कोहलीचे किती जरी लाडके असले तरी आता शास्त्री गुरुजींच्या गच्छंतीची वेळ जवळ आलीय..

येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल होणार आहे. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री लवकरच टीम इंडियाची साथ सोडू शकतात. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमीरात (UAE)  मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपनंतर शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरुण, फील्डिंग कोच आर श्रीधर आणि बॅटिंग कोच विक्रम राठोड टीम इंडियापासून वेगळे होऊ शकतात.

आता तसं म्हणायला शास्त्रींसोबत सगळ्या कोचिंग स्टाफचा कार्यकाळही नोव्हेंबरमध्ये संपतोय. पण यामागचं मोठं कारण  ICC जेतेपद जिंकण्यात टीम इंडियाचे अपयश असल्याचे मानले जातेय. कारण शास्त्री कोच असताना टीम इंडिया एकही ICC किताब जिंकू शकली नाहीये.

शास्त्रींनी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ला याबाबत माहितीही दिली आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, बीसीसीआयला येत्या टी-२० वर्ल्ड कपनंतर नवीन कोचिंग स्टाफ नेमायचा आहे, जेणेकरून भारतीय क्रिकेट संघाला आणखी चांगली कामगिरी करता येईल.

रवी शास्त्रींची कामगिरी

रवी शास्त्री पहिल्यांदा २०१४ मध्ये डायरेक्टर म्ह्णून भारतीय संघाशी जोडले होते. त्यांचा हा कॉन्ट्रॅक्ट २०१६ पर्यंत होता. त्यांनतर शास्त्रींना एका वर्षासाठी कोच म्ह्णून नियुक्त करण्यात आलं. अनिल कुंबळेनंतर २०१७ मध्ये ते टीम इंडियाचे फुल टाइम बनले.

त्यावेळी शास्त्रींसोबत २०१९ च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत कॉन्ट्रॅक्ट केल होत. मात्र २०१९ मध्ये चांगल्या प्रदर्शनानंतर शास्त्रींचा कॉन्ट्रॅक्ट २०२० च्या टी-२० वर्ल्ड कप पर्यंत पुढे वाढवण्यात आला होता.  पण गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे टी -२० वर्ल्ड कप होऊ शकला नाही, पण यावर्षी होणाऱ्या टी -२० वर्ल्ड कंपनंतर  शास्त्रींचा कार्यकाळ संपेल.

शास्त्रींच्या ट्रेनिंगमध्ये भारताने एक ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला तो ऑस्ट्रेलियात. ऑस्ट्रेलियाला टेस्ट सीरिजमध्ये त्यांच्याच घरच्या स्टेडियमवर धूळ चाखली. यानंतर, गेल्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल खेळला गेला.

मात्र, शास्त्री, श्रीधर आणि विक्रम यांच्या ट्रेनिंगमध्ये टीम इंडियाने कधीही आयसीसीचे जेतेपद पटकावले नाही. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्येही संघाच्या हाती काहीच लागेल नाही.

शास्त्रींच्या कोचिंगमध्ये भारतीय संघ

२०१७ मध्ये भारतीय संघाचा हेड कोच म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांच्या ट्रेनिंगमध्ये संघाने ४० टेस्ट मॅच जिंकल्या ज्यातल्या २३ जिंकल्या. त्यांनतर ७६ वनडे मॅचपैकी ५१ मॅच भारताने आपल्या  खिश्यात घातल्या. यांनतर शास्त्रींच्या कोचिंगमध्ये भारतीय संघाने ६० टी -२० मॅच खेळले, ज्यातल्या ४० मॅचमध्ये भारताला विजय मिळालाय. 

आता रवी शास्त्रींच्या क्रिकेट लाईफबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, १९८१ मध्ये इंग्लड विरुद्धच्या वन डे मॅचमध्ये त्यांनी डेब्यू केलं होत. युवराजच्या आधी एका ओव्हरमध्ये सहा सिक्स ठोकण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे.  सगळ्यात फास्ट डबल सेंच्युरी मारण्याचा त्यांचा रेकॉर्ड आजही चर्चित आहे.

शास्त्री वगळता बॉलिंग कोच भरत अरुण यांच्यामुळे टीम इंडियाच्या बॉलिंगमध्ये चांगलीच सुधारणा झालीये. संघात फास्ट बॉलरचा एक पूल तयार झालाय. तर आर श्रीधर यांनी भारतीय संघाला एकदम जबरदस्त फिल्डिंग शिकवली. पण आता, क्रिकेट बोर्डाने ठरवलेय की, संघाला पुढील स्तरावर पोहोचण्यासाठी बदलाची आवश्यकता आहे.

दरम्यान रिपोर्टनुसार, नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे (NCA) डायरेक्टर राहुल द्रविडला संघाचे नवीन हेड कोच म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

आता रवी शास्त्री आणि बाकीच्या कोच टीमचा कार्यकाळ संपतोय, म्हंटल्यावर नवीन हेड कोचच्या नावाची चर्चा सुरु झालीये. यात संघाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.  द्रविडने इंडिया-A आणि भारताच्या अंडर -१९ क्रिकेट संघाला त्याच्या कोचिंगमध्ये भरपूर यश मिळवून दिले. अलीकडेच, श्रीलंकेविरुद्धही राहुल द्रविड संघासह हेड कोचच्या भूमिकेत दिसला. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीज जिंकली होती.

त्यात आता राहूल द्रविडच्या NCA चीफचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा संपणार आहे. जुलै २०१९ मध्ये द्रविडची एनसीए प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे बोर्डाने एनसीए चीफ पदासाठी नवीन अर्ज मागवलेत. जर द्रविडने एनसीएच्या चीफ पदासाठी पुन्हा अर्ज केला नाही, तर टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी त्याचा नावावर शिक्कामोर्तब होणार हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.