भारतानं श्रीलंकेतल्या बंडखोराला लपवलं आणि आजूबाजूच्या लोकांना अंदाजही लागला नाही

मध्य आफ्रिकेतल्या काँगो देशात सध्या अराजक माजलंय. तिथल्या गोमा शहरात नागरिकांनी संयुक्त राष्ट्रांविरोधात आंदोलन पुकारलंय. गेली अनेक वर्ष सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांविरुद्धच्या संघर्षानं आता हिंसक वळण घेतलंय. दुसरीकडे श्रीलंकेतली परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही, माजी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आधी मालदीव आणि मग सिंगापूरच्या आश्रयाला गेले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रनिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. 

नेतृत्व बदललं असलं, तरी सरकारबद्दल जनतेच्या मनात असलेला रोष मात्र कायम आहे. श्रीलंका अजूनही अस्वस्थच आहे. या संकटात श्रीलंकेला भारतानं अनेकदा मदत केली. अशीच मदत लंकेत अंतर्गत यादवी माजली होती, तेव्हाही भारतानं केली होती.

८० चं दशक होतं, तेव्हा श्रीलंकेत फक्त एकच नाव गाजत होतं ते म्हणजे वेलूपिल्लाई प्रभाकरन, स्वतंत्र तमिळ राष्ट्राची मागणी करणाऱ्या प्रभाकरनच्या लिट्टे या संघटनेनं श्रीलंकन सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं. बॉम्ब हल्ले, गोळीबार, अपहरण या गोष्टींमुळं लोकांच्या मनात दहशत बसली होती.

त्याचवेळी १९७९ मध्ये स्वतंत्र तमिळ राष्ट्राची मागणी करणारी आणखी एक संघटना श्रीलंकेत उभी राहिली, ती होती ईलम पीपल रिव्होल्यूशनरी लिबरेशन फ्रंट (ईपीआरएलएफ.) या संघटनेचा सहसंस्थापक होता अन्नामलाई वरदाराज पेरुमल. त्याचे वडील अन्नामलाई हे मूळचे भारतीय तमिळ मात्र वरदाराजचा जन्म श्रीलंकेत झाला. त्यानं श्रीलंकेतल्या तमिळ लोकांचं आयुष्य लहानपणापासून अनुभवलं होतं.

पुढे वरदाराजनं जाफना विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि तिथंच प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. शिक्षण घेत असतानाच तमिळ युनायटेड लिबरेशन फ्रंटचा विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून त्याचं नाव गाजत होतं. ईपीआरएलएफची सैनिकी तुकडी असणाऱ्या, पीपल्स लिबरेशन आर्मीमध्येही तो सक्रिय होता.

सरकारविरोधी कारवायांचा ठपका ठेवता वरदाराजला अटकही झाली होती, मात्र १९८३ मध्ये बत्तीकोलोआचं जेल फोडत तो आपल्या सहकाऱ्यांसह पसार झाला.

एका मुलाखतीत वरदाराज सांगतो की, ‘१९८३ ते १९८७ या चार वर्षांच्या काळात आम्ही श्रीलंकेचं विभाजन व्हावं यासाठी अनेक प्रयत्न केले होते.’ भूमिगत होऊन त्यांच्या कारवाया सुरू होत्याच, पण प्रभाकरनचं वर्चस्व वाढत चाललं होतं आणि श्रीलंकेतली परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती.

खरंतर प्रभाकरनच्या लिट्टेची आणि वरदाराजच्या ईपीआरएलएफची मागणी तमिळ राष्ट्राचीच असली, तरी या दोन्ही संघटना एकमेकांच्या वैरी होत्या. प्रभाकरननं वरदाराजला देशद्रोही घोषित केलं आणि मारण्याचे अनेक प्रयत्नही केले.

लंकेतला संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना, भारतानं हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली. १९८७ मध्ये भारत-श्रीलंका शांततेचा करार संमत झाला. या करारानुसार श्रीलंकेतले पूर्व आणि उत्तर प्रोव्हीयन्स संपुष्टात आले आणि एकत्रित उत्तर पूर्व प्रोव्हीयन्सची निर्मिती करण्यात आली. या प्रोव्हियन्समध्ये निवडणुकाही घोषित झाल्या.

ही संधी हेरत श्रीलंकेतले अनेक बंडखोर गट या निवडणुकीत उतरले आणि राजकारणाच्या मुख्य  प्रवाहात आले. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यात मुख्य वाटा होता भारताच्या शांतीसेनेचा. त्यामुळे या निवडणुकांमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार होती.

या निवडणुकीत भारतीय शांतीसेनेनं ईपीआरएलएफला मदत करायची ठरवलं. एकाप्रकारे हा प्रभाकरनच्या वर्चस्वाला दिलेला हादरा होता. या निवडणुकीत ईपीआरएलएफचा विजय झाला, १० फेब्रुवारी १९८८ ला वरदाराजनं उत्तर पूर्व प्रोव्हीयन्सचा पहिला मुख्यमंत्री म्हणूनस शपथही घेतली.

मात्र हा सत्तेत राहण्याचा काळ फक्त २ वर्षच टिकला. श्रीलंकेतलं केंद्रीय नेतृत्व आणि वरदाराज यांच्यात अनेकदा संघर्षाच्या ठिणग्या उडत होत्या. त्यातच त्यानं सिटीझन व्हॉलंटियर फोर्सची स्थापना केली, जी पुढं जाऊन तमिळ नॅशनल आर्मी बनली. त्या आर्मीमध्ये भारतीय जवानांनी ट्रेन केलेले पीएलओटीई आणि टीईएलओ या संघटनांमधले सैनिक होते.

याचसोबत वरदाराजनं घोषणा केली, की उत्तर पूर्व प्रोव्हियन्सला श्रीलंकेच्या सैन्याची काहीही गरज नाही, त्यांनी इथून निघून जावं. १ मार्च १९९० ला भारतीय सैन्यानं लंकेतून परत फिरण्यास सुरुवात केली आणि त्याचवेळी वरदाराजच्या मागणीनं आणखी जोर धरला.

त्यानं सरकारला १९ मागण्या असलेलं पत्र दिलं आणि जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर स्वतंत्र तमिळ राष्ट्राची घोषणा करू असा दमही भरला. सरकारनं मात्र या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि वर सुप्रीम कोर्टातून उत्तर पूर्व प्रोव्हियन्स बरखास्त करुन घेत त्यांना केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आलं.

वरदाराजच्या हातातलं पद गेलं होतं, त्यात प्रभाकरन आणि श्रीलंकन सरकार दोघंही त्याच्या मागावर होते.

अशावेळी त्याच्या मदतीला भारत धावून आला. भारतानं वरदाराजला श्रीलंकेतून बाहेर काढलं आणि त्याला आश्रय दिला मध्य प्रदेशमध्ये. त्याला आश्रय देण्यासाठी भारतानं मध्य प्रदेशमधल्या चंदेरी किल्ल्याची निवड केली. तिथे मोठ्या बंदोबस्तात तो आणि त्याचा परिवार राहिला, सुरक्षा इतकी कडक होती की आपल्या जवळच्या किल्ल्यात कोण राहतंय याची कल्पनाही आजुबाजुच्या नागरिकांना आली नाही.

परिस्थिती निवळल्यावर वरदाराज आपल्या परिवारासह श्रीलंकेत परतला. आता तिथं सोशल डेमोक्रॅटीक पार्टीचा नेता म्हणून त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे यांना पाठिंबा दिल्याच्या कारणावरुनही तो चर्चेत आला होता.

सध्या भारताची शांतीसेना काँगोमध्ये झुंजतेय, याआधी शांतीसेनेनंच श्रीलंकेला मोठ्या संकटातून वाचवलं होतं. त्याची पुनरावृत्ती आजही होत आहे; मात्र या सगळ्यात भारतानं दाखवलेल्या हिंमतीमुळं श्रीलंकेचं मध्य प्रदेशशी विशेष नातं आहे हे खरं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.