आजही लोक प्रश्न विचारतात, भारतात पुढचा कपिल देव कधी जन्माला येणार ?

कपिल देव निखंज. गेल्या शतकातला सर्वोत्तम भारतीय खेळाडू. बेस्ट आॅल राऊंडर. भारताचा खऱ्या अर्थाने पहिला फास्ट बॉलर. त्याच्या आधी भारतात फक्त मध्यमगती गोलंदाज असायचे ज्यांच काम स्पिनर येईपर्यंत बॉल जुना करायचं. कपिल आल्यावर सगळ बदलून गेलं.

कपिलचे आईवडील दोघेही आज पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबचे. त्यांच कुटुंब फाळणीनंतर चंडीगड मध्ये येऊन वसलं. कपिल सात मुलांपैकी सहावा. रामलाल निखंज हे मुळचे शेतकरी. चंडीगडमध्ये आल्यावर त्यांनी लाकडाचा व्यवसाय केला. तो चांगला चालला.

कपिल शेंडेफळ असल्यामुळे त्याचे भरपूर लाड झाले. त्याला लहापणापासून क्रिकेटची आवड होती. जेव्हा त्यान आपल्या घरी मुझे क्रिकेट खेलना है असं सांगितलं तेव्हा विशेष असा काही विरोध झाला नाही.

रामलाल निखंज यांना तर क्रिकेट हा खेळच माहित नव्हता. त्यांना वाटलं कुस्तीसारखा काही तरी खेळ आहे. लगेचच पोराला दुधासाठी घरात म्हैस आणून बांधली. 

या दुधाचाच परिणाम कपिल तगडा खेळाडू बनला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने हरियाना कडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात सहा विकेट घेतल्या. सिझन संपेपर्यंत तीस मॅच मध्ये त्याने १२१ विकेटस घेतल्या होत्या. १९७८ मध्ये पाकिस्तान दौऱ्यात भारतासाठी खेळण्याची त्याला संधी मिळाली.

पहिल्याच सामन्यात भारताकडून फास्ट बॉलिंग टाकणारा आणि बाउन्सर टाकू शकणारा गोलंदाज बघून कॉमेंटेटर आश्चर्यचकित झाले. पण तिसऱ्या टेस्टमध्ये त्याने अवघ्या ३३चेंडूत अर्धशतक काढून फास्टेस्ट हाफ सेंच्युरीचा विक्रम केला.

असं म्हणतात की त्या सामन्यात कपिलला नाईट वॉचमन म्हणून विकेट सांभाळायला पाठवलं होत. पण कपिलने फोर सिक्सची बरसातच केली. तिथून सुरु झाला कपिल एरा.

कपिलच्या आउट स्विंगच उत्तर त्याकाळातल्या फलंदाजाकडे नव्हतं. कपिलचं नाव त्याकाळातले तुफान गोलंदाज माल्कम मार्शल, डेनिस लिली, इम्रान खान, रिचर्ड हॅडली यांच्या बरोबरीन आदरानं घेतलं जाऊ लागलं. भारतीय पाटा खेळपट्टीवर विकेट काढण्यासाठी त्याला या गोलंदाजापेक्षा दुप्पट मेहनत घ्यावी लागत होती पण कपिलची सुसाट गाडी थांबणारी नव्हती.

१९८३ च्या विश्वचषक त्याच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलं. त्याकाळात भारत एक सामना जरी जिंकला तरी मिळवली असं वाटत होत पण कपिलच्या जिद्दीमुळ खेळाडू जीव तोडून खेळले. कपिलने नेतृत्व नेहमी पुढ राहून केलं. स्वतः जबरदस्त कामगिरी करून बाकीच्याच्या पुढे आदर्श ठेवला.

झिम्बाब्वेविरुद्ध बाकीचे फलंदाज ढेपाळत असताना त्याने काढलेल्या विक्रमी १७५ धावा असो,  विव्हियन रिचर्डचा फायनल मध्ये वीस यार्ड धावत जाऊन पकडलेला अफलातून कॅच क्रिकेटच असं कोणत डिपार्टमेंट नसेल ज्यात कपिलने ८३ च्या वर्ल्ड कपमध्ये आपली छाप पडली नसेल. 

द ग्रेट वेस्ट इंडियन टीम ला हरवून जेव्हा कपिल देवने वर्ल्ड कप उचलला तेव्हा पूर्ण भारतात दुसरी दिवाळी साजरी झाली.

कपिलने आपल्या कारकिर्दीत टेस्टमध्ये ४३४ विकेट काढल्या आणि ५००० च्या वर रन बनवल्या. हा त्याकाळातला विक्रम होता. आणि हि कामगिरी करताना तो एकदाही तंदूरुस्तीच्या कारणाने बाहेर बसला नाही. सोळा वर्षे भारतीय पाटा पीचवर फास्ट बॉलिंग आणि एकसुद्धा इंज्युरी नाही हा सुद्धा एक विक्रमच असेल. शिस्त ही त्याच्या खेळाची ओळख होती.

कपिल दा जवाब नही हे वाक्य तेव्हा परवलीचे झाले होते.

आज कपिल निवृत्त होऊन इतकी वर्षे झाली तरी पुढचा कपिलदेव भारताला मिळाला नाही. इरफान पठाण, अजित आगरकर काल परवा आलेला हार्दिक पांड्या यांच्या आगमनानंतर काही दिवस पुढचा कपिल मिळाला अशी चर्चा झाली पण हे जास्त दिवस टिकलं नाही. अनेक प्रतिभाशाली खेळाडू आले आणि गेले पण पुढचा कपिल बनू शकले नाही.

एकदा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये कपिल देवना एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की पुढचा कपिल देव कधी जन्माला येणार? यावेळी इरसाल शेतकरी गडी असलेला कपिल म्हणाला,

” मेरी मां अब बुढी हो चुकी है. मेरे पिताजी गुजरे हुए बहोत साल हो गये है . अब अगला कपिल देव पैदा होना नामुमकिन है.”

हे ही वाच भिडू.