कपिल देवनं टेस्ट मॅचमध्ये टी२० खेळली आणि लॉर्ड्सवर इंग्लिश साहेबांचा माज मोडला…

लॉर्ड्स. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं नयनरम्य ग्राऊंड. तिथली बांधणी, करडी इंग्लिश शिस्त, ते खास पॅव्हेलियन या गोष्टी खतरनाक भारी आहेत. लॉर्ड्स हे जसं जागतिक क्रिकेटसाठी स्पेशल मैदान आहे, तसंच भारतीय क्रिकेटसाठीही.

भारताचं क्रिकेट बदलवून टाकणाऱ्या कित्येक घटना याच लॉर्ड्सवर घडल्या. इथंच भारतानं बलाढ्य विंडीजला हरवत ८३ चा वर्ल्डकप मारला. इथंच गांगुली आणि द्रविडनं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, नॅटवेस्ट फायनल मारल्यानंतर गांगुलीनं शिस्त फाट्यावर मारत आपला टीशर्ट फिरवला आणि याच लॉर्ड्सवर २०२१ च्या दौऱ्यात भारताच्या फास्ट बॉलर्सनं कहर करत मॅच मारली.

कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली असे भारतीय कर्णधार लॉर्ड्सवर अगदी थाटात जिंकले. पण तरीही लॉर्ड्सचा लॉर्ड हि पदवी एकाच भारतीय क्रिकेटरला मिळाली, तो म्हणजे दिलीप वेंगसरकर.

कर्नल म्हणून फेमस असलेल्या वेंगसरकरच्या बॅटिंगमध्ये लॉर्ड्सच्या गॅलरीमध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांइतकीच शिस्त होती. या शिस्तीला भलेभले टरकून असायचे त्यातही लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड म्हणलं की वेंगसरकरला वेगळाच जोश यायचा.

भारतानं आतापर्यंत फक्त ३ वेळा लॉर्ड्सवर टेस्ट मॅच जिंकलीये. २०२१ मध्ये कोहलीच्या नेतृत्वात, २०१४ ला धोनीच्या नेतृत्वात आणि सगळ्यात पहिल्यांदा १९८६ ला, कपिल देवच्या नेतृत्वात.

२०१४ आणि २०२१ चे विजय आपल्याला जसेच्या तसे आठवतात, मात्र ८६ चा विजय या दोन्ही विजयांपेक्षा खास होता…

भारताची ती लॉर्ड्सवरची अकरावी टेस्ट होती. भारतानं इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकण्याचा पराक्रम केला होता पण ५४ वर्षांपासून इंग्लंडनं लॉर्ड्सचा गड अभेद्य ठेवण्यात यश मिळवलेलं. १९८६ च्या दौऱ्यात, वनडे सिरीज बरोबरीत सुटलेली आणि पहिलीच टेस्ट मॅच होती लॉर्ड्सवर.

भारतानं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी इंग्लंडनं बाजू लाऊन धरली, त्यांच्याकडून ग्रॅहम गूचनं खणखणीत सेंच्युरी केली. त्याला दुसऱ्या बाजूनं साथ देणारा एकमेव बॅट्समन होता डेरेक प्रिंगल.

त्या मॅचमध्ये लक्ष वेधून घेतलं ते भारताच्या पेस बॉलिंगनं.

चेतन शर्मा आणि रॉजर बिन्नी या पेस बॉलर्सच्या जोडीनं इंग्लिश बॅट्समनचा बाजार उठवला होता. फास्ट बॉलर्स जोडीनं शिकार करतात हे सिद्ध करत शर्मा-बिन्नीनं इंग्लंडच्या ८ विकेट्स घेतल्या. यातल्या ५ जमा झाल्या शर्माच्या नावापुढं तर ३ मिळाल्या बिन्नीला. इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये फक्त २९४ रन्स करता आले.

के श्रीकांतच्या रुपानं भारताला पहिला हादरा लवकर बसला, मात्र गावसकरनं टिपिकल स्टाईलनं बॅटिंग करत १३३ बॉल्स खेळून काढले. दुसऱ्या बाजूला मोहिंदर अमरनाथनं कडक बॅटिंग करत फिफ्टी केली.

गावसकर आऊट झाल्यावर दुसरा मुंबईकर मैदानात आला, तो म्हणजे दिलीप वेंगसरकर. याआधी लॉर्ड्सवर झालेल्या दोन्ही टेस्ट मॅचेसमध्ये कर्नलच्या बॅटमधून सेंच्युरी आली होती. त्यामुळं भारतीय चाहत्यांना अपेक्षा होत्या आणि इंग्लिश चाहत्यांना भीती.

या दोन्ही गोष्टी वेंगसरकरनं खऱ्या ठरवल्या. टेस्ट मॅचचा तिसरा दिवस त्यानं अक्षरश: गाजवला. लॉर्ड्सवर जमलेल्या चाहत्यांना क्लासिक टेस्ट बॅटिंगचा नजराणा सादर करत, त्यानं सलग तिसऱ्या लॉर्ड्स टेस्टवर सेंच्युरी मारली. भारताच्या डावाला बळ मिळत होतं, मात्र अझरुद्दीन आऊट झाल्यावर भारताचा डाव गडगडला. पार १० व्या नंबरवर आलेल्या किरण मोरेनं २५ रन्स मारले, तोच काय तो दिलासा.

वेंगसरकर मात्र ताठ मानेनं बात उंचावत पॅव्हेलियनमध्ये गेला, कारण तो १२६ रन्सवर नॉटआऊट होता.

त्यानं अर्धी मोहीम फत्ते केली होती आता बॉलर्सवर मुख्य जबाबदारी होती. पहिल्या इनिंगमध्ये यश मिळालेल्या, बिन्नी आणि शर्माला यावेळी इंग्लिश बॅट्समन शिताफीनं खेळून काढत होते, पण कपिल देवनं त्यांची टॉप ऑर्डर उध्वस्त करुन टाकली.

पहिल्या इनिंगमध्ये शंभर लावणारा ग्रॅहम गूच, बॅटिंग मास्टर कॅप्टन डेव्हिड गोवर आणि ओपनर टीम रॉबिन्सन या तिन्ही विकेट काढत कपिलनं भारताला जोरदार सुरुवात करुन दिली. माईक गॅटींग आणि अॅलन लॅम्बचेअडसर दूर झाल्यावर डेरेक प्रिंगलचं टेन्शन होतं.

तेही कपिल देवनंच दूर केलं, उरलेली शेपूट गुंडाळायला भारताला वेळ लागला नाही आणि इंग्लंडचा डाव फक्त १८० रन्सवर गुंडाळला. मणिंदर सिंगनं ३ विकेट्स काढत आपल्या कॅप्टनला सुरेख साथ दिली होती.

भारताला जिंकायला १३४ रन्स हवे होते आणि हातात सगळा दिवस होता.

तरीही हवेत जाऊन चालणार नव्हतं, कारण कुठल्याही क्षणी मॅच फिरवण्याचा दम इंग्लिश बॉलर्समध्ये होताच. ज्याची प्रचिती पहिल्याच विकेटला आली. श्रीकांत शून्यावर आऊट झाला. गावसकरनं नांगर टाकला पण पेरणीआधीच तोही गेला. पुढचा नंबर लागला मोहिंदर अमरनाथचा. भारताचा स्कोअर होता ३ आऊट ७६.

अमरनाथनं फक्त ८ रन्स केले होते, त्यामुळं जो काही रन्सचा फ्लो येत होता तो वेंगसरकरच्या बॅटमधूनच. त्यामुळं भारताच्या गोटात एवढं टेन्शन नव्हतं. पण अमरनाथ गेल्यावर फक्त २ रन्सची भर पडली आणि वेंगसरकर आऊट. अझरुद्दीनही १४ रन्स करुन रनआऊट.

शास्त्री आणि कपिल अजूनही बाकी होते, पण या दोघांनाही पहिल्या इनिंगमध्ये दुहेरी धावसंख्याही गाठता आली नव्हती. त्यामुळं शास्त्री जरा बिचकूनच खेळत होता.

कॅप्टन कपिलदेव मात्र वेगळ्याच मूडमध्ये होता. अझरुद्दीन गेला तेव्हा भारताला २४ रन्स हवे होते. वेळ भरपूर होता, पण कपिलचं एक नेहमीचं सूत्र होतं,

 आक्रमण हाच उत्तम बचाव.

हा गडी इंग्लिश बॉलर्सवर तुटून पडला, त्यानं चार फोर आणि एक सिक्स मारत २३ रन्स चोपले आणि भारतानं मॅच जिंकली. टेस्ट क्रिकेटमध्ये बॉल सोडून देऊन, सिंगल डबलवर भर देत डाव रचण्याच्या भानगडीत तो पडला नाही.

जिंकायला २४ रन्सचं गणित पाहिलं, त्यातले २३ मारले आणि भारताची नौका पार लावली, अगदी थाटात.

त्याच्या या टी२० स्टाईल बॅटिंगमुळं दोन गोष्टी झाल्या, भारतीय प्लेअर्स टेस्ट मॅचमध्येही आक्रमक होऊ शकतात, याचं उदाहरण साऱ्या जगानं पाहिलं आणि दुसरं म्हणजे इतकी वर्ष अभेद्य म्हणून जपलेलं इंग्लंडचं लॉर्ड्स भारतानं जिंकलं… साहेबांचा माज मोडला.

मॅन ऑफ द मॅच कपिल देव ठरला असला, तरी चेतन शर्मा, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ आणि कर्नल वेंगसरकर हे सगळेच त्या मॅचचे हिरो होते. वेंगसरकरचे २१३ बॉल्स १२६*, अमरनाथचे २४१ बॉल्स ६९ जितके भारी होते, तितकेच कपिलचे १० बॉल्स नॉटआऊट २३ ही!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.