या पहिल्या पायलटनी महायुद्ध गाजवलं म्हणून भारताला स्वतःचं एअरफोर्स मिळालं.

ब्रिटीशकालीन भारतात अनेक भारतीय ब्रिटीश सरकार आणि सैन्यामध्ये कार्यरत होते. पण ब्रिटीशांचे हवाई दल असलेल्या रॉयल फ्लाईंग कॉप्समध्ये ही संख्या मर्यादित होती.

मात्र या मर्यादित संख्येने असलेल्या अधिकाऱ्यांच्या पराक्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावरच भारतीयांच्या स्वतःच्या हवाई दलाची स्थापनेची बीज रोवली गेली.

भारतीयांना पुर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट या खेळात ज्याप्रमाणे रणजितसिंहजी आणि पतौडीचे ज्येष्ठ नवाब यांनी इंग्लंडमध्ये जावून इंग्लंडचे काऊंटी क्रिकेट क्लब गाजवले. अगदी त्याचप्रमाणे पुर्णपणे अनभिज्ञ असणारे हवाई क्षेत्रात हरदितसिंग मलिक, एस.सी वेलिंकर, एरॉल सेन, इंद्र लाल रॉय आणि इतर काही तरुण भारतीय वैमानिकांनी इंग्रजांना अभिमान वाटावा असे पहिले महायुद्ध गाजवले.

चार योद्ध्यांचा पराक्रम :

पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटीशांना मनुष्यबळाची गरज भासत होती आणि भारतीय तरुणांना देखील हाताला सरकारी काम मिळण्यासाठी त्या काळातली ही एक प्रकारची संधीच होती. या युद्धात भारतीय सैनिकांचे योगदान मोठे होते.

युद्ध सुरू झाल्याच्या केवळ सहा आठवड्यांमध्येच भारतीय सैन्य बेल्जियमच्या येप्रेस सेलियंटमध्ये होते. युरोपमध्ये पुर्ण दोन विभाग जवळपास युद्ध संपेपर्यंत राहिले. मध्यपूर्व आणि आफ्रिका येथेही भारतीय लष्कराच्या संघटनांनी मोठी काम केली होती.

एकूण दिड लाख भारतीयांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी सेवा बजावली.

यात सैनिकांची संख्या मोठी होती. पण त्या तुलनेत आरसीएफ मधील भारतीयांची संख्या खूपच कमी होती. पण आरसीएफचे योगदान मात्र अतुलनीय होते. यात होते. लेफ्टनंट एच.एस. मलिक, लेफ्टनंट एस.सी. वेलिंकर, सेकंड लेफ्टनंट ई.एस.सी. सेन, आणि लेफ्टनंट इंद्र लाल रॉय चौघांपैकी मलिक व सेन हे दोघे युद्धात बचावले. रॉय यांनी १३ दिवसात १० फायटर प्लेन पाडले. आणि अवघ्या १९ व्या वर्षी शहिद झाले होते. या पराक्रमाने इंग्रज प्रचंड प्रभावित झाले होते.

युके पंजाब हैरिटेज असोसिएशनचे सदस्य हरबख्श ग्रेवाल यांच्या म्हणण्यानुसार ऑक्सफर्डमधून शिक्षण पुर्ण केलेल्या आणि पायलट होण्यासाठी उत्सुक असलेल्या सरदार हरदित सिंह मलिक यांना भारतात सुरुवातीला टोकाचा जातीय भेदभाव सहन करावा लागला. यानंतर ते निराश होवून फ्रान्सला गेले.

पुढे काही काळापर्यंत आपला खर्च भागवण्यासाठी त्यांनी तिथे एम्बुलेंस ड्रायव्हरची नोकरी केली.

१९८० मध्ये एक मुलाखतीमध्ये बोलताना हरदित यांनी सांगतात, या दरम्यान फ्रान्सने आपल्या हवाई दलामध्ये मला सेवा देण्यासाठी संधी देण्याचे ठरविले. याचवेळी मला आरएफसीचे प्रमुख जनरल हैंडरसन यांनी भेटण्यासाठी निरोप पाठवला. पुढे ट्रेनिंग आणि नंतर रॉयल फ्लाईंग कॉप्समध्ये फायटल पायलट म्हणून संधी दिली आणि २२ जून १९१७ ला मी रॉयल फ्लाईंग कॉप्स जॉईन केले.

हरदित मलिक जिवंत परतले :

पहिल्या महायुद्धा दरम्यान मलिक यांनी जवळपास ६ फायटर प्लेन पाडले. ते दिवस असे होते की दोन देशांचे वैमानिक जवळ आल्यानंतर पिस्तुल किंवा रायफलने एकमेकांवर हल्ला करायचे. त्यामुळे त्यावेळी युद्धक्षेत्रामध्ये एका वैमानिकाचे सरासरी आयुष्य फक्त दहा दिवस असायचे. त्यानंतरही हरदित मलिक जिवंत परतले.

भारतीय वायुदलाच्या स्थापनेत महत्वाचा सहभाग :

पहिल्या महायुद्धात भारतीय हवाई दल अस्तित्वात नसल्यामुळे इंग्रजांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळेच १९२०च्या उत्तरार्धात, त्यांनी भारतासाठी हवाई दलाचा प्रस्ताव दिला. यावर अभ्यास करण्यासाठी सँडहर्स्ट कमिटीची स्थापना केली गेली.

तसेच या प्रस्तावित भारतीय वायुसेनेतील पहिले भारतीय अधिकारी निवडण्याची वेळ तेव्हा अनुभवी आणि पहिल्या महायुद्धात पायलट म्हणून जिवंत असणाऱ्यांपैकी मलिक एकमेव असल्यामुळे त्यांना बोलवण्यात आले.

समितीसमोर हजर झाल्यानंतर १९३० मध्ये त्यांनी एकूण सहा भारतीयांची निवड केली.

आणि त्यांना पायलट प्रशिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठविण्याच्या निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सहा जणांमध्ये हवाई दलाचे भावी प्रमुख सुब्रतो मुखर्जी हे देखील होते. ८ ऑक्टोंबर १९३२ रोजी मध्ये मुखर्जी भारतीय वायुसेनेतील पहिले भारतीय अधिकारी बनले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.