तुम्ही सरकार पडेल की वाचेल या राड्यात गुंतलाय पण तिकडं “अग्निवीर” भरती निघालेय..

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लष्कर भरती संबंधी अग्निपथ योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत सिलेक्ट झालेल्या  उमेदवारांना अग्निवीर असं संबोधण्यात येईल. या उमेदवारांची 4 वर्षांसाठी भारतीय लष्करात भरती केली जाणार आहे. या योजने बद्दल तरुणांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही वर्षानुवर्षे लष्कर भरतीची तयारी करतोय आणि सरकारने अशा योजना आणून आमच्या कष्टावर पाणी फिरवलय, अशी त्यांची भावना आहे. 

पण नेहमी प्रमाणे मोदी सरकारने ही योजना मागे घेण्याचं तर सोडा पण ती  राबवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळं नोकरी पाहिजे असेल तर अर्ज करण्याशिवाय पर्याय नाहीये. 

दरम्यान भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. या पार्श्वभूमीवर वायुसेना एअर मार्शल एसके झा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की,

आता फक्त ‘अग्नीवीर वायु’ योजनेतूनच हवाई दलात भरती होणार आहे.

 

या पत्रकार परिषदेदरम्यान, लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव, लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी भरती प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही असे संगितले.

पुरी म्हणाले की, या योजनेंतर्गत निवड प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता असेल

‘सहभागी उमेदवारांना एक हमीपत्र द्यावे लागेल की ते अग्निपथ योजने विरुद्धच्या कोणत्याही जाळपोळ किंवा तोडफोडीच्या आंदोलनात सहभागी नव्हते’.

मागच्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात जो राजकीय राडा चालू आहे, जो गदारोळ चालू आहे त्या गदारोळात आज सकाळी देशभरातल्या वृत्तपत्रांमध्ये वायु सेनेच्या भरतीची पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 

नुकताच 12 वी चा निकाल सुद्धा लागलाय, तर विद्यार्थी मित्रांनो राजकीय घडामोडी थोडावेळ बाजूला ठेवा आणि करियर च्या दृष्टीने महत्वाची असणारी ही जाहिरात बघा आणि यातले नियम नक्की काय आहेत ते समजून घ्या..

नक्की काय आहे या जाहिरातीत?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होणार आहे. 24 जून ते 5 जुलै पर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.

भरतीशी संबंधित माहितीसाठी, उमेदवारांनी भारतीय वायुसेनेच्या

 careerindianairforce.cdac.in किंवा indianairforce.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

भारतीय वायुसेना अग्निशमन दलाच्या ‘अग्निवीरवायु इनटेक’ या पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीची परीक्षा घेणार आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून सायन्स शाखेतून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी हे विषय घेऊन कमीत कमी 50% मार्क्ससह उत्तीर्ण सोबतच इंग्रजी विषयात देखील कमीत कमी 50% मार्क्स्स घेऊन 12वी परीक्षा उत्तीर्ण असायला हवा.

म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर बारावीत कमीतकमी 50% मार्क्स पाहिजेत आणि त्यात पण फिजिक्स मॅथ्स आणि इंग्लिशमध्ये 50% मार्क्स असले पाहिजेत.

किंवा

उमेदवाराने 3 वर्षांचा इंजिनियरिंग डिप्लोमा कमीत कमी 50% मार्क्ससह उत्तीर्ण पाहिजे आणि इंग्रजी विषयात कमीत कमी 50% मार्क्स घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

म्हणजेच डिप्लोमाला कमीतकमी 50% मार्क्स पाहिजेत आणि त्यात पण इंग्लिशमध्ये 50% मार्क्स असले पाहिजेत.

किंवा 

2 वर्षे कालावधीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह कमीत कमी 50% सोबतच इंग्रजी विषयात कमीत कमी 50% मार्क्स घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

म्हणजे व्होकेशनल मध्ये  इंग्लिश, फिजिक्स आणि मॅथ्स या विषयांसह  50% मार्क्स पाहिजेत आणि इंग्लिश मध्ये पण 50% मार्क्स पाहिजेतच.

पदासाठी वयोमर्यादा काय असेल ते पाहू

अग्निवीर साठी केवळ 17 ते 23 वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात.

29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान जन्मलेले तरुण तरुणी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.(दोन्हीही तारखा पकडून) म्हणजे नुकतेच 12 वी पास झालेले फ्रेशर्स विद्यार्थी आणि पदवीला असलेले उमेदवार सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. 

परीक्षा पद्धत कशी असेल हे बघूया

अग्निपथ योजनेंतर्गत अग्निशमन दलाची भरती ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार आहे.(परीक्षा केंद्रावर जाऊन ) ऑनलाइन परीक्षा अंदाजे 24 जुलै 2022 रोजी घेतली जाईल. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. म्हणजे नुसते तुक्के मारायचे नाही, व्ययवस्थित अभ्यास करून जायचं. परीक्षेचा सिलॅबस हा 12 वी सायन्स आणि डिप्लोमा इंजिनियरिंग लेवलचा असेल.

परीक्षा शुल्क किती असेल 

ऑनलाइन नोंदणी करताना उमेदवारांना 250 रु. परीक्षा फिस भरावी लागेल. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नाहीतर इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट करता येईल. नाहीतर परीक्षा फिस बँकेत जाऊन चलनाद्वारे सुद्धा भरता येईल.

परीक्षे संदर्भात असणार्‍या महत्वाच्या तारखा:

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होईल 24 जूनला 2022 सकाळी 10 वाजता.

ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख असेल 5 जुलै 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.

आणि प्रत्यक्ष ऑनलाइन परीक्षेची तारीख असेल 24 जुलै  2022 (तात्पुरत्या स्वरुपात)

तर मित्रांनो ही झाली ऑनलाइन परीक्षेची माहिती. फिजिकल परीक्षा ऑनलाइन नंतर असणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला ऑफिशियल वेबसाइट वर मिळून जातीलच त्यामुळे तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही भारतीय वायुसेनेच्या careerindianairforce.cdac.in किंवा indianairforce.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या तिथे तुम्हाला अजून डिटेल माहिती मिळून जाईल..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.