तनोट राय माता मंदिर : पाकिस्तानने या मंदिरावर ३००० हजार बॉम्ब फेकले पण एकही फुटला नाही

बॉर्डर चित्रपट बघितलाय? या बॉर्डर चित्रपटात एक सिन दाखवण्यात आलाय बघा…

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झालेलं असतं. पाकिस्तानच्या सैन्याने बॉम्बगोळ्यांचा पाऊस पाडायला सुरुवात केलेली असते. एकामागून एक बॉम्ब बॉर्डरवरच्या पॅलेसला उध्वस्त करत असतात. त्यांना बघून अभिनेता पुनीत इसार सुनील शेट्टीला म्हणतो “भैरव सिंग, सारे पॅलेस उड़ गये” त्यावर सुनील शेट्टी म्हणतो “पर माँ के मंदिर को छु नहीं पाये… रतन सिंग साहबजी, जित हमारी जरूर होगी”

आता मध्येच हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा.

अमित शहांनी राजस्थानच्या दौऱ्यावर असताना १० सप्टेंबरला राजस्थानच्या भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा पर्यटन विकास कामाची पायाभरणी केलीये. भारतीय पर्यटनाच्या विकासासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यात सीमा पर्यटनाला विशेष प्रोत्साहन देण्यात येतंय. त्याचाच भाग म्हणजे हा राजस्थानच्या सीमेवरचा प्रकल्प. 

या प्रकल्पाची खास गोष्ट आहे, या प्रकल्पासाठी पर्यटन विभागाने केलेली जागेची निवड. 

बॉर्डर चित्रपटाच्या सीनमध्ये ज्या मंदिराचा उल्लेख केलाय ना.. त्याच मंदिराच्या जागेची निवड पर्यटन विभागाने केलीये. 

तो सिन चित्रपटातला असला तरी रिअल लाईफ मधल्या घटनेने प्रेरित झालेला आहे. असं मंदिर खरंखुरं भारतात आहे, जिथे पाकिस्तानने हजारो बॉम्बगोळे टाकले होते आणि त्यातील एकही बाँम्ब फुटला नव्हता. देवीच्या चमत्कारामुळे असं झाल्याची श्रद्धा आहे आणि याच मंदिराच्या जागेची निवड पर्यटन विभागाने सध्याच्या प्रोजेक्ट उभारणीसाठी केलीये. 

कुठे आहे हे ठिकाण? नाव काय मंदिराचं? मंदिराचा इतिहास काय? नेमकी घटना काय? आणि सध्याचा प्रकल्प काय? जाणून घेऊया… 

राजस्थानमधील जैसलमेरपासून सुमारे १२० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. तनोट गावात वसलेल्या या मंदिराचं नाव आहे तनोट राय माता मंदिर.  

मंदिराचे पुजारी सांगतात त्याप्रमाणे, फार पूर्वी ममदिया चरण नावाचा एक माणूस होता. ज्याला अपत्य नव्हतं. मूलप्राप्तीसाठी ममदियाने जवळपास सात वेळा हिंगलाज मातेपर्यंत पायी प्रवास केला होता. याने प्रसन्न होऊन एका रात्री हिंगलाज मातेने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि विचारलं  की, तुला मुलगा हवा की मुलगी?

त्यावर उत्तर देताना “माते माझी इच्छा आहे की, तू माझ्या घरी जन्म घ्यावा” असं ममदिया म्हणाला. त्यानंतर हिंगलाज मातेच्या कृपेने ममदियाला सात मुली आणि एक मुलगा झाला. यातीलच एक म्हणजे अवद माता जिला तनोट माता म्हणून ओळखलं जातं, अशी कथा पुजारी सांगतात.

हे पौराणिक मंदिर असून या मंदिराची स्थापना इ.स. ८४७ मध्ये झाली असल्याचं सांगितलं जातं. भाटी राजपूत राजा तनु राव यांनी तनोटला आपल्या राज्याची राजधानी बनवल्यानंतर या मंदिराचं बांधकाम सुरू झाल्याचे संदर्भ सापडतात. तेव्हापासून पिढ्यानपिढ्या भाटी राजपूत आणि जैसलमेरच्या लोकांद्वारे या देवीची पूजा केली जात आहे, असं म्हणतात.

आख्यायिके व्यतिरिक्त भारत-पाकिस्तानच्या युद्धानंतर हे मंदिर एका घटनेमुळे जास्त प्रकाशझोतात आलं.

१९६५ मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं. या युद्धात भारतीय लष्करावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता कारण पाकिस्तानची फायर पॉवर पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक झाली होती. त्यांनी तोफांच्या आणि बॉम्बगोळ्यांचा जास्त वापर सुरु केला होता. मात्र पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडे पुरेसं शस्त्रास्त्र बळ नव्हतं.

पाकिस्तानी सैन्याने याचा फायदा घेतला आणि साडेवाला पोस्टजवळील किशनगडचा समावेश असलेला मोठा भाग काबीज केला. या पोस्टवर १३ ग्रेनेडियर्स लढत होते. पाकिस्तानने या पोस्टचा बराचसा भाग काबीज केल्यानंतर या पोस्टला भारतीय सैन्याकडून दारुगोळा सप्लाय करण्यात अडथळा निर्माण झाला. तरी देखील तिथे तैनात सैनिक जीवाची पर्वा न करता पोस्ट वाचवण्यासाठी लढत होते. 

दरम्यान तनोट माता मंदिराजवळील एका पोस्टवर बॉम्बगोळे टाकण्यात येऊ लागले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोस्टजवळ पडलेल्या कोणत्याही बॉम्ब स्फोट झाला नाही.

असं सांगितलं जातं की, पाकिस्तानी सैन्याने १९ नोव्हेंबरपर्यंत ३००० हून अधिक बॉम्ब टाकले होते परंतु तरीही तनोट मातेचे मंदिर अबाधित राहिलं. कोणत्याही बॉम्बचा स्फोट झाला नाही. म्हणून देवता स्वत: सैनिकांच्या रक्षणासाठी आली होती, असं म्हटलं जातं. 

त्यानंतर १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने तनोट मंदिराजवळील लोंगेवाला याठिकाणी बॉम्ब फेकले. यावेळी मेजर कुलदीपसिंग चंदपुरी यांच्या नेतृत्वाखालील केवळ १२० जण या पोस्टची सुरक्षा करत होते आणि २ ते ३ हजाराच्या संख्येने पाकिस्तानी सैन्य समोर होतं. 

तरी देखील भारतीय जवानांनी आशा सोडली नाही. ४ डिसेंबर रोजी पाकिस्तानने लोंगेवालावर पूर्ण बटालियन आणि टँक स्क्वाड्रनने हल्ला केला. पण पुन्हा एकदा देवतेच्या जवळ पडलेले बॉम्ब फुटले नाहीत आणि फक्त १२० जणांच्या जवानांच्या तुकडीने पाकिस्तानी सैन्याला पराभूत केलं होतं. 

लोंगेवाला ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी लढाई मानली जाते, ज्यामध्ये तनोट मातेचं मोठं योगदान असल्याची अनेकांची श्रद्धा आहे. 

या तनोट मातेच्या मंदिराचं महत्त्व लक्षात घेऊन बीएसएफनं इथं आपली पोस्ट उभी केली आहे. इतकंच नाही तर या मंदिराकडे आता पूर्णपणे बीएसएफचे जवान लक्ष देतात. मंदिराची साफसफाई करण्यापासून ते प्रार्थना करण्यापर्यंत आणि इथे येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उभारण्यापर्यंतची सगळी जबाबदारी बीएसएफने सांभाळली आहे.

या देवस्थानला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी लष्कराकडून वर्षभर धर्मशाळा, आरोग्य शिबिरे आणि  मोफत जेवणाची व्यवस्था केली जाते. अश्विन आणि चैत्र नवरात्रीमध्ये इथे यात्रा आयोजित केली जाते. मंदिराचे पुजारी देखील सैनिकच असतात. सकाळी आणि संध्याकाळी आरती होते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक पहारेकरी तैनात असतो, पण कुणालाही मंदिरात प्रवेश करण्यापासुन अडवलं जात नाही. फोटो काढण्यावरही बंदी नाही. 

आजही या मंदिराच्या परिसरात भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानचे ते न फुटलेले जिवंत बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. तिथे एक म्युझियमच तयार करण्यात आलं आहे जिथे पर्यटकांना हे बॉम्ब बघता येतात.

या आख्यायिकेला धरूनच भारतीय पर्यटन विभागाने याठिकाणी सीमा पर्यटनाला वाव देण्याचं ठरवलं आहे. तनोटमध्ये झालेला चमत्कार जगाला दाखवण्यासाठी तनोट मंदिर परिसर प्रकल्पासाठी भारत सरकारकडून १७ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

या प्रकल्पांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी वेटिंग रूम, अॅम्फीथिएटर, इंटरप्रिटेशन सेंटर, लहान मुलांसाठी रूम आणि इतर आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तेव्हा या जागेची निवड करणं भारतीय सीमा पर्यटन कितपत फायदेशीर ठरतंय, हे आता प्रकल्प उभारल्यावरच कळेल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.