कंगनाने नवीन विषय काढलाय. देशाचं नाव ” भारत कि इंडिया?”

ट्विटर वरून कंगना राणावतचं अकाउंट बाद करण्यात आलं तरी कंगना चर्चेत आहे. इंस्टाग्राम आणि कु ऍपवरून कंगना आपली मतं मांडत असते. ती मतं साधीसुधी नसतात तर ती वादग्रस्त असतात इतक्या दिवसांच्या सोशल मीडिया प्रकरणामुळे आपल्या लक्षात आलंच असेल . पण कंगना राणावत तिच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आली आणि तिने केलेलं विधान हे थेट देशाचं नाव बदलायला सांगणारं आहे.

तिच्या स्टोरीत तिने सांगितलं होतं कि इंडिया हे नाव ब्रिटिशांनी ठेवलं असून ते गुलामगिरीची आठवण करून देणारं आहे. त्यामुळे ते इंडिया हे नाव बदलून भारत असं करावं. त्यात कंगनाने भारत शब्दाचा अर्थही सांगितला भा- भाव, र- राग आणि त- ताल. परदेशी लोकांची जर आपण कॉपी करत बसलो तर आपला देश कधीच पुढे जाणार नाही असंही कंगना म्हणाली. 

पण भिडू आपल्या देशाचं नाव कस पडलं हे तर आपल्याला माहितचं पाहिजे. त्यामुळे आपण भारत, हिंदुस्थान, इंडिया आणि अजून किती नाव भारताला होती ते बघूया आणि नाव कसं पडलं हेही जाणून घेऊया.

देशाच्या बदलणाऱ्या नावाचा इतिहास हा मोठा रंजक आहे. असं सांगण्यात येत कि भरत नावाच्या राजाने भारताचा संपूर्ण विस्तार केला आणि त्यांच्या पराक्रमाच्या आणि नावाच्या चर्चेमुळे या प्रदेशाला भारत हे नाव देण्यात आलं. मधल्या काळात तुर्की आणि इराणी लोकं जेव्हा या प्रदेशात आले तेव्हा त्यांनी सिंधू नदीच्या खोऱ्यातून प्रवेश केला.

त्यावेळी हि विदेशी मंडळी स शब्दाचा उच्चार ह म्हणून करत असे. त्यामुळे सिंधूचा अपभ्रंश होता होता तो सिंधूचा हिंदू झाला. या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना हिंदू म्हणून ओळखलं गेलं आणि हिंदूंच्या देशाला हिंदुस्थान म्हणून घोषित करण्यात आलं. 

सिंधू नदीचं दुसरं नाव हे इंडस हे होतं. या नदीच्या खोऱ्यात वसलेल्या संस्कृतीला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सिंधू संस्कृती हि प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. सिंधू नदीचं इंडस हे नाव विदेशी लोकांकडून आलं आहे. सिंधू संस्कृतीमुळे भारताचं जुनं नाव हे सिंधूसुद्धा होतं. ज्याला युनानीमध्ये इंडो किंवा इंडस संबोधलं जातं. ज्यावेळी हा शब्द लॅटिन भाषेत गेला तेव्हा तो इंडिया झाला.

ज्यावेळी इंग्रज भारतात आले तेव्हा भारताला हिंदुस्थान हे नाव होतं. पण हिंदुस्थान हा शब्द बोलायला ब्रिटिशाना अडचण यायची पण जेव्हा इंग्रजांना कळलं कि भारताची संस्कृती हि सिंधू नदीमुळे आहे आणि तिला इंडस व्हॅली म्हणूनही ओळखलं जातं आणि त्याला लॅटिन भाषेत इंडिया म्हटल जातं तेव्हा ब्रिटिशांनी इंडिया म्हणायला सुरवात केली. इंग्रजांच्या राजवटीत इंडिया हे नाव भरपूर प्रसिद्ध झालं. परदेशातही इंडिया हे नाव ब्रिटिशांमुळेच गेलं आणि जनगभरात हिंदुस्थान जाऊन इंडियाचं प्रचलित झालं. 

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला. पुन्हा देशाचं नाव हा प्रश्न वर आला. स्वतंत्र भारताला चालवण्यासाठी संविधान बनवण्यात आलं. संविधान कमिटीतल्या बैठकीत भारत, हिंद, हिंदुस्थान, इंडिया अशा अनेक नावांची चर्चा झाली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत या शब्दावर शिक्कामोर्तब केलं. पण संविधान कमिटीमधल्या अनेक लोकांना हिंदुस्थान हे नाव योग्य आहे असं वाटत होतं. पण बाबासाहेब आंबेडकर आणि सेठ गोंविद दास यांनी ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ देत भारत हेच नाव योग्य आहे असं ठरवलं.

पुढे लोकांना एकजूट करण्यासाठी महात्मा गांधींनी ‘ भारत माता कि जय ‘ हि घोषणा दिली आणि भारत हेच नाव नक्की झालं.

संविधानात लिहिलेलं आहे कि इंडिया दॅट इज भारत….

कंगना राणावतने केलेलं विधान हे बऱ्याच अर्थाने विचार करायला लावणारं आहे. अजूनही बरेच संदर्भ असू शकतील ज्यामुळे व्यापक रूपात आपल्याला भारताच्या नावाची आणि संस्कृतीची माहिती मिळेल.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.