अन् सचिन आऊट झाल्याची घोषणा पाकिस्तानच्या संसदेत देण्यात आली.. 

अजहर मेहमुद बॉलिंग करत होता, सचिन ४५ रन्सवर होता. सचिन आऊट झाला अन् पाकिस्तानात एकच जल्लोष झाला… 

अगदी त्यावेळी पाकिस्तानची संसद चालू होती. संसदेत एक वेगळा विषय चालू होता. वातावरण गंभीर होतं अन् अशा वातावरणात पाकिस्तानच्या सूचना मंत्र्यांनी घोषणा केली, सचिन आऊट झाला, त्या गंभीर वातावरणात देखील उत्साह दाटला. एकमेकांना मिठ्या मारून आनंद साजरा करण्यात येवू लागला… 

कारण ती मॅच देखील तशीच होती आणि ती वेळ देखील तशीच होती… 

१९९९ च्या मे महिन्यात पाकिस्तानच्या सैन्याने घुसखोऱ्यांच्या रुपात कारगिल ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर कारगिल युद्ध सुरु झालं आणि त्याच वर्षीच्या ८ जून रोजी भारत पाकिस्तानची मॅच होती. ती देखील वर्ल्डकपमधली मॅच. वर्ल्डकप म्हणल्यानंतर ही मॅच आपण हारली नव्हती याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल…. 

१९९९ चा वर्ल्‍डकप इंग्लडमध्ये होता.

एकूण १२ टिम होत्या त्यांना दोन गटामध्ये विभागण्यात आलं होतं. दोन ग्रुपमधून पहिल्या तीन-तीन देशांना सुपरसिक्समध्ये पोहचायचं होतं. भारत सुपरसिक्समध्ये पोहचली होती. सुपरसिक्समध्ये मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार होता. तो देखील कारगील युद्धाच्या पार्श्वभूमीवर. 

मॅचच्या सुरवातीलाच सौरव भाऊंनी कोळसा ओढलेल्या. पहिल्या सहा मॅचमध्ये सौरव भाऊंनी ३५० रन्स मारेलेल्या. पण या मॅचपुर्वी सौरव गांगुली आजारी पडला. त्याच्या आजारपणाची टिंगल झाली. पाकिस्तानी मिडायाने तर डिक्लेर करुन टाकलं की, 

शोएब अख्तरच्या बॉलिंगला घाबरून सौरव गांगुलीने आजारपणाची नाटकी सुरू केलीत.. 

सौरव गांगुली आणि सचिनची ओपनिंग ठरलेली होती, पण सौरवच्या जागी आला सदागोपन रमेश…

मॅच सुरू झाली त्याच वेळी दोन पाकिस्तानी प्रेक्षकांना स्टेडियमच्या बाहेर काढण्यात आलं. त्याचं कारण त्यांच्या हातात असणारा बोर्ड. या बोर्डवर लिहलं होतं की, 

वर्ल्डकप असो की कारगिल दोन्ही आमचंच… 

अशा वातावरणात मॅच सुरू झाली, दोन्ही बाजूच्या क्रिकेटरना आपण मॅच खेळणार आहोत की कारगिल युद्ध हे देखील समजत नव्हतं… 

ओपनिंगला सचिन आणि रमेश उतरले. ११ ओव्हरमध्ये ३७ रन्स झाल्या. रज्जाकच्या बॉलिंगवर रमेश २० रन्सवर आऊट झाला. त्यानंतर राहूल द्रविड आला. द्रविडने तेव्हा वर्ल्डकपमधल्या हाईएस्ट स्कोअर केलेला. सचिनसोबत ५० रन्सची पार्टनरशीप पुर्ण झाली. टिमचा स्कोर १ आऊट ९७ वर पोहचला. अशातच अजहरच्या बॉलवर सचिन कॅच आऊट झाला… 

पाकिस्तानात जश्न सुरू झाला. संसदेत आनंदाच वातावरण सुरू झालं.. 

जडेजा आला आणि ६ रन्स करुन गेला. द्रविडने अझरुद्दिनसोबत पुढे रन्स केल्या. भारताचा स्कोअर २२७ मध्ये आटोपला. द्रविडने ६१ तर अझरुद्दीने ५९ रन्स केल्या.. 

आत्ता पाकीस्तानची पारी आली… 

वसीम अकरम कॅप्टन होता. आपल्याकडे तेव्हा व्यंकटेश प्रसाद, श्रीनाथ, कुंबळे असे बॉलर होते. सुरवातीलाच अफ्रिदीला ६ रन्सवर श्रीनाथने तंबुत पाठवलं. इजाज अहमद ११, सलीम मलिक ६, सईद अनवर ३६, अजहर महमूद १० रन्सवर तंबुत गेले. तेव्हा पाकिस्तानच्या १०० रन्स देखील झाल्या नव्हता. व्यंकटेश प्रसादने या मॅचमध्ये २७ रन्स घेवून ५ विकेट घेतल्या. श्रीनाथ ने तीन आणि कुंबळेने दोन विकेट घेतल्या. १८० वर पाकिस्तान गारद झाली आणि भारत जिंकला… 

भारत पाकिस्तानच्या विरोधात जिंकल्यानंतर ते ही वर्ल्डकपमध्ये जिंकल्यानंतर काय होत हे वेगळं सांगायची गरज आहे का? कारगील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेव्हा भारतात एक्स्ट्रा दिवाळी साजरी झाली. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.