भारताच्या विजेत्या संघात पुणेकर नसला, तरी जग बॅडमिंटन खेळतं ते पुण्यामुळेच

बऱ्याच दिवसांनी भारतात कुठल्यातरी खेळामुळं जल्लोषाचं वातावरण आहे. म्हणजे कधीकाळी ही जागा फक्त एकट्या क्रिकेटची होती, पण गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा गंडलेला फॉर्म पाहता… हे चित्र पाहणं अवघडच होतं. मग भारतानं टोकियो ऑलिंपिक्समध्ये खतरनाक कामगिरी केली. ही इतर खेळांमधली परंपरा कायम ठेवलीये, ती बॅडमिंटननं.

रविवारी भारतानं अत्यंत प्रतिष्ठेच्या थॉमस कपला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचे संस्थापक सर जॉर्ज थॉमस यांच्या स्मरणार्थ खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेला ‘वर्ल्ड मेन टीम चॅम्पियनशिप’ही म्हणलं जातं, थोडक्यात काय तर बॅडमिंटनचा वर्ल्डकप, जो भारतानं जिंकला.

१९४८-४९ मध्ये पहिली थॉमस कप स्पर्धा पार पडली, तेव्हापासून तीनदा सेमीफायनलपर्यंत प्रवेश केलेल्या भारतानं यावेळी पहिल्यांदा थॉमस कप जिंकला. सर्वाधिक १४ वेळा कप जिंकलेल्या इंडोनेशियावर भारतीय संघानं फायनलमध्ये मात केली.

फायनलच्या पहिल्या लढतीत भारताच्या लक्ष्य सेननं अँथनी गिनटिंगला हरवलं, दुसऱ्या लढतीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं मॅच मारली, तर तिसरी लढत किदाम्बी श्रीकांतनं सलग दोन सेट्समध्ये जिंकली.

भारताच्या बॅडमिंटन टीमवर कौतुकाचा वर्षाव होतोय, पण खरंतर बॅडमिंटनचा जन्मदाताच भारत आहे. हे फार कमी लोकांना ठाऊक असतंय. बॅडमिंटन जन्मलं भारतात, आपल्या महाराष्ट्रात आणि तेही पुण्यात.

गोष्ट आहे १८६० मधली. इंग्रजांनी भारतात बस्तान बसवलेलं. पुण्याच्या दुसऱ्या बाजीरावला शनिवारवाड्यातून पळवून लावून, त्यांनी देश ताब्यात घेतला त्याला पन्नास वर्षे झाली होती. भारतातली सगळ्यात शेवटची शक्तिशाली सत्ता म्हणजे मराठे हरल्यामुळे इंग्रजांना कोणतंही आव्हान उरलं नव्हतं. अठराशे सत्तावन्नला उठावाचे प्रयत्न झाले पण कंपनी सरकारनं ते चिरडून टाकले. आता तर राणीचं सरकार चालू होतं.

तुरळक विरोध सोडता तसं बघायला गेला तर ब्रिटीशांसाठी भारताला निवांत काळ चालू होता. 

मराठ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पुण्यात ब्रिटीश आर्मीचा कॅम्प लावण्यात आलेला होता. मोठ सैन्यतळ होतं. पण आता युद्धस्थिती नव्हती. मग आपल्या घरापासून सातसमुद्रापार आलेल्या गोऱ्या अधिकाऱ्यांना प्रश्न पडायचा की दिवसभर काय करायचं.  रोज रोज महाबळेश्वर, लोणावळा जाता येत नव्हतं.

“बैठे बैठे क्या करे? करना है कुछ काम?”

अंताक्षरी नाही हो. ते खेळायचे मैदानी खेळ. वेळ होता, पैसे होते, रिकामं डोकं होतं. पुण्यासारखं आल्हादायक वातावरण होतं. कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून एक नवा खेळ बाहेर आला. कोण म्हणत की पुण्यातल्याच कुठल्या तरी पोरांना खेळताना बघून इंग्रज अधिकाऱ्यांना ही आयडिया सुचली.

आता आपण काय तिथे नव्हतो मग काय सांगणार.

खेळ सुरु झाला. दोघांच्यात खेळला जाणारा हा खेळ. फ्रान्स मध्ये शोधल्या गेलेल्या टेनिसच्या धरतीवर हा खेळ सुरु झाला.  त्याला रॅकेट, शटलकॉक वगैरे अपडेट आलं. थोड्याच दिवसात भारतातल्या इंग्रज अधिकाऱ्यामध्ये हा गेम फेमस झाला. पुण्यात शोधला गेलेला खेळ म्हणून त्याला म्हणायचे,

“पुना गेम”

आता भारतात हिट झालेला या गेमची चर्चा इंग्लंडला पोचण्यात वेळ किती लागणार होता?

रिटायरमेंट नंतर इंग्लंडला परत गेलेल्या अधिकाऱ्यांनी अभिमानाने हा पुना गेम आपल्या गावाकडच्या दोस्तांना शिकवला. तिथे पण हा खेळ व्हायरल झाला. मोठमोठे राजे, लॉर्ड, जमीनदार यांच्याकडेही पुना गेमबद्दल ऐकायला मिळालं. त्यांनी याच्या स्पर्धा भरवायला सुरवात केली.

१८७३ मध्ये ग्लॉस्टरशर प्रांतातल्या बोफर्टच्या राजाने या खेळाचा परिचय एका कार्यक्रमानिमित्त जमलेल्या पाहुण्यांना करून दिला. हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाचे नाव बॅडमिंटन होते. आपल्या देशाचा दुराभिमान ठासून भरलेल्या इंग्रजांनी भारताच्या गावाचं नाव काढलं आणि आपल्या गावावरून नवं बारस केलं

“बॅडमिंटन”

१८९३ साली स्थापना झाली “द बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंग्लंड”. या संघटनेने आपली अधिकृत नियामवली बनवली आणि याच नियमानुसार १८९९ मध्ये पुरूषांच्या तर १९०० मध्ये स्त्रियांच्या “ऑल इंग्लंड चँपियनशिप” स्पर्धा सुरू झाल्या. पुढे या स्पर्धा जागतिक स्तरावर पोहचल्या.

बॅडमिंटनच्या जन्मभूमीत म्हणजे भारतात १९३४ साली ऑल इंडिया बॅडमिंटन असोसिएशन सुरु झाली. पण जगात आपला डंका वाजवण्यासाठी दीपिकाचे पप्पा प्रकाश पदुकोण यांचा जन्म व्हावा लागला.  त्यांनी १९८० साली ऑल इंग्लंड चँपियनशिप जिंकली.

त्यानंतर सायना नेहवाल, पीव्ही सिंधू यांनी भारतीय बॅडमिंटनचं नाव आणखी मोठं केलं. लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत या तरण्याताठ्या पोरांनी ७३ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला थॉमस कप जिंकत आपल्या परंपरेत भर टाकली आहे.

खेळाचे जन्मदाते असणाऱ्या भारतात आता, या खेळाचं मानाचं विजेतेपदही आलंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.