युनिकॉर्न स्टार्टअप कंपन्यांत इंग्लंडला मागे टाकत भारत तिसरा आलाय

गुगलचा सीईओ भारतीय झाला आपण जाम खुश झालो. मायक्रोसॉफ्टचा सीईओ भारतीय झाला पुन्हा आपण कॉलर टाईट केली. परवा तो अग्रवाल ट्विटरचा सीईओ झाला तेव्हा ह्यो पण आमचाच म्हणत ट्विटर- फेसबुकवर आपल्या भारतातल्या लोकांनी त्याला भरभरून हार-तुऱ्याचे इमोजी वाहिले. पण ही सगळी लोकं राहतात अमेरिकेत, पैसे कमवतात अमेरिकेच्या कंपनीसाठी आणि ह्या कंपन्या या भारतीय सीईओंच्या नावाचा उपयोग करून भारतात आपलं मार्केट वाढवतायेत याची सल आपल्यातल्या अनेकांनी बोलून दाखवली. 

पण लय लोड घेऊ नका. भारतातल्या पण कंपन्या या कंपन्यांना टक्कर द्यायला आता पुढं आल्यात. आयआयटी-आयआयएमची पोरं भारतात राहूनच स्टार्ट-अप काढायला लागलेत. बंगलोरला तर आता भारताचं सिलिकॉन व्हॅली म्हणायला लागलेत. 

अशीच एक भारी बातमी आलेय.

हारुन इंडिया या संस्थेनं काढलेल्या लिस्टनुसार भारतात जगातले तिसरे सगळ्यात जास्त ‘युनिकॉर्न’ आहेत. 

आता ‘युनिकॉर्न’ म्हणजे काय ते पहिलं समजून घेऊ?     

ज्या स्टार्ट-अप कंपन्यांचं व्हॅल्युएशन एक बिलियनपेक्षा जास्त असतं त्यांना ही बिझनेस आणि फायनान्स मधली लोकं ‘युनिकॉर्न’ म्हणतात. अशा कंपन्या शेअर बाजारात अजून लिस्टेड झालेल्या नसतात. मोठ-मोठ्या गुंतवणूकदारांनी या कंपन्यांवर पैसे लावलेले असतात.

भारतात अशीच युनिकॉर्नसची लाट आलेय. सध्या भारतात ५४ युनिकॉर्न आहेत.

ह्यातले ३३ तर २०२१ मध्येच ऍड झालेत. अमेरिका आणि चीन नंतर आज सगळ्यात जास्त युनिकॉर्न भारतात आहेत. औद्योगिक क्रांतींनंतर शेकडो वर्षे आपल्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा टेम्बा मिरवणाऱ्या ब्रिटनला भारतानं मागं टाकलंय.

आता भारतात सगळ्यात जास्त युनिकॉर्न कुठल्या शहरात आहेत तर त्याचं सरळ सोप्पं उत्तर बेंगलोर असं आहे. बंगलोरमध्ये भारतातले अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे २८ युनिकॉर्न आहेत.

सगळ्यात जास्त युनिकॉर्न असलेल्या शहरात बंगलोर जगात सातवं आहे.

त्यामुळं डिग्री घेऊन अमेरिकेत पाळणारी लोक आता बेंगलोरकडे वळायला लागल्याचं सांगितलं जातंय.

आता बघूया भारतातल्या सगळ्यात मोठ्या युनिकॉर्न नक्की कोणत्या आहेत?

तर BYJU’S भारतातली सगळ्यात जास्त वॅल्युएशन असलेली युनिकॉर्न आहे. या कंपनीचं वॅल्युएशन $२१बिलियन असल्याचं सांगण्यात येतंय. त्या खालोखाल In-Mobi या इंटरनेटवरील जाहिराती मॅनेज करणाऱ्या कंपनीचा नंबर लागतो. OYO चा वापर तर एवढा वाढलाय की त्याचं वॅल्युएशन $९.५ बिलियन झालंय. मग पुढं ओला,फार्म इझी,ड्रीम -११,स्वीगी, क्रेड, रेझर-पे हे एकेकाळी स्टार्टअप म्ह्णून झालेल्या पण आता बिलियन डॉलरची किंमत झालेल्या कंपन्यांचा नंबर लागतो.

भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण आपल्या लोकांनी यशस्वी स्टार्ट-अप काढलीयेत. भारताच्या बाहेर जवळपास ६५ स्टार्टअप भारतीयांची आहेत. त्यातली सगळ्यात जास्त अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये युनिकॉर्नच्या वाढण्याची संख्या कमी झालेय. भारतात मात्र ही संख्या वाढतेय. याचा अर्थ या दोनच देशात गुंतवणूक करणारे गुंतूंवणूकदार आता भारताकडे वळल्याचं सांगण्यात येतंय.

भारतान सरकारनं चालवलेल्या स्टार्टअप इंडिया स्टॅंडअप इंडिया सारख्या योजनांनाही याचं श्रेय दिलं जातंय.

ते काही असुद्या पण भारतात एवढ्या मोठ्या कंपन्या ही खरी आपण खुश होण्याची गोष्ट आहे. बाकी ह्या युनिकॉर्नमधल्या कोणत्या एका यशस्वी स्टार्टअपची स्टोरी तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.