हरभजनसिंगच पाक खेळाडू बरोबर भांडण झालं तरी सचिन ते सोडवायला गेला नाही.

१ मार्च २००३. वर्ल्ड कप भारत पाकिस्तान मॅच.

मॅच  दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरीयन मध्ये होणार होती पण भारतीय उपखंडात रस्त्यावर एक ही चिटपाखरू दिसत नव्हतं. करोडो लोक टीव्हीसमोर बसले होते. भारतात दूरदर्शनवर फोर्थ अम्पायरच्यानंतर एक गाण लागलं. जुन्या शहीद सिनेमा मधलं गाण गायलं होतं भारताचे पुर्व क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी,

“ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम तेरी राहो मे जां तक लुटा जाएंगे”

गाण ऐकूनच पाहणाऱ्याच्या अंगावर काटे उभे राहिले. भारत पाकिस्तान युद्धाची नांदी झाली होती. पाकिस्तानचा कप्तान वकार युनुस आणि भारताचा कप्टन सौरव गांगुली टॉस साठी मैदानात उतरले. आधीच मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. वकारने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटीग निवडली होती.

पाकिस्तानच्या क्रिकेटचा तो सुवर्णकाळ होता. त्यांच्या टीममध्ये वसीम अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर अशी धडकी भरवणारी बॉलिंग होती. जोहान्सबर्गची पीच फास्टर बॉलरना साथ देणारी होती. भारताच्या बॉलिंग लाईनअपमध्ये अनुभवी श्रीनाथ, कुंबळे बरोबर तरुण तेजतर्रार झहीर खान, नेहरा देखील होते. हरभजन सिंगला कट्ट्यावर बसवण्यात आलं होतं.

खरा सामना भारताची वर्ल्डकलास बॅटिंग विरुद्ध पाकिस्तानची सुपरफास्ट बॉलिंग यांच्यात रंगणार होता. 

नव्या बॉलने इनिंगची सुरवात झहीर खानने केली. पाकतर्फे अन्वर आणि तौफिक उमरने चांगले खेळत होते. पण फॉर्ममध्ये असलेल्या झहीर खानने तौफिक उमरला क्लीन बोल्ड करून भारताला पहिला ब्रेक मिळवून दिला. भारतीय प्रेक्षकांच्यात उत्साह पसरला.

खूप वर्षांनी कमबॅक केलेला दाढी वाढवून आलेला सईद अन्वर मात्र व्यवस्थित डिफेन्सने खेळत होता. खराब बॉल आला तरच त्याला टोला देत होता. बाकी इंझमाम, रझ्झाक, युनुस खान, युसुफ योहाना, आफ्रिदी हे जास्त वेळ त्याला साथ दिले नाहीत. ठराविक अंतरावर विकेट पडत गेल्या. तरी सईद अन्वरच्या शतकाच्या जोरावर पाकने भारतापुढे २७४ धावांचे आव्हान ठेवले.

त्याकाळात लो स्कोरिंग सामने व्हायचे. पाकची बॉलिंग आणि सेंच्युरीयनचे पीच पाहता २७४ हे टार्गेट अशक्य होते. पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी आधीच जल्लोष सुरुही केला होता. भारताच्या गोटात प्रेशरच वातावरण निर्माण झालं होतं.

लंच ब्रेक सुरु होता. ड्रेसिंग रूम मध्ये डायनिंग टेबलवर दोन्ही अमोरासमोर आल्या. 

भारताचा हरभजनसिंगच्यासमोर जेवायला युसुफ योहाना आणि शोएब अख्तर बसले होते. इतकी वर्षे एकत्र खेळले असल्यामुळे एकमेकांशी ओळख मैत्री होतीच. मचचं टेन्शन देखील होतं. जेवता जेवता एकमेकाला पंजाबीमध्ये टोमणे मारणे सुरु झालं.  हरभजन प्लेयिंग इलेव्हन मध्ये नसल्यामुळे आधीच वैतागला होता. युसुफच्या बोलण्यामुळे तो अजून भडकला.

बघता बघता हसत खेळत सुरु झालेल्या गोष्टीचं भांडणात रुपांतर झालं. दोघांनी ही हातात काटेचमचे घेऊन एकमेकाला मारायला धाव घेतली. मैदानातील युद्ध मैदानाबाहेर पण सुरु झालं होत. सगळे जण त्यांना थांबवायला उठले. अखेर श्रीनाथ, द्रविड यांनी हरभजनला तर अक्रम सईद अन्वर यांनी युसुफला अडवल. वसीम अक्रमने तर दोघानाही अस्सल पंजाबीमध्ये आईबहिणीवरून शिव्या दिल्या आणि त्यांना आपापल्या ड्रेसिंग रूम मध्ये पाठवल.

हे सगळ चालल होतं तेव्हा फक्त एकचं खेळाडू तिथे नव्हता. सचिन तेंडूलकर!!

तो त्यादिवशी गप्प गप्प होता. सचिनला त्या दिवशी जेवायचंही नव्हत. त्याने ड्रेसिंग रूममध्येच एक मोठा बाउल आईसक्रिम आणि एक केळ मागवल.तेव्हढ्यात  त्याला बाहेरचा गोंगाट ऐकू आला. हरभजनचं कोणाशी तरी भांडण झालंय हे लक्षात आलं होतं . पण काय झालंय ते पाहायला तो बाहेर गेला नाही. कानात हेडफोन घालून किशोरकुमारची गाणी ऐकत तो शांत बसला होता. कारण त्याला आपली एनर्जी, एकाग्रता त्या फालतू भांडणासाठी वाया घालवायची नव्हती.

आपला राग त्याने बॅटिंगसाठी राखून ठेवला होता.

सेहवाग आणि सचिन बॅटिंगसाठी मैदानात उतरले. नेहमी सेहवाग भारतीय इनिंगची सुरवात करत असे, पण त्या दिवशी सकाळपासून तो सचिनच्या मागे लागला होता की,

” मला वसीम अक्रमच्या लेफ्ट आर्म फास्ट बॉलिंगला खेळायला जड जात, आज सुरवात तू कर.”

सचिन काहीच बोलत नव्हता. क्रीझवर पोहचेपर्यंत सेहवाग रडकुंडीला येऊन विनवणी करत होता. अखेर सचिननेच पहिली स्ट्राईक घेतली. त्याने आधीच ठरवले होते पन त्याला सेहवागची मज्जा करायची होती.

स्विंगचा सुलतान वसीम अक्रमने सुरवात केली. सचिनने पहिला बॉल व्यवस्थित खेळून काढला. त्या दिवशी बघणाऱ्या प्रत्येकाला जाणवत होतं. आज सचिनचा रंग वेगळा आहे, तो काहीतरी करणार. त्याने आणि सेहवागने त्या ओव्हर एकएक चौकार मारून ९ रना स्कोरबोर्डवर जोडल्या.

पुढच्या ओव्हरला आला जगातला सर्वात फास्ट बॉलर शोएब अख्तर.

त्याने पहिलाच बॉल वाईड टाकला. पुढच्या बॉलला सचिन आणि तिसऱ्या बॉलला सेहवागने स्ट्राईक रोटेट केली. कॉमेंटेटर रवी शास्त्री आणि रमीज राजा म्हणत होते की सचिन आणि सेहवागने अख्तरविरुद्ध योग्य स्ट्रेटेजी आखली आहे. पण तसं काही नव्हत.

लांब रनअप असलेला शोएब पुढच्या बॉल ला धावत आला, त्याने १५०च्या स्पीडने बॉल टाकला. तो थोडासा ऑफ साईडला जाणारा होता. सचिनने अनपेक्षितपणे तो बॉल उचलला आणि पाहता पाहता सहज सिक्स गेला. पब्लिकने स्टेडीयम डोक्यावर घेतलं. अख्ख्या आफ्रिकेत त्या दिवशी त्या सिक्सरचा आवाज गेला असेल.

सचिन तिथे थांबला नाही. पुढच्या सलग दोन चेंडूवर त्याने सलग दोन चौकार हाणले.  मैदानात भारतीय प्रेक्षकांसाठी स्वर्ग दोन बोट ठेंगणा उरलं होत. सगळीकडे नुसता सेलिब्रेशन चालू होतं. सचिन पासून प्रेरणा घेऊन सेहवागने सुद्धा फटकेबाजी सुरु केली. या दोघांनी अख्तर आणि अक्रमची पिसे काढली.

सेहवाग १४ बॉलमध्ये २४ रना तडकावून आउट झाला.पाठोपाठ आलेला गांगुली पहिल्या बॉल ला डक वर आउट झाला  पण सचिनचा तोफखाना थंडावला नाही. येईल त्या बॉलरची पिटाई त्याने सुरु ठेव्ह्ली.बऱ्याच वर्षांनी सचिनमध्ये काय संचारलं होत काय माहित ? कोणालाही काहीही कळत नव्हत. नेमक झालय तरी काय?

नन्तर आलेल्या कैफ, द्रविडला घेऊन त्याने इनिंग चालू ठेवली. अखेर त्याच्या पायात बऱ्याच क्रॅम्प्स आल्या. फिजिओ नी  त्याला रनर घेण्यास सांगितले. पण रनर आल्यानंतर काही वेळातच सचिन शोएब अखतरच्याच जाळ्यात सापडला. त्याचे शतक दोन धावानी हुकले. सगळा देश हळहळला.

सचिन आउट झाल्यावर पाकिस्तानला मॅच जिंकण्याच्या आशा परत दिसू लागल्या. पण द्रविड आणि युवराजने  इनिंग सांभाळली. भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा वर्ल्ड कप मध्ये हरवले. सचिन मॅन ऑफ दी मॅच ठरला.

त्या दिवशी रात्रभर भारताच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गावात वर्ल्ड कप जिंक्ल्यापेक्षा मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं. इतिहासात सर्वात रोमांचकारी सामना म्हणून या २००३ च्या सामन्याला ओळखले जाते.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.