भारत-पाकिस्तानातला क्रिकेटमधला संघर्षसुद्धा आता देशांतर्गत टीकांपर्यंत आलाय…

भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक शत्रू आहेत याबद्दल कुणाचं काही दुमत असण्याचं कारणच नाही. हे शत्रूत्त्व आपण युद्धाच्या मैदानापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत जाताना आपण बघितलंय. आता हे खेळाच्या मैदानातलं शत्रूत्व तिथून बाहेर पडून देशांतर्गत टीकेपर्यंत पोहोचलंय.

नेमका विषय काय आहे? कोण टीका करतंय? आणि का टीका करतंय बघुया…

विषय सुरू इथून होतोय की, यंदाच्या वर्षी एकदिवसीय वर्ल्ड कप आणि एशिया कप या दोन्ही टुर्नामेंट्स होणार आहेत. खरंतर एशिया कप हा दरवर्षीच असतो. चा वर्ल्ड कप होस्ट करण्याचा मान यंदा भारताकडे आहे. म्हणजे यंदाचा वर्ल्ड कप हा भारतात होणार आहे. तर, पाकिस्तानकडून एशिया कप होस्ट केला जाणार आहे.

एशिया कप २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. तर वर्लडकप कधी होणार याबाबतच्या नक्की तारखा अजुन समोर आल्या नसल्या तरी, वर्ल्ड कप साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याची चर्चा आहे.

हे झालं दोन्ही टुर्नामेंट्सचं शेड्यूल, पण यात टीका आणि संघर्ष होण्यासारखी बाब म्हणजे भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात नाही. त्यामुळे मग यंदाच्या एशिया कपचं लोकेशन बदललं जाणार आहे अशा चर्चा सुरू आहेत.

खरंतर पाकिस्तानात एशिया कप खेळवला जाणार हे निश्चित झाल्यापासूनच बीसीसीआयचे सेक्रेटरी आणि एशियन क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय टीम पाकिस्तानला येणार नाही अशी भुमिका घेतली होती आणि ते त्या भुमिकेवर ठाम आहेत.

४ फेब्रुवारी रोजी एशिया क्रिकेट काउंसिलची मीटिंग झाली. त्यानंतर कोणतीही घोषणा करण्यात आली नाही मात्र, माध्यमांमध्ये अशी बातमी आली की, ‘यंदाच्या एशिया कपचं लोकेशन हे पाकिस्तान ऐवजी युएई केलं जाऊ शकतं.’ त्यामुळे, मग वादाला सुरूवात झाली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजे पीसीबी कडून असं म्हटलं जातंय, ‘जर भारतीय संघ पाकिस्तानला यायला तयार नसेल तर, आमचा संघसुद्धा भारतात येणार नाही.’ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी असं म्हटलंय,

“जर भारतीय संघ पाकिस्तानला येणार नसेल तर, आम्हीही वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही. आम्ही वर्ल्ड कपमधून माघार घेऊ.”

आता पाकिस्तानकडून एक असा सूर आळवला जातोय की, एशिया कप जर पाकिस्तानात झाला नाही तर वर्ल्ड कपही भारतात होऊ नये. त्यामुळे, क्रिकेटविश्वात बऱ्यापैकी तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

भारतीय संघ कधीपासून पाकिस्तानला जात नाही?

२००८ साली भारतीय संघ एशिया कपसाठी पाकिस्तानला गेला होता. त्यानंतर, भारतीय संघ पाकिस्तानला गेलेला नाही. २००६ साली भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये शेवटची बायलेट्रल सिरीज म्हणजे दोनच टीम्समधली सीरिज झाली होती.

२००६ नंतर भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांमध्ये मॅच झाली ती एकतर ग्लोबल टुर्नामेंट्स किंवा मल्टी टीम्स टुर्नामेंट्समध्ये.

बरं फक्त भारतीय संघच पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला जात नाही आणि बाकी सर्व संघांना कधीच काहीच अडचण आली नाही असं नाहीये. २००९ ते २०१९ या काळात पाकिस्तानमध्ये एकही इटरनॅशनल मॅच झाली नाही. त्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याचं कारण म्हणजे, २००९ साली पाकिस्तानात श्रीलंकन संघातील खेळाडूंवर झालेला हल्ला.

त्यामुळे, पाकिस्तान हा देश खेळाडूंसाठी असुरक्षित असल्याचं बोललं जातं. त्यातल्या त्यात भारत आणि पाकिस्तान मधले परंपरागत चालत आलेले वाद बघता  भारतीय संघ हा पाकिस्तानला जात नाही.

मागच्या वर्षी एशिया कप हा श्रीलंकेत होणार होता पण लोकेशन बदलण्यात आलं होतं.

श्रीलंकेत होणारा एशिया कप २०२२ हा मागच्या वर्षी युएईमध्ये पार पडला. त्यामागचं कारण म्हणजे, श्रीलंकेतलं अस्थिर वातावरण. श्रीलंकेत राजकीय, आर्थिक परिस्थिती ही बिकट होती.

पाकिस्तानातही सध्या अस्थिरता आहे.

आताच्या घडीला पाकिस्तानातल्या परिस्थितीचा विचार केला तर, आर्थिक दृष्ट्या पाकिस्तान अजिबात स्थिर नसल्याचं दिसतंय. त्यामुळे, मागच्या वर्षीचा एशिया कप ज्या निकषांच्या आधारावर री लोकेट करण्यात आला होता त्याच निकषांच्या आधारावर यंदाचाही केला जाऊ शकतो.

या विषयावर बोलताना माजी पाकिस्तानी खेळाडू जावेद मियांदाद यांचा जीभेवरचा ताबा सुटला. या विषयावर बोलताना  म्हणाले,

“त्यांना क्रिकेट खेळायला पाकिस्तानला यायचं नसेल तर, भारताने नरकात जावं. आसीसीने प्रत्येक संघासाठी सारखे नियम लावले पाहिजेत. जर भारतीय संघ अशा प्रकारे वागत असेल तर, त्यांच्यावर प्रतिबंध लावले गेले पाहिजेत.”

आतापर्यंत भारतातील कोणत्याही प्रतिनिधीकडून थेट प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी या वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.