जिद्दी पोस्टखातं हार मानायला तयार नाही, फ्लिपकार्ट सोबत स्पर्धेत उतरतय..!

भारतीय टपाल सेवा. डाक, पोस्ट अनेक नावांनी आपण हिला ओळखतो.

एक काळ होता म्हणे जेव्हा या पोस्टखात्याच्या जीवावर एकमेकांना मेसेज पाठवले जायचे. जन्ममृत्युची बातमी सुतक संपल्यावर कळायची. पोस्टमन लांबून जरी दिसला तरी आता कोणाच्यातरी मयताची बातमी आहे असं समजून म्हाताऱ्या रडायला चालू करायच्या.

दूरदेशी नोकरीला गेलेल्यांची मनीऑर्डरी, ख्याली खुशाली, दिवाळी संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा, गुलाबी प्रेमपत्रं अशा सगळ्या गोष्टी घेऊन येणारे पोस्टमन काका तेव्हाच्या लोकांच्या आयुष्याचे भाग होते.

१६८८ साली इंग्रजांनी भारतात टपाल सेवा सुरु केली. आधी फक्त कंपनीच्या ऑफिशियल कामासाठी वापरली जाणार हे डाक गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्तीन्ग्जच्या शिफारशीमूळ सामान्य भारतीय जनतेला पण हि सोय उपलब्ध झाली. पुढची जवळपास दोन शतके या टपाल खात्याने गाजवली आणि तेव्हा भारतात आले टेलिफोन.

कम्युनिकेशन क्षेत्रात क्रांती आली. प्रत्येकाच्या घरात फोन आले त्या पाठोपाठ हातात मोबाईल आले.

लाखो करोडो पत्रांची उलाढाल करणारे टपाल खाते हळूहळू ओस पडू लागले. मग आल इंटरनेट. whatsappच्या युगात तर आजकालच्या पोरांनी पोस्ट ऑफिसचं खाकी वातावरण पाहिलं पण नसेल. आज आपल्याकडे पोस्टमन येतात ते फक्त  बिलं ऑफिशियल लेटर घेऊन.

एक लाख ५५ हजार ३३३ टपाल ऑफिस द्वारे चालणारा पोस्ट खात्याचा कारभार हे जगातील अशा प्रकारचे सर्वात मोठे जाळे.

त्यांची कामे कमी झाल्यामुळे एवढ्या मोठ्या नेटवर्कला पोसणे सरकारला जड होत होते. पोस्त ऑफिस बँक, आधार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र हे त्यांच्याशी डायरेक्ट संबंध नसलेले उदयोग त्यांच्या गळ्यात मारण्यात आले.  काही वर्षांनी भारतीय टपाल सेवा बंद होईल अथवा तिचं खासगीकरण होईल हे आपण मनाशी ठरवूनच टाकलं होत.

पण जिद्दी पोस्ट खात्याने पण हार मान्य केली नाही आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे जो बदलत नाही त्याचा डायनासोर होतो असं डार्विनबाबा सांगून गेला आहे.

आता पोस्टखात ऑनलाईन शॉपिंगच्या महाक्षेत्रात उतरत आहे. फ्लिपकार्ट अमॅझोन पेटीएम अशा इ कॉमर्स मधल्या तरूण तुर्कांना लढा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पोस्ट ऑफिसचं रुपडं बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

https://ecom.indiapost.gov.in

ही आहे वेबसाईट जेथे तुम्हाला कपडे, ज्वेलरी, बॅग्स, हँडलूम प्रोडक्ट्स सगळ काही घरबसल्या खरेदी करता येणार आहे आणि या सगळ्या खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करणार पोस्ट खातं. इथे छोटे उद्योजक , गृह उद्योग वाल्या महिला, स्वयं साह्यता ग्रुप, छोटे कारागीर अशांच्या वस्तूंना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.

आपली वस्तू पोस्टाच्या वेबसाईटवर विकण्यासाठी पहिले ६ महिने रजिस्ट्रेशन फ्री आहे. ग्राहकांना वस्तू परत करयाची जरी असेल तरी ती सोय सुद्धा या वेबसाईटवर देण्यात आली आहे. भारतीय टपाल सेवेच्या स्पीड पोस्ट या नेटवर्कचा वापर ई कॉमर्सची सेवा देण्यासाठी वापरण्यात येत आहे.

पोस्टखाते ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रात आले तरी आहे पण ग्राहकांना खुश करण्यासाठी बिग बिलियन डे, ग्रेट इंडियन शॉपिंग सेल सारखे आकर्षक सेल घेऊन यावे लागेल. नाही तर पोस्टमन मामांची सायकल फिल्पकार्ट अमॅझोनच्या रेस मध्ये परत मागे पडून जाईल.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.