भारताने फटाक्यांचा पहिला आवाज चीन मधून ऐकला!

यावर्षी निर्बंध नसल्यामुळं दिवाळीही जोरदार आहे आणि फटाक्यांचा आवाजही.फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण, गोंगाट आणि काय काय हे सगळ जरी मान्य केलं तरी फटाक्यांशिवाय दिवाळी कोणी कल्पनाच करू शकत नाही.

अख्या गल्लीला आमचं लक्ष्मीपूजन झालं हे सांगण्यासाठी पहिला मानाचा लक्ष्मी तोटा आणि त्यानंतर १००० फटाकड्यांची माळ लावायची पद्धतच आपल्याकडे आहे.

जगभरात सगळ्यात जास्त फटाके या काळात भारतात उडवले जातात.

दिवाळी म्हणजे परंपरांचा उत्सव आणि फटाके ही दिवाळीची मुख्य परंपरा बनली आहे. असं म्हणतात की याच दिवशी राम सीता लक्ष्मण चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. म्हणजे रामायण काळापासून भारतात दिवाळीत फटाकड्या उडवल्या जातात का? आम्ही जरा खोलात गेलो आणि वेगळीच माहिती समोर आली.

फटाक्याचा शोध भारतात लागला नाही. फटाक्याचा शोध लागला आहे चीनमध्ये. ते ही इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात.

तर झालं असं एक चायनीज कुक होता. आता चीनमध्ये चायनीज कुकच असणार म्हणा. तो काही तरी चायनीज स्पेशल जेवण बनवत होता. त्यावेळी साॅल्टपीटर म्हणजेच सायंटीफिक भाषेत पोटॅशीयम नायट्रेट (KNO3) त्याच्याकडून चुकून चुलीत पडलं. त्यावेळी तिथल्या अग्नीतून जोरात आवाज करत वेगळ्याच ज्वाला बाहेर आल्या. त्यांचा रंगसुद्धा वेगळा होता. बघणारे सगळे सटपटलेच.

आयला हे काय झालं? कुकमहाशय सुद्धा धक्यातच होते. त्यांना सुद्धा काही सुधरेना. मग साहेबांना लक्षात आलं की आपल्याला काही तरी भारी सापडलं आहे.

अशा तऱ्हेनं जगभरात क्रांती करणाऱ्या गन पावडरचा शोधाचं पहिलं पाऊल पडलं. काही जण म्हणतात की एका हरहुन्नरी चीनी जादुगाराने अमरत्व प्राप्त करण्याच्या नादात गन पावडरचा शोध लावला. याच गन पावडरचा उपयोग भविष्यात फक्त फटाकेच नव्हे तर बंदुकीच्या गोळ्या, बॉम्ब, रॉकेट वगैरे बनवण्यासाठी करण्यात आला.

4735302 orig

चिनी लेखक आणि किमयागार वुई बोयांग याने इसवी सन पूर्व १४२ सालात आपल्या पुस्तकात याचा उल्लेख उडणाऱ्या आणि नाचणाऱ्या ज्वाळा असा केला आहे. वेगवेगळ्या चीनी राजवटीमध्ये त्यावर अधिकाधिक संशोधन करण्यात आलं. इसवि सनाच्या दहाव्या शतकामध्ये  कागदात गणपावडर गुंडाळून ते उडवण्याची सुरवात झाली.

चायनीज लोकांच डोकं ते. त्यांनी त्यात अफाट आयडिया लढवून वेगवेगळे फटाके शोधून काढले.

मध्ययुगात चीनवर मोंगोल राज्यांच राज्य होत. ज्यातला चेंगीज खान खूप फेमस होता. हे मोंगोल राजे क्रूर आणि शूर होते. त्यांची घोडदौड चीनपासून ते युरोप पर्यंत होती. त्यांनी फटाके आणि गणपावडर जगभरात नेली. मोंगोल सैन्य भारतात सुद्धा आलं होत मात्र त्यांना अल्लाउद्दिन खिल्जीवर विजय मिळवता आला नाही. पण ते जाताना भारतात फटाके सोडून गेले.

म्हणजेच भारताला फटाके ही चीन आणि मोंगोल खानांची देणगी आहे.

तिथून पुढे भारतात फटाके व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. विजयनगरचा राजा देवरायाच्या राज्यातल्या महानवमी उत्सवात केल्या जाणाऱ्या आतिषबाजीचा उल्लेख दरबारात हजर असणारा तैमुर राज्याचा राजदूत अब्दुल रझ्झाक याने आपल्या एका ग्रंथात केला आहे.

जेष्ठ इतिहास तज्ञ परशुराम गोडे यांच्या म्हणण्यानुसार साधारण १३व्या आणि १४व्या शतकात दिवाळीमध्ये फटाके उडवण्यास सुरवात झाली. फक्त दिवाळीच नव्हे तर प्रत्येक आनंदाच्या प्रसंगात फटाके पाहिजेच अशी वेळ आली. पेशव्यांच्या दिवाळीतल्या आतिषबाजीची किंवा विजापूरच्या इब्राहीम आदिलशाहने आपल्या पोरीच्या लग्नात फटाक्यांच्यावर केलेल्या खर्चाची चर्चा पूर्ण देशभर झाली होती. राजस्थानचे राजपूत राजे दिवाळीमध्ये चार दिवस सलग आतिषबाजी करायचे.

त्याकाळात मुख्यतः गुजरात राज्यामध्ये फटाके बनवले जायचे. इंग्रज आणि पोर्तुगीज व्यापारी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या सोबत मॉडर्न दारुगोळा सुद्धा भारतात आणला. मग काय युरोपीय पद्धतीच्या फटाक्यांची चलती सुरु झाली.

एकोणीसाव्या शतकात कोलकातामध्ये भारतातला पहिला आधुनिक फटाक्यांचा कारखाना सुरु झाला. तामिळनाडूमधील शिवकाशी इथे भारतातले सर्वात जास्त फटाके बनवण्याचे कारखाने आहेत.

हे ही वाच भिडू

1 Comment
  1. Rutuja says

    In Tamil Nadu there is not shivganga the place is called shivkashi.

    And I like your posts best of luck bhidu….

Leave A Reply

Your email address will not be published.