सगळीकडे चर्चा तर आहे, पण भारतानं कॉमनवेल्थ गेम्समध्ये नक्की काय काय मिळवलंय ?

सकाळी सकाळी आमच्या कट्ट्यावर चर्चा रंगली होती, चर्चेचा विषय होता लॉन बॉल्स हा खेळ. पार्किंगमधल्या जागेतही क्रिकेटच खेळणारी पोरं जेव्हा लॉन बॉल्ससारख्या खेळाबद्दल बोलत असतात म्हणजे विषय डीप असतोय. सूर्यकुमार यादवनं मारलेल्या सिक्सपेक्षा जास्त चर्चा शरथ कमलच्या टेबल टेनिसची असते, म्हणजे विषय डीप असतोय. हा सगळा डीप विषय शक्य होतोय कॉमनवेल्थ गेम्समुळं.

आमची चर्चा ऐकून एक गडी म्हणला, ‘कॉमनवेल्थमध्ये खेळणं हे भारतासाठी लाजिरवाणं आहे.’ आता हे कॉमनवेल्थ म्हणजे नक्की काय असतंय ? त्या गड्याच्या बोलण्यात तथ्य आहे का ? भारतानं यावर्षीच्या स्पर्धेत काय यश मिळवलंय ? आणि अजून कुणाला मेडलचे चान्सेस आहेत ? याची माहिती घेऊ.

कॉमनवेल्थ म्हणजे काय ?

हा आपल्याला पडणारा सगळ्यात बेसिक प्रश्न असतो. तर कॉमनवेल्थची स्थापना १८९७ साली तत्कालीन ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिनं केली. ब्रिटनची एकाधिकारशाही मान्य करायला काही वसाहतींनी विरोध करायला सुरवात केली होती. विशेषतः ऑस्ट्रेलिया, कॅनडा या गोऱ्या लोकांची संख्या जास्त असणाऱ्या वसाहतींमधूनही राणीच्या एकछत्री कारभाराला विरोध सुरू झाला होता. मग यावर एक तोडगा म्हणून राणीनं कॉमनवेल्थची संकल्पना आणली. यानुसार काही वसाहतींना मर्यादित स्वराज्य देण्यात आलं.

त्यानंतर १९३१ मध्ये पहिल्या महायुद्धानंतर वाढत्या राष्ट्र्वादामुळं ऑस्ट्रेलिया, कॅनडा, साऊथ आफ्रिका या वसाहतींना ब्रिटननं बरोबरीचा दर्जा दिला. अशाप्रकारे १९३१ ला ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्सची ऑफिशियली स्थापना झाली.

यातल्या सदस्यांना बरोबरीचा दर्जा मिळाला असला, तरी त्यांच्या देशाची प्रमुख मात्र ब्रिटनचा राजाच होता.

भारताचा कॉमनवेल्थ नेशन्समध्ये जायला विरोध होता, कारण भारताची मागणी होती पूर्ण स्वराज्याची. बैठकींना उपस्थित राहूनही भारत ब्रिटिश कॉमनवेल्थमध्ये जाणार नाही अशी भूमिका भारतानं घेतली.

पुढं १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तानचीही निर्मिती झाली. मात्र १९४९ च्या कॉमनवेल्थ पंतप्रधानांच्या परिषदेत भारताला प्रजासत्ताक राहूनही कॉमनवेल्थचा सदस्य राहण्याची सूट मिळाली. यामुळं भारताच्या निर्णयप्रक्रियेत ब्रिटिशांचा कोणताही हस्तक्षेप राहणार नव्हता, अगदी नावालाही ब्रिटिश सत्ताधीश भारताचे प्रमुख होणार नव्हते. त्यामुळं संपूर्ण स्वातंत्र्य आणि देश प्रजासत्ताक झाल्यानंतरच भारत कॉमनवेल्थमध्ये समाविष्ट झाला.

मग हाच कित्ता ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या इतर देशांनीही गिरवला. सध्या कॉमनवेल्थमध्ये असलेल्या १६ देशांची प्रमुख ही युनायटेड किंगडमची राणी आहे. ज्यात अर्थातच भारताचा समावेश नाही.

उलट भारतानं स्वातंत्र्य आणि सगळे हक्क मिळवल्यानंतर अगदी चाणाक्षपणे कॉमनवेल्थमध्ये प्रवेश केला. त्यामुळं कॉमनवेल्थमध्ये कधीकाळी ब्रिटिश अधिपत्याखाली असलेले देश असले, तरी त्यात लाजिरवाणं काही नाही, उलट इंग्लंडसह इतर देशांना भारतीय खेळाडू मागे टाकतायत या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे अभिमान.

दर ४ वर्षांनी होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात झाली, ती १९३० पासून. १९३४ मध्ये भारतानं या गेम्समध्ये सहभाग नोंदवला होता. त्या स्पर्धेत कुस्तीपटू राशिद अन्वर यांनी भारताला पहिलंवहिलं कॉमनवेल्थ मेडल जिंकून दिलं होतं. 

२०१० मध्ये दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा भारतासाठी सर्वात यशस्वी ठरल्या होत्या, जिथं भारतानं ३८ गोल्ड मेडल्ससह १०१ मेडल्स कमावले होते.        

आता येउयात सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्सकडं.

बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये ७२ टीम्सचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं मेडल मिळवून दिलं, ते आपल्या सांगलीच्या पोरानं. वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजनी गटात संकेत सरगरनं सिल्व्हर मेडल जिंकलं. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी धुव्वा करायला सुरुवात केली. हा लेख लिहीपर्यंत भारताच्या नावावर, ५ गोल्ड, ५ सिल्व्हर आणि ४ ब्रॉंझ अशी एकूण १४ पदकं जमा आहेत. 

भारतानं सर्वात जास्त यश कुठल्या खेळात मिळवलं असेल, तर ते आहे वेटलिफ्टिंग. पदकाची सुरुवातच वेटलिफ्टिंगपासून झाल्यानंतर मीराबाई चानू, जेरेमी लालनिरुंगा, अचिंता शेलुली या तिघांनी गोल्ड मेडल, विकास ठाकूर, बिंद्रायनी देवी, संकेत सरगर या तिघांनी सिल्व्हर आणि लव्हप्रीत सिंग, हरजिंदर कौर आणि गुरुराजा पुजारी या तिघांनी ब्रॉंझ मेडल जिंकलंय. १४ पैकी ९ मेडल्स तर फक्त वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत.

त्यानंतर भारतानं लक्ष्यवेधी यश मिळवलं ते लॉन बॉल्समध्ये. 

भारतात हा खेळ फारसा माहिती नव्हता. खरंतर या खेळाला सरकारकडूनही मदत मिळत नाही, तरीही महिलांचा लॉन बॉल्सचा संघ २०१० पासून प्रत्येक कॉमनवेल्थ गेम्समध्ये भिडत आलाय. सलग तीनदा मेडलनं हुलकावणी दिल्यानंतर भारतीय महिलांनी यंदा वुमन फोर्स या प्रकारात गोल्ड मेडल जिंकलं. लव्हली चौबे, रूपा राणी, पिंकी सिंग आणि नयनमोनी सायकिया या चौघींनी आफ्रिकेचा १०-१७ असा धुव्वा करत गोल्ड जिंकलं. कित्येक भारतीयांनी पहिल्यांदाच लॉन बॉल्सची मॅच मन लाऊन पाहिली.

पुरुषांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला आपलं गोल्ड मेडल राखता आलं, शरथ कमल अचंता, साथियन गणानाशेखरन, सनिल शेट्टी आणि हरमीत देसाई हा भारताचा सुवर्ण विजेता संघ. 

मिक्स्ड बॅडमिंटनमध्ये भारताचं गोल्ड मेडल अगदी थोडक्यात हुकलं, १० जणांच्या संघानं शर्थीची झुंज दिली, पण सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं.

 ज्युडोमध्येही भारतानं दोन पदकांची कमाई केली. ६० किलो वजनी गटात विजय कुमार यादवनं ब्रॉन्झ, तर ४८ किलो वजनी गटात सुशीलादेवीनं सिल्व्हर मेडल जिंकलं.

पण भारताची मेडल टॅली इथंच थांबत नसते, हे फिक्स. 

कारण अजूनही बऱ्याच खेळांच्या स्पर्धा बाकी आहेत, ऍथलेटिक्समध्ये तेजस्विन शंकर, अविनाश साबळे, हिमा दास, द्युती चंद. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा. बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक मेडलिस्ट लव्हलीना बोर्गोहेन, कॉमनवेल्थ मेडलिस्ट अमित पंघाल, मोहम्मद हसमुद्दीन मेडलचे दावेदार आहेत. शिव थापा आणि निखत झरीनही बॉक्सिंगमध्ये मेडल जिंकू शकतात.

महिलांच्या क्रिकेटमध्येही पदक जिंकण्याच्या आशा आहेत. कुस्तीमधली लिस्ट विनेश फोगट, बजरंग पुनिया, रवीकुमार दहिया, साक्षी मलिक अशी लई मोठी आहे. टेबल टेनिस, स्क्वॉश, स्विमिंग, हॉकी, जिम्नॅस्टिक या खेळांमध्येही भारताला पदकाची संधी आहे.

त्यामुळं भारत क्रिकेट सोडून कुठल्या खेळात पुढं आहे का ? या प्रश्नाचं संदर्भासहित स्पष्टीकरण आपल्याला भारतीय खेळाडू येत्या ८ ऑगस्टपर्यंत देतील यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं आणखी कोणते खेळाडू मेडल जिंकू शकतील ? भारत एकूण किती मेडल्स जिंकेल ? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.