अमेरिकेच्या सायकल रेस चॅम्पियनने तिथली पहिली बाईक बनवली, नाव दिलं ‘इंडियन’
एकोणिसाव्या शतकाचा काळ. जग झपाट्याने बदलत चाललं होतं. विज्ञानाने एवढी प्रगती केली होती की घोडा बैलगाडीला मागे टाकण्यासाठी रेल्वे जगाच्या कानाकोपऱ्यात धावू लागल्या होत्या. सुरवातीला भूत म्हणून घाबरून पळणारे लोक या आगीनगाडीला सवयीने स्वीकारू लागले होते.
पण रेल्वेला देखील काही तरी लिमिटेशन होते. ती सगळीकडेच जायची असं नाही, आपल्याला हव्या त्या वेळात जायची असं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरा पलीकडच्या गल्लीत चक्कर येतो बाजारात अशा कामाला रेल्वेचा उपयोग नव्हता.
अशा वेळी उपयोगाला आल्या सायकली.
जगात आगीचा शोध लागल्यानंतर पाठोपाठ सगळ्यात कोणता मोठा शोध असेल तर तो सायकलचा असं आमचं वैयक्तिक मत आहे. या सायकलींनी जगाला छोटं बनवलं. युरोप लंडन अमेरिका भारत सगळीकडे सायकलींचा दरारा वाढला. इंग्लंड तर सायकलींचे माहेरघर बनले होते. तिथून अटलांटिक समुद्रापार अमेरिकेला सायकली निर्यात केल्या जात असत.
एकदा सायकल आली प्रवास सुखाचा झाला पण माणसाची भूक शांत होत नव्हती. कोणी तरी ठरवलं की पायडल मारायचं तरी का कष्ट घ्या. यातूनच सायकलला मोटार लावून प्रयोग सुरु झाले. जर्मनीवाल्यानी यात बाजी देखील मारली आणि पहिली मोटारसायकल बनवली.
साधारण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत अमेरिकेत सायकलीचंच राज्य होतं. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ते युरोपच्या थोडं फार मागंच होते. साध्या सोप्या सुटसुटीत सायकलींनी अंकल सॅमला चांगलंच प्रेमात पाडलं होतं.
त्या काळात तिथे सायकल शर्यतींचं देखील मोठं क्रेझ असायचं. या सायकल शर्यतींचा सचिन तेंडुलकर होता जॉर्ज हेंडी नावाचा माणूस. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून तो सायकल शर्यतीचा बादशाह होता. अनेक विक्रम त्याच्या नावावर होते. अमेरिकेच्या पहिल्या शर्यतीपासून तो नॅशनल चॅम्पियन होता.
पुढे वयोमानाने तो जेव्हा सायकल रेस हरू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला करियरची दिशा बदलायला लागणार आहे. तस बघायला गेलं तर सुरवातीपासून त्याला फक्त आणि फक्त सायकलचाच नाद होता. त्यातल त्याला सगळं खडान खडा ठाऊक होतं. हे सोडून त्याला दुसरं काही यायचं देखील नाही.
यातूनच त्याने स्वतःची सायकल बनवायचं ठरवलं.
१८९२ साली त्याने पुरुषांसाठी सिल्वर किंग आणि महिलासाठी सिल्व्हर क्वीन नावाच्या सायकली बाजारात आणल्या. हेंडी तोपर्यंत स्वतःच एक ब्रँड बनला होता. त्याच्या नावावर सायकली खपू लागल्या. पुढे त्याची आणि त्याच्या पार्टनरची भांडणं झाली आणि हेंडी वेगळा झाला.
त्याने नव्या नावाने सायकली बनवायला सुरवात केली होती. हे नाव होते इंडियन.
इंडियनच का? अमेरिकेला हे नाव सुरवातीपासून एक्झॉटिक वाटत. जेव्हा कोलंबस पहिल्यांदा अमेरिका खंडात पोहचला तेव्हा त्याला आपण भारतातच आलोय असा गैरसमज झाला होता. भारत भारत म्हणून तो नाचला देखील होता. त्याने तिथल्या लोकांना इंडियन म्हणून संबोधलं. पुढे जेव्हा कळलं कि हा भारत नाही वेगळाच देश आहे तेव्हा कपाळावर हात मारून घेतला.
पण युरोपमधल्या लोकांच्या भारताच्या क्रेझ मुळे हे इंडियन नाव अमेरिका खंडात कायम राहिल. कोलंबस आलेला ती बेटे झाली वेस्ट इंडिज आणि मूळचे अमेरिकन लोक झाले रेड इंडियन. कालांतराने त्यांना नेटिव्ह अमेरिकन्स असं म्हटलं जाऊ लागलं.
हेंडीने स्प्रिंगफिल्ड येथे स्वतःची इंडियन सायकल विकायला सुरवात केली. ती चांगली चालत देखील होती. पण त्याच पुढचं टार्गेट मोटरसायकल बनवण्याचं होतं. युरोपमध्ये पळत असलेल्या मोटरसायकली आपल्या अमेरिकेत सुद्धा पाहिजेत हे त्याच स्वप्न होतं. अखेर हे स्वप्न पूर्ण करणारा माणूस त्याला सापडला. तो होता ऑस्कर हेडस्टोर्म.
हा पण गडी सायकल शर्यतीचा रेसर. त्याला लहानापासून मशीन बरोबर खेळायची सवय होती. त्यानेच सायकलीला मोटर बसवून पेसर नावाची बाईक बनवलेली. हि बाईक रस्त्यावर चालण्यास तितकी उपयोगाची नव्हती पण तीच डिझाईन जबरस्त होतं.
हेंडी जेव्हा या ऑस्करला भेटला तेव्हा त्याला त्याच्यातील टॅलेंट लक्षात आलं. याला जर चांगलं फंडिंग दिल तर तो आपल्याला भारी मोटरबाइक बनवून देईल याची हमखास खात्री होती. आणि झालंही तसंच . एकाला दिघे मिळाले, डोकं लावलं आणि अमेरिकेची पहिली मोटरबाइक तयार झाली.
हेंडी आपल्या गाडीच्या नावासाठी सुरवातीपासून पझेसिव्ह होता. त्याला एकच नाव ठेवायचं होतं , !!इंडियन
सायकलीच्या काळापासून ते त्याच्यासाठी लकी नाव होतं. पुढे त्याने एका मुलाखती मध्ये सुद्धा सांगितलं,
“I realized that in the name Indian we had a winner for bicycles. When the motorcycle came along a year or so later, it simply was out of the question to think of calling it anything but Indian. The name fitted the motorcycle even better than it did the bicycle, and before many moons had passed, the new warrior had deposed the Old Chief from the Wigwam
१९०१ साली अमेरिकन इंडियन मोटारसायकल कंपनी स्थापन झाली. तिथून आजवर १२० वर्षे झाली हि अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या मोटारसायकल कंपनीपैकी एक आहे. तिच्या पेक्षा दोन वर्षे लहान असणाऱ्या हार्ले डेव्हिडसन आणि इंडियन या दोनच कंपन्यांमध्ये अमेरिकेत भांडण असतं.
आजकाल आपण जगात मोठमोठ्या बाईकवर बसलेले तगडे ब्लॅक कपड्यांमधले रायडर्स ग्रुप बघतो ते इंडियन बाईकवालेच असतात.
प्रचंड अवाढव्य असणारी इंडियन बाईक याच रायडर्स साठी फेमस आहे. आपल्या इथं बुलेटवर बसून लेह लद्दाखला जाण्याची फॅशन इथूनच सुरु झाली. बाकी काही का असेना भारताचा संबंध काही का नसेना आजही या इंडियन गाडीवरच अमेरिकी प्रेम कमी झालेलं नाही.
हे ही वाच भिडू.
- एम-८० जेव्हा लॉन्च झाली तेव्हा पहिल्याच दिवशी तब्बल १२ लाख गाड्या बुक झाल्या होत्या
- पटणार नाय पण आजही भारतातनं सगळ्यात जास्त एक्स्पोर्ट होणारी बाईक बजाज बॉक्सर आहे
- आर्मीला रॉयल एन्फिल्ड बुलेट हवी होती, नेहरूंनी अट घातली मेड इन इंडियाचं पाहिजे.
- भावानों! जावा आली रे !!!