सरकारे बदलली पण भारत-रशिया फ्रेंडशिप कायम आहे. हे कधी पासून झालं ?
सध्याच्या जागतिक राजकारणात भारताचा बोलबाला आहे. इस्रालयचे पंतप्रधान तर आपल्या मोदीजींना तुम्ही इथे निवडणूक लढवला तरी निवडून याल असं म्हणतायेत. अमेरिकेचे बायडन असोत किंवा रशियाचे पुतीन भारताला आपला दोस्त मानत आहेत. कोणीहि भारताला आता कमी लेखू शकत नाही.
तस बघायला गेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय समीकरणे झटक्यात बदलत असतात. अनेक देश मित्र होतात आणि अनेकदा मैत्री तुटते. सरकारे बदलली तरी त्याचा परिणाम दोन देशातील मैत्रीवर होत असतो.
पण इतक्या वर्षात एक मैत्री आहे ती आजही कायम राहिली आहे.
ती मैत्री आहे भारत आणि रशिया.
आंतराष्ट्रीय राजकीय पटलावर महत्वाचा ठरलेला भारत- सोव्हिएत रशिया शास्त्रास्त्रविषयक करार १९६३ साली झाला. त्यानंतर १९६४ – ६५ च्या दरम्यान या कराराला पूरक असे तीन करार झाले. या करारांद्वारे त्या काळात भारताला सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने आपली संरक्षणसिद्धता वाढवणं शक्य झालं.
१९५५ मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सोव्हिएत रशियाचा दौरा आणि त्यापाठोपाठ क्रुश्चेव्ह आणि बुल्गानीन या सोव्हिएत नेत्यांचा भारतदौरा यांमधून उभय देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधांची रुजवण झाल्यानंतर पुढील पाऊल म्हणून हा शस्त्रास्त्रविषयक करार झाला.
अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीतयुद्धाच्या प्रारंभीच्या काळात सोव्हिएत नेत्यांचा कल विश्वासार्ह अशा बिगर-कम्युनिस्ट देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध स्थापन करण्याकडे होता. जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या अलिप्ततावादी चळवळीमध्ये आफ्रिका आणि आशिया खंडांतील नव्याने स्वतंत्र झालेले अनेक देश सहभागी झाले होते.
भारताच्या माध्यमातून या देशांशी चांगले संबंध स्थापन करण्याचा मार्ग सोव्हिएत नेत्यांना दिसत होता. त्याचप्रमाणे भारताने स्वीकारलेलं लोकशाही समाजवादी धोरण, अवजड उद्योगांच्या उभारणीत सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग, पंचवा्षिक योजनांद्वारे आर्थिक नियोजन अशा बाबींमुळे सोव्हिएत नेत्यांमध्ये भारताविषयी अनुकूलता निर्माण झाली होती.
याउलट त्या काळात पाकिस्तान अमेरिकाधार्जिण्या आशियातील राष्ट्र-आघाडीमध्ये शिरकाव करण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याच द्रष्टीने पाकिस्तानने अशा देशांमध्ये झालेल्या ‘मध्य आशियाई राष्ट्रयुती करार’ (सेंटो) व ‘आग्नेय आशियाई राष्ट्रयुती करार'(सीटो) यांसारख्या करारांना मान्यता दिली होती.
या करारांनुसार इतर सदस्य देशांप्रमाणे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळू लागली होती. पाकिस्तान या शस्त्रसामर्थ्याचा वापर भारताविरोधात करेल, अशी भारताला शंका होती; तर याचमुळे सोव्हिएत रशियाच्या पाकिस्तान जवळच्या भागालाही धोका संभवू शकतो, अशी रशियालाही आशंका होती. एकंदरीत, दोन्ही देशांतील सत्ताधारी या कारणामुळे परस्पर सहकार्याचा गांभीर्याने विचार करू लागले होते.
युद्धातील पीछेहाट भारताबाबतीत आणखी एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे १९६२च्या भारत-चीन युद्धात भारताच्या संरक्षण- सज्जतेमधील उणिवा स्पष्ट झाल्या होत्या. या संघर्षादरम्यान सोव्हिएत रशियाने सावध भूमिका घेतली होती.
वास्तविक, या युद्धापूर्वी म्हणजे १९५९ मध्ये भारताने रशियासोबत करार केला होता, पण त्याद्वारे रशियाने प्रत्यक्ष शस्त्रास्तमदत करण्याऐवजी सीमेलगतच्या प्रदेशात रस्ते बांधण्यासाठी हेलिकॉप्टर्स, मालवाह विमाने आणि यंत्रसामग्री या स्वरूपात मदत देऊ केली होती. पूढे १९६२च्या लढाऊ ‘मिग” विमानांचा कारखाना उभारण्यास मदत करण्यासाठी सोव्हिएत रशियाने संमती दिली होती, पण युद्ध होईपर्यंत ती प्रत्यक्षात आली नव्हती. फ्रान्स-इंग्लंडकडून लढाऊ विमानांची केलेली खरेदी पूरेशी ठरली नव्हती.
अमेरिकेने युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात मदत देण्याची तयारी दर्शवली, तरी भारतात आपले तळ निर्माण करण्याच्या दृष्टीने काही अटी पुढे केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर, भारताला चीनयुद्धात शस्त्रसज्जतेच्या अभावी पीछेहाट पत्करावी लागली होती. त्यामुळेच
युद्धानंतर मात्र भारताने जलद पावलं उचलून रशियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र मिळवण्याच्या द्रष्टीने प्रयत्न सुरू केले.
आधीचं म्हटल्याप्रमाणे, अमेरिकेच्या आशियातील वाढत्या हस्तक्षेपाच्या व शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर, राजकीय संतुलनाकरता रशियालाही भारतासोबत मैत्रीसंबंध दृढ करणं आवश्यक झालं होतं.
राजकीय अपरिहार्यतेपोटी उभयसंमत करार या सर्व पार्श्वभूमीवर, भारत व रशिया या दोन देशांना राजकीय अपरिहार्यतेपोटी उभयसंमत करार करणं आवश्यक झालं आणि चीन- युद्धानंतर अल्पावधीतच म्हणजे १९६३ मध्ये भारत-सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये शस्त्रास्त्रविषयक व्यापक करार झाला.
या करारानुसार, सोव्हिएत रशियाने मिग विमानांच्या उत्पादनासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यासाठी भारताला सहाय्य करणं; तसंच लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स, रणगाडे, रडार यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं, क्षेपणास्त्रवाहू जहाजं, पाणबुङ्या आदी सामग्रींचा पुरवठा करणं यासाठी मान्यता दिली.
या कराराला आनुषंगिक असे शस्त्रास्त्र पुरवठ्यांचे करार ऑगस्ट १९६४, ऑगस्ट १९६५ व नोव्हेंबर १९६५ मध्ये करण्यात आले. त्यानुसार भारताला सोव्हिएत रशियाकडून शस्त्रास्त्रं आणि लष्करी साधनसामग्री मिळाली. त्याचप्रमाणे मिग विमानांची निर्मिती भारतात सुरू झाली.
या करारांमुळे उभय देशांमध्ये मैत्रीपर्व सुरू झालं. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धात भारताला या कराराद्वारे शक्य झालेल्या शस्त्रसज्जतेचा उपयोग झाला व पाकिस्तानची आक्रमण परतवून लावणं शक्य झालं.
हे ही वाचं भिडू :
- रशियाच्या एस -४०० मिसाईलवरून भारत -अमेरीका संबंध धोक्यात आहेत
- पाकिस्तान रशियाची नवी फ्रेंडशिप भारताला टेन्शनचं कारण ठरतेय..
- रशियात देखील प्रसिद्धी मिळवलेले अण्णा भाऊ साठे एकमेव भारतीय साहित्यिक होते.