सैन्यात ऑन ड्युटी ऑफिसरचा मृत्यू झाला तर त्यांना ‘शहीद’ म्हणत नाहीत कारण..
भारतीय सैन्याबद्दलच्या छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेण्यात सगळ्यांनाच खूप रस असतो. त्यांच्या बद्दलचे अनेक फॅक्टस तर तोंडपाठ केले जातात. मात्र यातील एक फॅक्ट आहे जो गेली काही वर्ष सामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळातही खूप चर्चिला जातो.
शिवाय त्यावर आक्षेप देखील घेतले जातात. हा फॅक्ट म्हणजे भारतीय सैन्यात ऑन ड्युटी ऑफिसरचा जर मृत्यू झाला तर त्यांना ‘शहीद’ असं म्हटलं जात नाही.
हा मुद्दा परत एकदा पुढे आलाय तो संसदेत.
२८ मार्चला संसदेत चर्चासत्र सुरू होतं. त्यादरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते डॉ. संतनु सेन यांनी “कर्तव्य बजावताना ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांच्यासाठी सरकारने ‘शहीद’ हा शब्द वापरणं बंद केलं आहे का?” असा प्रश्न विचारला.
ज्यावर उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्र्यांनी सभागृहाला माहिती दिली की
“भारतीय सशस्त्र दलात ‘शहीद’ हा शब्द वापरला जात नाही.”
डिसेंबर २०१५ मध्ये, तत्कालीन गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी देखील लोकसभेत हीच माहिती दिली होती. तर डिसेंबर २०२१ मध्ये सुद्धा गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पुन्हा राज्यसभेत माहिती दिली होती की ‘शहीद’ असा कोणताही अधिकृत शब्द नाहीये.
म्हणून ‘असं का?’ हा प्रश्न विचारला जातोय?
जवळपास दशकभरापासून सरकारने ‘शहीद’ या शब्दाला अधिकृत मान्यता नसल्याचं सांगितलं आहे. २०१३ आणि २०१४ मध्ये, गृह मंत्रालयाने आरटीआय अर्जांच्या उत्तरांमध्ये हे स्पष्ट केलं आहे. त्यात म्हटलंय ‘शहीद’ या शब्दाबद्दल भारत सरकारने कुठेही व्याख्या केलेली नाहीये.
कारण काय? तर…
‘शहीद’ या शब्दाला धार्मिक अर्थ आहे. त्याचा संदर्भ इतिहासात सापडतो. इतिहासात त्याचा वापर लोकांच्या धार्मिक विश्वासांसाठी केला गेला आहे. विशेषतः ख्रिश्चन धर्मात कुणीही बलिदान दिलं असेल तर त्याचा संदर्भ देण्यासाठी ‘शहीद’ शब्द वापरला गेला आहे. तर या शब्दाचा भारतातही धार्मिक अर्थ आहे, जो इस्लाममधील ‘शहादत’ या संकल्पनेशी जोडलेला आहे.
शिवाय ‘शहीद’ या शब्दाचं मूळ ग्रीक शब्द ‘मार्तूर’मध्ये आहे, असं म्हटलं जातं. धर्माचा त्याग करण्यास एखाद्या व्यक्तीने नकार दिला आणि त्यानंतर स्वेच्छेने त्याने मृत्युदंड भोगला तर त्या व्यक्तीसाठी ‘शहीद’ असा शब्द वापरला जातो, असे संदर्भ सापडतात.
आता भारतीय सैन्याबद्दल आपल्याला माहीतच आहे. सर्व धर्म समभावाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली आर्मी आहे. भारतीय सैन्य कोणत्याही एका धर्माशी निगडीत नाहीये. इथे सगळे जण देशासाठी लढत असतात आणि देशासाठी मृत्यू स्वीकारतात. कुणीही कोणत्याही धार्मिक तत्वांसाठी आपले प्राण अर्पण करत नाही. कोणत्याही सैनिकाच्या मृत्यूनंतर त्यांना शासकीय इतमामातच निरोप दिला जातो.
तेव्हा त्यांच्या बलिदानासाठी असे धार्मिक संदर्भ असलेले शब्द वापरणं चूक असल्याचं सगळ्याच स्तरांतून आढळून आलं आहे. अनेक सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि कायदेतज्ज्ञांनी देखील आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सैनिकाला ‘शहीद’ हा शब्द वापरणं भारतीय दृष्टिकोनातून चुकीचं असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे.
त्याचमुळे ‘शहीद’ शब्दाचा वापर रोखण्यासाठी अनेकदा पावले देखील उचलली आहेत. मात्र तरीही संरक्षण सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी (CAPF) विविध जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सरकारी निवेदनांमध्ये त्याचा सर्रासपणे वापर केला गेला आहे. शिवाय अनेक वरिष्ठ अधिकारी जे सेवेवर आहेत किंवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी देखील कोणत्याही कारवाईत सैनिकांचा मृत्यू झाला तर त्याचं वर्णन करण्यासाठी वारंवार ‘शहीद’ शब्दाचा वापर केला आहे.
म्हणून या शब्दाच्या वापराबद्दल कायम संभ्रम राहिला आहे.
त्यामुळेच फेब्रुवारी २०२२ मध्ये, लष्कराने एक अधिकृत पत्र जरी केलं होतं. ज्यात त्यांनी आपल्या सर्व कमांडोंना ‘शहीद’ शब्द वापरण्यापासून परावृत्त करण्यास सांगितल होतं. कारण कर्तव्य बजावताना मृत्यू आलेल्या कोणत्याही सैनिकासाठी अशा धार्मिक संदर्भाच्या शब्दाचा वापर करणं योग्य नसल्याचं आर्मीचं ठाम मत आहे.
मग यासाठी कोणता शब्द वापरावा? हा साहजिक प्रश्न उपस्थित होतो. याचंही उत्तर त्याच पात्रात आर्मीने दिलं आहे.
शहीद ऐवजी, त्यांनी काही वाक्य वापरावी असं सुचवण्यात आलं आहे. जसं की, ‘आपले प्राण अर्पण केले’, ‘कारवाईदरम्यान मृत्युमुखी पडले ‘, ‘देशासाठी सर्वोच्च बलिदान’, ‘वीरगती प्राप्त सैनिक’, ‘भारतीय सैन्यातील शूर आणि वीरगती प्राप्त सैनिक‘, ‘लढाईत बळी गेले’, ‘ब्रेव्हहार्ट्स ज्यांना आपण गमावलं’ अशी वाक्ये वापरण्यास सांगितलं गेलं आहे.
एकंदरीतच काय तर शहीद शब्दावर आक्षेप काही आजचा नाही तर खूप जुना आहे. भारतीय लष्कर म्हणजे धर्म, जात, पंथ अशा सगळ्या बंधनांतून मुक्त व्यवस्था आहे. तेव्हा त्यांना योग्य तोच मान मिळायला हवा, जो निरपेक्षिततेतच आहे, असं सैन्याचं म्हणणंय.
हे ही वाच भिडू :
- भारतीय लष्करात आमच्या जातीला स्वतंत्र रेजिमेंट द्या म्हणून हे लोकं आंदोलन करतायत..
- भारतीय जवानांच्या त्या कृतीमुळे पाक आर्मीच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले.
- आर्मीला रॉयल एन्फिल्ड बुलेट हवी होती, नेहरूंनी अट घातली मेड इन इंडियाचं पाहिजे.