले आहे. आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केल्याने त्याचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी मदत मिळेल. ही मदत ग्रामीण भागातील भूक आणि गरिबीशी लढण्यासीठी महत्वाची ठरेल.

पण मग २१ मे का ? 

तर मे महिना हा चहा उत्पादनासाठी सर्वोकृष्ट महिना मानला गेल्याने युएन ने निवडला आहे. याप्रमाणे  संयुक्त राष्ट्राने त्यांचे सदस्य असलेल्या सर्व देश, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांना दरवर्षी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्याचे आवाहन केले. तर जगभरात चहाचे उत्पादन करणारे देश आज १५ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करत आहेत. 

आता हा तारखांचा वाद मिटला असेल तर भारतात या चहाला खरोखरच ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे बरं का ! 

रामायण या प्रसिद्ध महाकाव्यात आरोग्यासंबंधीचा ताजेपणा आणण्यासाठी एका वनस्पतीचा वापर केल्याचा उल्लेख आहे. नाव आहे.. संजीवनी.

अभ्यासकांच्या मते रामायणात आढळणारी ही संजीवनी, चहाचाच एक प्रकार आहे. मृत लोकांना पुनर्जीवित करण्यासाठी या संजीवनी वनस्पतीचा उपयोग केल्यामुळे, त्यास एक दैवी औषधी वनस्पती म्हणून बघितल जात.

आता आपला चहा मरगळ दूर करतो हे माहित आहे. मेलेली माणसं जिवंत केल्याचं मी तर बघायला नाही. आणि म्हणूनच संजीवनी चहाचा एक प्रकार असल्याचा युक्तिवाद बंडल आहे.

चहाचा अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांच्यात एका बाबतीत तरी एकमत आहे. ते म्हणजे, चहाची उत्पत्ती चीनमध्ये इसवीसन पूर्व चौथ्या शतकात झाली होती. त्यावेळी चहा उत्तेजक पेय म्हणून ख्यातनाम होता. त्यावेळी चहा कसा बनवायचे ?

उकळत्या पाण्यात चहाची कोवळी पान टाकून आटवून लोक चहा तयार करायचे. आता कसा लागायचा ते विचारू नका.. कडू कडू इकच असणार, दुसरं काय तेव्हा.

चहाच्या पोथीत चहाची पौराणिक कथा सापडते. ती अशी आहे की, 

चीनमध्ये ४००० वर्षांपूर्वी शेननॉंग नावाचा दैवी देणगी लाभलेला एक शेतकरी होता. या शेतकऱ्याने एकदा शेतात खूप काम केलं. त्याच्या कठोर परिश्रमानंतर त्यान आपलं शरीर गरम करण्यासाठी (तिथं थंडी होती) कॅमेलियाच्या (चहा) झाडाखाली गरम पाणी उकळवलं आणि तिथच एक डुलकी काढायचं ठरवलं. चमत्कार म्हणतात तो हाच कि काय, याप्रमाणं जोरदार वाऱ्यानं, त्या गरम केलेल्या पाण्यात झाडाची वाळलेली पान पडली.

त्या शेननॉंगच नशीब बघा, त्यानं जगातील पहिल्या वाहिल्या चहाचा मधुर सुगंध घेतला. या गरम पाण्याचा एक घोट घेतल्यावर शेननॉंगला एकदम फ्रेश वाटल. उकळत्या पाण्यात कॅमेलियाची पान पडल्यामुळे त्याला फ्रेश वाटल असाव हे समजून त्यान आपला शोध जगजाहीर केला आणि चहा अस्तित्वात आला.

आता हाच किस्सा वेगवेगळ्या वेगवेगळ्या देशात त्यांच्या त्यांच्या संस्कृतींला आणि काळाला धरून सांगितला जातो. भारतात पण अशीच एक गोष्ट आहे. चहाच्या झाडाखाली पाणी उकळताना झोपी गेलेल्या एका बिचाऱ्या भारतीय शेतकऱ्याला चहाचा शोध लागला. परंतु ही केवळ दंतकथा आहे. त्याचे काही दस्तऐवज आपल्याकडे आत्ता तरी नाहीयेत.

जर एखाद्याला चहाचा कागदोपत्रीच जर शोध लावायचा असेल तर, चहाचा प्राचीन उल्लेख ‘अरिया (एरह या)’ या प्राचीन चीनी शब्दकोषात सापडतो. या शब्दकोषाची निर्मिती इ.स.पू. ३५० मधील आहे. म्हणूनच आपण अस गृहीत धरू शकतो की चहा कमीतकमी २३५० वर्ष जुना आहे.

८ व्या शतकापर्यंत चहा भारतात सापडतच नाही. कागदोपत्री तर नाहीच नाही. मग, चहा भारतात कधी पोहोचला ?

भारतातला चहा हे आयात केलेल परदेशी पीक आहे का नाही हा वादाचा मुद्दा झाला. पण चहा नाही म्हंटल तरी किमान ९०० वर्षांपासून भारताचा अविभाज्य भाग आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाम हे चहाच्या पिकाचे सर्वात मोठे क्षेत्र असून १२ व्या शतकापासून इथले लोकल आदिवासी सिंगफॉस चहा पीत असत. भारतात पहिला चहा पिणाऱ्यांपैकी सिंगफॉस एक होते अस मानल जात.

सिंगफॉस लोकांच्या मते, जेवणानंतर त्यांच्या पारंपारिक चहाचा एक कप पचनास मदत करतो. तसेच चहातील नैसर्गिक घटक लोकांना कॅन्सर आणि मधुमेहापासून दूर ठेवतात. आसाममधील अहोम राजांच्या कारकिर्दीत’ लाल चा’ हे पेय राजे राजवाड्यांपासून सामान्य लोकांपर्यंत लोकप्रिय होत.

सिंगफॉस राजा बिसा गॅम याने इंग्रज व्यापारी रॉबर्ट ब्रुस आणि त्याचा भाऊ चार्ल्स यांना १८२३ मध्ये चहा पाजला होता. ब्रिटिशांनी भारतात वसाहत केली तेव्हा त्यांना असं आढळलं की, चहाची लागवड करण्यासाठी चायना पेक्षा थंड हवामानाचा आसाम अधिक उपयुक्त आहे. लवकरच, त्यांनी चहाची लागवड भारतात सुरु केली. ब्रिटिशांच्या काळात भारतीय चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले.

  • गुजरातचा कच्छ भागात शेकडो वर्षांपासून एक प्रथा आहे. तिथल्या काही जमाती चहाची पान दूध आणि साखरेबरोबर उकळतात. तयार झालेला चहा फेकून देतात आणि गाळून राहिलेली पान खातात.
  • ईशान्य भारतात, चहाची पान शिजलेल्या भातात मिसळली जातात. रात्रभर हे मिश्रण भिजवलं जात. थोडा आंबूस वास आल्यावर ते खाल्लं जात. ही पाककृती आजही ईशान्य भारत आणि ब्रम्हदेशाच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा भाग आहे.

१६ व्या शतकात भारतात प्रवास करण्यास आलेल्या पोर्तुगीज आणि डच पर्यटकांनी आपल्या नोंदीत चहाचा उल्लेख केला आहे. त्यात ते लिहितात, 

भारतातील लोक चहाची पान वापरून लसूण आणि तेलाची फोडणी देऊन भाजीपाल्यासारखी एक डिश तयार करतात. तसंच चहाची पाने उकळवून औषधी पेय सुद्धा तयार करतात. भारतीय उप-खंडातील लोक त्यांच्या संस्कृती आणि पाककृतीनुसार बर्‍याच प्रकारे चहाच सेवन करतात. भारतातील बर्‍याच भागात खोकला आणि सर्दीवर उपचार म्हणून तुळस, मध, आलं आणि चहाच्या पानांपासून तयार केलेलं आयुर्वेदिक औषधी पेय सेवन केलं जात.

या चहामध्ये दूध कसे आले याचे पण बरेच किस्से आहेत. 

चहाच्या अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे दुधासह चहाचा पहिला प्रयोग बहुधा गुजरात, महाराष्ट्र आणि बंगालमधील व्यापारी प्रवाश्यांनी केला. त्या त्या भागात चांगल्या प्रतीचे दूध सहज उपलब्ध होते. वाढत्या क्रॉस-कंट्री ट्रेडमुळे, गोड दुधाळ चहा लवकरच पदाधिकारी आणि सर्वसामान्य कामगार यांच्यासाठीच गो टू ड्रिंक झालं. यातूनच पुढे मसाला चहा (सुगंधित मसाल्यांनी बनविलेला) जन्माला आला.

थोडक्यात भारतीय आणि ब्रिटिश परंपरेचा हा एक हायब्रीड चहा होता.

कालांतराने, रीतीरिवाज आणि सांस्कृतिक विचारांच्या देवाणघेवाणीमुळे श्रीमंत लोकांमध्येच नाही तर सामान्य वर्गांमध्ये ही चहाची तल्लफ वाढत गेली. यासाठी इंग्रजांचे आभार मानू तितके थोडेच. ते नसते तर कदाचित चहा आणि वेळ ही संकल्पनाच अस्तित्त्वात आली नसती.

तूर्तास सगळ्या भिडूंना भारतीय चहा दिनाच्या शुभेच्छा !!!

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.