क्षेपणास्त्रं झाली, बंदुका झाल्या आता भारतीय सैन्याचा युनिफॉर्मही चेंज होणार आहे

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्याशी निगडित वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत आहेत. भारतानं रशियाशी डील करत नवी क्षेपणास्त्र आपल्या ताफ्यात घेतली. सोबतच एके-४७ या जुन्या बंदुका जाऊन लवकरच जवानांना एके-२०३ या अद्ययावत आणि डेडली बंदुकाही जवानांना मिळणार आहेत. या बंदुका भारतातच तयार होणार असल्यानं, सैन्याचं बळ निश्चितच वाढणार आहे.

सोबतच भारतानं चीन, पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांकडून असणारा धोका लक्षात घेऊन सीमेलगतच्या भागांमध्ये क्षेपणास्त्रही तैनात केली आहेत. युद्धनौकांच्या बाबतीतही भारत आणखी समृद्ध होत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्ट बदलतेय, ती म्हणजे भारताच्या आर्मीचा युनिफॉर्म.

सैन्यात देशसेवा करण्यासाठी जाण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी आर्मीचा युनिफॉर्म हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. राखाडी, करड्या आणि हिरव्या रंगाच्या पट्ट्या, जंगलात चटकन न ओळखू येणारा रंग आणि एक वेगळाच रुबाब या युनिफॉर्ममध्ये असतो.

गेल्या महिन्यातच आर्मीला नवा युनिफॉर्म मिळणार असल्याचं घोषित झालं होतं. मात्र हा युनिफॉर्म कसा असेल, यात नक्की काय बदल केले जातील आणि हा खास का ठरणार आहे? याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

या नव्या युनिफॉर्मवर राखाडी आणि हिरव्या रंगाचा वापर करुन पॅटर्न तयार केले जातील. डिजिटल पॅटर्नप्रमाणे यांचं स्वरुप असेल. जुन्या रंगांमध्ये काहीही बदल केले जाणार नाहीत.

हा नवा युनिफॉर्म डिझाईन करण्याचं काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीनं भारतीय सैन्यासोबत मिळून केलं आहे. युनिफॉर्म चेंज करण्याचा मुख्य उद्देश सैनिकांना अधिक हलका आणि आरामशीर युनिफॉर्म परिधान करता येईल हा आहे. या युनिफॉर्मच्या निर्मितीसाठी ओपन टेंडर काढलं जाईल आणि त्यानंतर खासगी आणि सरकारी संस्थांच्या सहकार्यानं सगळ्या सैन्याला पुरवठा करण्यासाठी युनिफॉर्म बनवले जातील.

नवा युनिफॉर्म बाजारात मिळणार नाही

सैनिकांच्या युनिफॉर्मसाठीचं कापड बाजारात मिळतं. त्यानंतर सैनिक आपल्या हुद्द्यानुसार नियुक्त युनिफॉर्म शिवून घेतात. मात्र हे नवं डिजिटल पॅटर्न असणार कापड बाजारात कुठेही उपलब्ध नसेल. ज्या प्रमाणे रेडिमेड शर्ट असतात, त्याचप्रमाणे जवानांना हे गणवेश देण्यात येतील. साहजिकच बाजारात मिळणारं कापड जवानांच्या युनिफॉर्मशी मॅच होणार नाही.

हा युनिफॉर्म मुख्यत्वे युद्ध आणि कारवाईच्या प्रसंगातच वापरला जाणार असल्यानं वजनाला हलका आहे. सैनिकांच्या सुविधांसाठी युनिफॉर्ममधल्या पँटला जास्त खिसे देण्यात आले आहेत. सोबतच कापड हलकं असलं, तरी ते जाड असेल आणि उन्हाळा व हिवाळा दोन्हीसाठी उपयुक्त असेल. सैनिकांना शर्ट पँटमध्ये इन करण्याची गरज असणार नाही, साहजिकच ते अधिक मोकळेपणाने वावरु शकतील. सैनिकांच्या खांद्यावर किंवा कॉलरवर असणारे टॅग्स तसेच राहणार की त्यांचाही पॅटर्न बदलणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

देशात १५ जानेवारीला ‘आर्मी डे’ सेलिब्रेट केला जातो. यादिवशी सैनिकांच्या परेडचं आयोजन केलं जातं, भारताचा अभिमान असणारी इंडियन आर्मी या दिवशीच्या परेडमध्ये नव्या युनिफॉर्ममध्ये दिसेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.