कोविडच्या शॉक नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेची गाडी सुसाट सुटलीय

एक भारतीय म्हणून आपल्या जास्त कोणी हिणवलं असेल तर ते गोऱ्या इंग्रजांनी. त्यांनी भारतावर १५० वर्ष राज्य केलं आणि भारताला कंगाल करुन सोडलं. ज्या भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, त्या भारतावर स्वातंत्र्य मिळाल्यावर अमेरिकेचा लाल गहू खाण्याची वेळ आणली होती या ब्रिटिशांनी.

त्यामुळे ब्रिटिश चोर होते. आणि त्यांना कमीपणा देणं हे प्रत्येक भारतीयाला आवडत. असाच एक कमीपणा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ब्रिटिशांना आलाय.

तर कोरोनाच्या संकटाने जगाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं. जवळपास सर्वच देशांची अर्थव्यवस्था यामुळे खिळखिळी झाली. यातून आता पुन्हा एकदा हळू हळू जनजीवन सुरळीत होत असताना ओमिक्रॉनने डोकं वर काढलं.

पण भारतासाठी एक दिलासादायक गोष्ट घडलीय. ती म्हणजे भारताची अर्थव्यवस्था फ्रान्स आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी सहावी अर्थव्यवस्था बनायला चाललीय. होय, एका रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली आहे. यात म्हटलं आहे की,

नव्या वर्षात भारत फ्रान्सला मागे टाकेल तर ब्रिटनला २०२३ मध्ये मागे टाकून जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. 

ब्रिटिश कन्सल्टन्सी CEBR या संस्थेनं नुकताच एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्यानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ पुन्हा एकदा वेगाने होत आहे. लवकरच भारत फ्रान्स आणि ब्रिटनला मागे सोडून जीडीपीच्या बाबतीत टॉप फाइव्हमध्ये झळकू शकतो.

कोरोनाच्या संकटाआधी भारताने फ्रान्स आणि ब्रिटनला मागे टाकलं होतं. मात्र कोरोनाचा फटका बसल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला. तर जीडीपी शून्यापेक्षा खाली गेला होता. यामुळे भारताची घसरण झाली होती.

इंवेस्टोपेडियाच्या आकडेवारीनुसार सध्या भारत, फ्रान्स आणि ब्रिटन हे तिन्ही देश तीन ट्रिलियन डॉलरपेक्षा कमी अर्थव्यवस्थेच्या गटात आहेत. फ्रान्स आणि भारतातील अंतर कमी आहे. दोन्ही देश हे २.७ ट्रिलियन डॉलरपेक्षा थोडे मागे आहेत. तर ब्रिटनचा जीडीपी २.७ ट्रिलियन डॉलरपेक्षा कमी आहे. पुढच्या वर्षात भारताची अर्थव्यवस्था ३ ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचण्याचा अंदाज आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील हे अंतर भारत २०२३ पर्यंत पार करेल असंही म्हटलं जात आहे.

मात्र CEBR च्या रिपोर्ट नुसार चीनला मागे टाकण्यासाठी भारताला आणखी काही काळ वाट पहावी लागेल. तर चीनला सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी २०३० पर्यंत वाट बघावी लागेल असा अंदाज रिपोर्टमध्ये व्यक्त केला आहे.

अमेरिकेत महागाई ६.८ टक्क्यांवर पोहोचली आहे. २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसमोर महागाईची मोठी समस्या होती असंही CEBR चे उपाध्यक्ष डग्लस मॅकविल्यम्स यांनी म्हटलं आहे. CEBR ने इतर देशांच्या इकॉनॉमीबद्दलही अंदाज वर्तवला आहे. त्यात जर्मनी सध्या सकारात्मक वाटचाल करत असून २०३० पर्यंत जपानला मागे टाकू शकते. तर रशिया २०३६ पर्यंत जगातील टॉप १० अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचेल आणि इंडोनेशिया २०३४ पर्यंत नववे स्थान गाठेल असंही रिपोर्टमध्ये म्हटंल आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.