भारतीय शास्त्रीय संगीताची भाषा एका मराठी माणसाने ठरवली होती.

आपल्या भारताला शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे. भारतातल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी शास्त्रीय संगीत ऐकलेलं असतंच. यमन , भैरवी, मल्हार या रंगांची नावं तरी आपण किमान ऐकलेली असतात. शास्त्रीय संगीत आणि त्यातील राग यामधील आपल्याला भलेही काही कळत नसेल पण एक तर नक्की असतं कि आपण आजवर जी गाणी ऐकली त्याचा पाया हा शास्त्रीय संगीत असतो.

आपण गजल, ठुमरी, भजन इतकंच नाही तर बॉलिवूडमधले सदाबहार गाणे यांचा संबंध सुद्धा शास्त्रीय गायनाशी येतो. शास्त्रीय गायनातील या रागांचा नक्की काय विषय आहे ? बऱ्याच वर्षांआधी मौखिक आणि ऐकीव पद्धतीने शास्त्रीय संगीत शिकवलं जायचं.

गुरुगृही राहून गुरूंकडून शास्त्रीय शिक्षण घेतलं जायचं. पण संगीताला भाषा असल्यामुळेच आपल्याला इतकी गाणी ऐकता येतात, नवीन गाणी तयार करता येतात.

शास्त्रीय संगीताला लिपिबद्ध आणि व्यवस्थित वर्गीकृत केलं ते एका मराठी माणसाने आणि ते होते, पंडित विष्णू नारायण भातखंडे.

पंडित पलुस्कर हे पंडित भातखंडेंचे समकालीन होते. दोघांनीही शास्त्रीय संगीतात भरीव काम केलं आणि व्यापक रूपात सातासमुद्रापार ते पोहचवलं. पण पलुस्कर यांनी जे शास्त्रीय संगीताचं वर्गीकरण केलं होतं ते अतिशय अवघड होतं. त्यांच्या तुलनेत भातखंडे यांनी जी पद्धत मंडळी ती अधिक सोपी होती. भातखंडे यांनी रागांना एका परिवारासारखं समजून त्याच वर्गीकरण केलं.

भातखंडेंनी रागांचं दहा वर्गात विभाजन केलं. हे एका अर्थी वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाचं मानलं गेलं. आवाजाच्या रियाजात आणि हार्मोनियम यांच्या असणाऱ्या कोमल आणि तीव्र स्वर यांची देणगी हि भातखंडेंनी दिली आहे.

१० ऑगस्ट १८६० ला मुंबईतल्या बालकेश्वर मध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून घरातलं सांगीतिक वातावरण त्यांना लाभलं. वयाच्या ११ व्या वर्षी ते बासरी वादनात पटाईत झाले होते. बुआ बेलबागकर यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे गिरवले. बऱ्याच मोठमोठ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली ते शिकत राहिले.

वकील झाल्यावरही त्यांचं संगीताचं वेड काही कमी झालं नाही. कराचीमध्ये ते वकिली करत होते. पुढे पत्नी आणि मुलीच्या निधनाने त्यांना जबर धक्का बसला. वकिलीत त्यांचं मन लागेनासं झालं मग त्यांनी वकिली सोडून मुंबईकडे आपला मोर्चा वळवला. मुंबईत शास्त्रीय गायनात ते मग्न झाले.

मुंबईत आल्यावर त्यांना अनेक गायन क्षेत्रातले लोक भेटले, त्या लोकांसोबत त्यांनी देशभरातल्या शास्त्रीय संगीताची माहिती काढली. तब्बल १५ वर्ष त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. मराठी , हिंदी, तेलगू, गुजराती, संस्कृत आणि इंग्रजीतही त्यांनी शास्त्रीय संगीत उपलब्ध करून दिले.

दुर्मिळ असलेल्या ३०० बंदिश त्यांनी शोधून काढल्या आणि संगीतबद्ध करून प्रकाशितही केल्या. इतक्या वर्षांचा अभ्यास करून त्यांना वाटलं कि शास्त्रीय संगीत पुन्हा एकदा नव्याने मांडायला हवं. यावर त्यांनी विपुल लेखन केलं. शास्त्रीय संगीताच्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले त्याला सर्वानुमते मंजुरी मिळावी.

मराठी भाषेत त्यांनी संगीत शास्त्र नावाचं महाकाव्य लिहिलं तेही चार खंडांमध्ये. याचा उद्देश एकच होता कि शास्त्रीय संगीत हे सामान्य लोकांमध्ये रुजावं. पंडित भातखंडे यांच्याबद्दल म्हणलं जात कि , दोन हजार बंदिश त्यांनी नव्याने तयार केल्या आणि दोनशे रागांची निर्मिती त्यांनी केली. शास्त्रीय संगीत हे सिस्टेमॅटिक पद्धतीने शिकवलं जावं अशी त्यांची अट होती.

सयाजीराव गायकवाड महाराजांच्या मदतीने भातखंडेंनी बडोदा आणि लखनौ अशा ठिकाणी दोन महाविद्यालये उभारली. लखनौ मधल्या महाविद्यालयाला पंडित भातखंडे यांचं नाव देण्यात आलं. आज भारतातली संगीत क्षेत्रातली महत्वाची असलेली हि दोन महाविद्यालये आहेत.

पंडीत भातखंडे यांनी जी शास्त्रीय रंगांची आणि संगीताची वर्गीकृत निर्मिती केली तीच आपण आज विविध गाण्यांमधून ऐकत असतो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.