UAE हा देश आणि सात किंगडम, नव्या राष्ट्रपतींच्या पार्श्वभूमीवर त्यांची सिस्टीम समजून घ्या..

संयुक्त अरब अमिरात म्हणजे यूएई देशाचे राष्ट्रपती शेख खलिफा जायद अल नाह्यान यांचं नुकतंच निधन झालं. त्याबद्दल यूएईने ४० दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. शेख खलिफा जायद यांच्या मृत्यूने भारताने पण एका दिवसाचा दुखवटा जाहीर केला गेला होता. 

अबुधाबीचे क्राऊन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान हे यूएईचे नवीन राष्ट्रपती झाले.

 दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकतूम जे सध्या यूएईचे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्याबरोबर मिळून ते यूएईचा गाडा हाकतील.

असा हा सगळं घटनाक्रम आहे.

पण ह्यामध्ये गोंधळ आहे तो म्हणजे अबुधाबी, दुबई आणि संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई यामध्ये काय फरक आहे. 

कारण पहिल्यापासून अबुधाबी, दुबई हे देश आहेत का शहरं यात गोंधळ होताच त्यात यूएई हा देश असल्याचं कळल्यानं तर डोक्याचं दही झालं असेल. तर ही पहिली सिस्टिम काय आहे आणि ते कशी झाली हे बघून घेऊ.

तर यासाठी थोडं इतिहासात मागं जावं लागेल. 

जास्त नाही तर १९५०-६० च्या दशकात. ब्रिटिशांनी इथून पुढं आम्ही तुमचं रक्षण करू शकत नाही असं म्हणत अरब पेनिन्सुलामधल्या अनेक छोट्या छोट्या किंग्डमना ब्रिटिशांनी एकाकी वाऱ्यावर सोडलं होतं. त्यातच बाजूच्या सौदी अरेबियाने या छोट्या राज्यांच्या सीमांमध्ये घुसखोरी करण्यास सुरवात केली होती. त्यामुळं या छोट्या राज्यांना स्वतःच्या सुरक्षेतेसाठी काही उपायोजना करणं आवश्यक होतं. 

१९७१ मध्ये ब्रिटिशांनी देश सोडायच्या आधी त्यांना त्यांच्या सुरक्षितेची सोय करायची होती आणि ते स्वतंत्र देश राहून करणं शक्य नव्हतं. त्यातच अबुधाबीमध्ये तर तेलाचे साठे पण सापडले होते. 

मग अबूधाबीचे राजे शेख झायेद बिन सुलतान नाह्यान यांनी या सर्व छोट्या राज्यांना म्हणजेच अमिरातींना एकत्र करून एका संघराज्याची स्थापना करण्याची योजना आखली.

त्यांनी दुबईचे राजे शेख रशीद बिन सईद अल मकतूम यांना हाताशी घेतलं आणि आजूबाजूच्या इतर अमिरातींना एकत्र करून संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएईची स्थापना करायचं ठरवलं.

सुरवातीला UAE हे नऊ अमिरातींना एकत्र आणून बनणार होतं.

ज्यात अबूधाबी, दुबई, शारजाह, रस अल खैमाह, फुजैराह, उम्म अल क्वावेन, अजमान, बहरीन आणि कतार यांचा समावेश होता. मात्र बेटांची गुंतागुंत आणि सीमावादामुळे बहरीन आणि कतार यांनी एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला आणि उर्वरित सात अमिरातींनी युती केली.

२ डिसेंबर १९७१ ला शारजाह, फुजैराह, अजमान ,फुजैराह,अबू धाबी आणि दुबई एकत्र आले व त्यांनी आणि संयुक्त अरब अमिराती तयार करण्यासाठी युनियनच्या कायद्यावर स्वाक्षरी केली.

अशाप्रकारे यूएई हा देश अस्तित्वात आला.

म्हणजेच ७ छोट्या राज्यांचा मिळून एक देश. प्रत्येक राज्याचे स्वतःची कायदे आहेत, स्वतःची राजघराणं आहे.

मात्र देश बनवण्यासाठी पॉलिटिकल सिस्टम बनवणं आवश्यक होतं. देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान निवडणं आवश्यक होता. मग या देशाचं संविधान करून राष्ट्रपती, पंतप्रधान निवडण्याची सिस्टिम बनवण्यात आली. त्यानुसार या सात अमिरातींचे प्रमुख एकत्र येऊन त्यांच्यापैकी एकाची राष्ट्रपती म्हणून निवड करतात. या राष्ट्रपतींची निवड ही  पाच वर्षांसाठी असते.

त्यात अबुधाबी आणि दुबई ही सर्वात समृद्ध आणि मोठी असल्याने यूएईच्या या सिस्टममध्ये त्यांचाच दबदबा आहे.

यामुळे राष्ट्रपती हा नेहमी अबुधाबीच्या नाह्यान घराण्याचा होतो तर उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानपद दुबईच्या अल मकतूम घराण्याकडं असतं.

यामुळंच अबुधाबीचे क्राऊन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान हे यूएईचे नवीन राष्ट्रपती झाले आहेत. 

२०१४ मध्ये स्ट्रोक आल्यानंतर शेख खलिफा यांची तब्येत बिघडली तेव्हापासून शेख मोहम्मद हे अबुधाबीचं कामकाज सांभाळत होते.

शेख मोहम्मदच्या नेतृत्वाखालीच यूएईने त्यांचा पहिला माणूस अंतराळात पाठवला आहे, पहिली अणुभट्टी उघडली आहे आणि तेलाच्या ताकदीच्या जीवावर अबुधाबीला आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थान मिळवून दिलं आहे.

MBZ या टोपणनावाने ओळखले जाणारे मोहम्मद बिन जायद त्यातल्या त्यात थोड्या खुल्या विचारांचे असल्याचे मानले जातात. त्यांच्याच कार्यकाळात अबुधाबीमध्ये यूएईमधल्या पहिल्या हिंदू मंदिराची पायाभरणी झाली आहे. 

मोहम्मद बिन जायद यांनी या मंदिरासाठी देणगी देखील दिली होती.

 

एवढंच नाही तर भारत यूएई यांचे परराष्ट्र संबंध देखील मोहम्मद बिन जायद यांच्या काळात एका वेगळ्या उंचीवर गेले आहेत. त्याचं एक उदाहरण द्यायचं झाल्यास इंडिया-यूएई कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप या करारच घेता येइल. 

इंडिया-यूएई कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप हा गेल्या दशकात भारताने कोणत्याही देशासोबत केलेला पहिला पूर्ण मुक्त व्यापार करार आहे. 

या कररारामुळे भारताला जो यूएईशी व्यापार करताना जो प्राधान्यक्रम मिळणार आहे त्याचा भारतातून निर्यात होणाऱ्या रत्ने आणि दागिने, कापड, चामडे क्रीडा वस्तू, प्लास्टिक, फर्निचर, कृषी आणि लाकूड उत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि ऑटोमोबाईल्स य क्षेत्रांना फायदा होणार आहे.

याआधीच भारतातुन निर्यात होणाऱ्या देशांमध्ये यूएई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

त्यात अजूनच भर पडेल.

यूएई हा भारतातील आठ सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे ज्याची अंदाजे $18 अब्ज गुंतवणूक आहे.

शिवाय, भारत आणि यूएईने अलीकडेच एक सामंजस्य करार (MoU) केला आहे ज्याद्वारे यूएईने भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी $७५अब्ज गुंतवणूक करणार आहे. यूएई हा भारताच्या इंधन पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा देश आहे.

तसेच भारतातील लोकं मोठ्या प्रमाणात कामासाठी यूएईला स्तलांतरित झाले आहेत. त्यांनाही ह्या संबंधांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आता मोहम्मद बिन जायद देशाचे राष्ट्रपती झाल्याने हे संबंध असेच वाढतील अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.