प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळ्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा आर.पी. निवृत्त झालाय !!!

भारताला २००७ साली द. आफ्रिकेत पार पडलेला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात अतिशय महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रुद्र प्रताप सिंग अर्थात आर.पी. सिंगने याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये.

आपले बूट खुंटीला टांगून आपण क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर करत या प्रवासात सोबत असलेल्या सर्वांचे आभार मानत आर.पी.ने ट्विटरवरून आपला क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला.

rp shirt

आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत क्रिकेटच्या तिन्ही  फॉरमॅटमध्ये मिळून एकूण ८२ सामन्यांमध्ये आर.पी.ने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये त्याने  १२४ विकेट्स पटकावल्या.

आयपीएलमध्ये देखील ८२ सामन्यात खेळताना ९० विकेट्स त्याच्या नावावर जमा आहेत. डेक्कन चार्जर्सच्या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्वाची भूमिका होती.

आर.पी. सिंगची भारतीय क्रिकेटमधली कारकीर्द फार मोठी राहिली नसली तरी सगळ्या प्रकारच्या फॉरमॅटमध्ये भारताकडून पदार्पण करताना त्याच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. आर.पी. सिंग प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळ्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केलं होतं.

आर.पी.ने सर्वप्रथम २००५ साली झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून भारतीय संघात जागा मिळवली. त्यावेळी भारतीय संघाचा कॅप्टन होता सौरव गांगुली. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातून भारताच्या कसोटी संघात पदार्पण केलं. त्यावेळी भारतीय संघाची धुरा होती राहुल द्रविडच्या खांद्यावर. विशेष म्हणजे या पहिल्याच सामन्यात तो ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

rp t 20

आर.पी. साठी टी-२० संघाचे दरवाजे उघडले २००७ सालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये. स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात. त्यावेळी भारताचा कॅप्टन होता अर्थात महेंद्र सिंग धोनी. या विश्वचषकात आर.पी. कमालीचा यशस्वी ठरला. विश्वचषकातील ७ सामन्यांमध्ये १२ विकेट्स मिळवत त्याने भारताच्या विश्वविजयात मोलाचा वाटा उचलला.

यानंतर येते आयपीएल स्पर्धा. आयपीएलची सुरुवात २००८ सालची. या पहिल्याच सिझनमध्ये आर.पी.चा समावेश डेक्कन चार्जर्सच्या संघात होता. डेक्कनच्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आर.पी.चं आयपील पदार्पण झालं. त्यावेळी डेक्कन चार्जर्सचा कॅप्टन होता व्ही.व्ही.एस. लक्ष्मण.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.