भारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.

भारतीय सेना ही त्यांच्यात असलेल्या जबरदस्त समर्पण शक्ती आणि देशासाठी केल्या जाणाऱ्या त्यागासाठी ओळखली जाते. भारतीय सेना जितकी असते तितकीच ती गरजेच्या ठिकाणी सहानुभूतीचा डोंगर तयार करण्यातही समर्थ असते. अलीकडेच एक घटना घडली, ज्यातून आपल्या सैनिकांची संवेदनशीलता दिसून आली.

झाले असे की, एका सात वर्षांच्या मुलाचा देह पाकिस्तान मधील नदीतून वाहत वाहत भारताच्या एका गावात आला. भारतीय सैनिकांनी तो मुलाचा देह नदीतून काढला आणि बर्फाचा ब्लॉक्समध्ये तो सुरक्षित ठेवण्यात आला. अखेरीस, सैनिक तो मृत मुलाचा देह भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा (LoC) वर घेऊन गेले.

मृत मुलाचा देह शोधून काढण्यास आणि तो पाकिस्तानात योग्य ठिकाणी पोहचवण्यास भारतीय सेनेला तीन दिवस लागलेले. भारत-पाकिस्तान मध्ये कायमच संघर्ष होत असल्याने हा प्रकार थोडा संतापजनकच होता. पण सैनिकांनी तो राग-भेदभाव बाजूला सारून मुलाचा देह योग्यरीत्या पोहचवण्यास प्राधान्य दिले. गुरुवारी, उत्तर काश्मीर मधील LoC ला लागून असलेल्या ग्यूरेझ व्हॅलीतील अचुरा गावात  त्या सात वर्षाच्या आबिद शेख नामक मुलाचा देह पाकिस्तान सैन्याच्या स्वाधीन करण्यात आला.

ग्यूरेझचे माजी आमदार असलेले नाझीर अहमद ग्यूरेझी म्हणाले,

“माझ्या आयुष्यात अशी देवाण-घेवाण मी पहिल्यांदाच बघतो आहे.”

हे अगदी खरे आहे. कायमच युद्धाच्या वातावरणात धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये यापूर्वी अशी मृत मुलाच्या देहाची देवाण-घेवाण कधीच झालेली नव्हती. ती घटना दुःखदायक असली तरी तितकीच हृदयस्पर्शी देखील आहे. मंगळवारी काही गावकऱ्यांनी आबिदचा देह किशनगंगा नदीत वाहत असल्याचे पाहिले. काही वेळानंतर त्याचा फोटो ‘हरवलेला मुलगा’ म्हणून फेसबुकवर त्यांना दिसून आला. जो पाकव्याप्त काश्मीर मधील गिलगिट बाल्टिस्तानच्या मिनीमार्ग अस्तुर गावातील होता. लोकांनी आबिदच्या कुटुंबाने सोशल मीडियावर शेअर केलेला त्याचा व्हिडिओ देखील बघितला, ज्यात ते त्याला परत येण्याची साद घालत होते. तो सोमवार पासून बेपत्ता होता.

बंदीपुराचे पोलीस उपायुक्त शाहबाझ मिर्झा यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,

“जसे आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाली तसे आम्ही लष्कराला जाऊन भेटलो आणि हे प्रकरण हाताळून मृतदेह सीमेपलीकडे पोहचवण्यास चर्चा करण्यास बोललो.”

पण अचुरामध्ये शवगृह नसल्याने मृतदेह पोहचवण्यापूर्वी तो योग्य अवस्थेत कसा ठेवायचा ? असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा सैनिकांनी आजूबाजूच्या डोंगराळ भागातून बर्फ गोळा करून त्यात तो मृतदेह ठेवला, जेणेकरून त्याची विटंबना होणार नाही.

भारतीय सेनेला लवकरात लवकर पाकिस्तानच्या हवाली करायचा होता. कारण बर्फाच्या तुकड्यांत ही तो जास्त काळ टिकून राहणार नव्हता. कुपवाडा जिल्ह्यातील टीटवाल क्रॉसिंग पॉईंटवर पाकिस्तान देह घेण्यास तयार होता, जो 200 किमी दूर होता. भारतीय सैन्य ते निश्चितच करणार होते यात शंका नाही, पण एक भीती होती. ती म्हणजे ग्यूरेझ व्हॅलीच्या सभोवतालचा परिसर.

त्याच संध्याकाळी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांची टीम आणि सैन्य तो मृतदेह घेऊन भारताच्या शेवटच्या पोस्टवर पोहचले. पण जेव्हा ते तिथे पोहचले तेव्हा पाकिस्तान कडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. मग पुन्हा तो मृतदेह घेऊन ते माघारी ग्यूरेझमध्ये आले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवले.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पाकिस्तानने मृतदेह स्वीकारण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आणि खाणकाम क्षेत्रातुन मार्गक्रमण करत भेटण्याच्या स्थळी पोहचून भारताने तो अखेर पाकिस्तानच्या स्वाधीन केला. तो मृतदेह स्वीकारताना पाक अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे होते.

ही ऐतिहासिक घटना जगभरातल्या युद्धपिपासू लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. भारतीय आर्मी ही शूर तर आहेच तिच्या वज्राहून कठोर चिलखतामागे हे मानवतावादी हृदय आहे हे सुद्धा सिद्ध झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.