पावलाच्या ठश्यांवरुन घुसखोरांच वजन सांगणाऱ्या व्यक्तीमुळे आज सैन्यात गुप्त बातम्या देणारे “पागी पोलीस आहेत”.

1965 आणि 1971 च्या युद्धात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाचे दाखले आजही दिले जातात. या दोन्ही युद्धासंबधीत असणाऱ्या कित्येक शौर्यकथा आपल्या वाचनात येत असतात. सैन्याने दाखवलेल्या पराक्रमाच कौतुक तर आपण करतोच पण या दोन्ही युद्धात आपल्या विजयात महत्वाचा वाटा असणाऱ्या एका समुदायाची चर्चा मात्र तशी कमीच होते. या समुदायाच नाव राबाडी समुदाय. 

भारत पाकिस्तानच्या दरम्यान असणाऱ्या थारच्या वाळवंट, गुजरातचे कच्छचे रण या परिसरात हा समुदाय पसरलेला आहे. बासनकंठा येथील रबाडी लोकांच्या जीवावरच आपण 1965 आणि 1971 चं युद्ध जिंकू शकल्याच सैन्याच अधिकारी सांगतात. 

या रबाडी समुदायाशी संबधित असणारे सर्वात आदरणीय नाव म्हणजे रणछोड पागी. रणछोड पागी यांचे किस्से ऐकून खुद्द फिल्ड मार्शल मानेकशॉ यांनी त्यांना भेटण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं होतं. त्यांच्या निधनानंतर भारतीय सैन्याने आपल्या एका चौकीच नाव रणछोड चौकी अस ठेवलं. तर राबाडी समुदायातील खास सैन्यासाठी गुप्तहेराच काम करणाऱ्या लोकांसाठी “पोलीस पागी” हा शब्द वापरुन त्यांना सेवेत सामावून घेण्यात आलं. 

हि गोष्ट भारतीय सैन्याचे बहिर्जी नाईक असणाऱ्या, “रणछोड पागी” यांची. 

साल १९६५  

गुजरात आणि राजस्थानच्या दरम्यान असणाऱ्या थरच्या वाळवंटात पाकिस्तान सैन्याने केलेल्या घुसखोरी नंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबध तणावपुर्ण झाले होते. ऑगस्ट येताच भारत पाकिस्तानची सीमा युद्धभूमीत बदलली होती. जेव्हा हे युद्ध सुरु झाले तेव्हा बासनकंठा भागातल्या लिंबळा गावचे रणछोड पागी स्थानिक पोलिसांसाठी गाईड म्हणून काम करत होते. त्यांच्या गाईडच्या कामाची प्रशंसा केल्यामुळे युद्ध चालू होताच त्यांना भारतीय सैन्यासाठी माहिती गोळा करण्याच काम सैन्यामार्फत देण्यात आलं. 

१९६५ च्या युद्धात छारकोट आणि विद्याकोट या महत्वाच्या चौक्यांवर पाकिस्तानच्या सैन्याने ताबा मिळवला होता. त्यानंतर भारतीय सैन्याद्वारे कारवाई करण्यात आली होती पण यात आपला पराभव झाला  होता. या दोन्ही चौक्यावर नेमके किती सैन्य आहे याची ठोस माहिती भारतीय सैन्याला नसल्याने १,००० सैनिकांची तुकडी पाठवून देखील आपणाला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारतीय सैन्याने दूसरा हल्ला १०,००० सैन्याची तुकडी घेवून करण्याच निश्चित केलं होतं. मात्र चौक्यापर्यन्त पोहचण्याचा रस्ता हा सुरक्षित नसल्याने हमखास विजयाची खात्री कोणालाच देता येत नव्हती. 

तेव्हा रणछोड पागी यांच्याकडे माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली. रणछोड दास यांच्याकडे विशेष कौशल्य होतं. ते जमीनीवर उमटलेल्या पाऊलखूणा सांगून किती जवानांची तुकडी असेल याचा अंदाज सांगत. त्यांच्याकडे कोणते सामान असेल किती वेळापुर्वी तुकडी गेली असेल, त्यांच्याकडे किती किलो वजन असेल असे कित्येक अंदाज ते फक्त पाऊलांच्या खूणा पाहून सांगत. 

आपल्याला दिलेल्या जबाबदारीनंतर त्यांनी भारतीय सैन्याला १२०० पाकिस्तानी सैनिक लपून बसलेल्या ठिकाणाचा अचूक पत्ता सांगितला. रात्रीच्या अंधारात भारतीय सैन्याला त्या ठिकाणी घेवून जाण्याच काम अचूकपणे पार पाडलं. त्या रात्री दबा धरुन बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर कारवाई करुन भारताने छारकोट आणि विद्याकोट या दोन्ही चौक्या परत मिळवल्या. 

१९७१ च्या युद्धात देखील त्यांनी अशाच अचूक गोष्टी भारतीय सैन्यापर्यन्त पोहचवून विजय सुकर केला. त्यांना भारतीय सैन्यात ओल्ड वॉर कॅमल अस नाव ठेवण्यात आलं. आपल्या उंटावर बसून दूरवर असणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवरचा अंदाज ते अचूक मांडत असत.

त्यांची हि किर्ती एकदिवस फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या कानावर गेली. 

फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांनी त्यांना भेटण्यासाठी खास हेलिकॉप्टर पाठवलं होतं. हेलिकॉप्टरमध्ये बसून रणछोड पागी मानेकशॉ यांना भेटायला आहे. आपलं पद विसरुन सर मानेकशॉ एखा जून्या मित्राप्रमाणे त्यांना भेटले. त्यांना आपल्या खिश्यातील ३०० रुपये बक्षीस म्हणून दिलं. इतकच नाही तर दूपारच्या जेवणाच्या वेळी रणछोड पागी सोबत आणलेले जेवण जेवू लागताच मानेकशॉ यांनी त्यांच्या डब्यातच जेवणास सुरवात केल्याची माहिती सांगितली जाते. 

1998 मध्ये त्यांनी मुर्शरफ पकडून दिला होता. 

काळजी करु ना, मुर्शरफ नावाचा तो उंट होता. पण काळजी करण्यासारखी दूसरी गोष्ट म्हणजे या उंटावर २० किलो RDX होतं. भारतीय हद्दीत सोडण्यात आलेल्या उंटाला पकडून देण्याची कारवाई त्यांनी केली होती. 

२००३ मध्ये ते स्वत: या कामातून निवृत्त झाले. तरिही उतारवयात त्यांची नजर पाकिस्तानच्या दिशेने असायची. आपलं कौशल्य नवीन मुलांना शिकवून ते त्यांना मार्गदर्शन करत होते. वयाच्या ११२ व्या वर्षी त्यांच निधन झाल्याचं सांगितल जातं. 

भारतीय सैन्यामार्फत संग्राम पदक, समर सेवा स्टार आणि पोलिस पदक देवून सन्मानीत करण्यात आलं होतं. त्याचबरोबरीने राबाडी समुदायाच्या तरुणांना समावून घेत त्यांच्यासाठी पोलीस पागी नावाचं दल सुरू करण्याचा निर्णय घेतला. इतकच नव्हे तर भारतीय सैन्याने आपल्या चौकीस रणछोड चौकी अस नाव देवून त्यांना सन्मान देखील केला. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.