रूममेटनं रिसेप्शनिस्टला डेटसाठी विचारलं आणि जगातल्या सर्वोत्तम लेगस्पिनरची कारकीर्द संपली
सर गॅरी सोबर्स यांना ज्यावेळी जगातला सर्वोत्तम लेगस्पिनर बॉलर निवडण्याविषयी सांगण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी साठच्या दशकातील ख्यातनाम भारतीय स्पिनर सुभाष गुप्ते यांच्या नावाची निवड केली होती. जगभरातल्या दादा फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणाऱ्या भारतीय स्पिनर्ससाठी गुप्ते कायमच प्रेरणास्थान राहिलेले आहेत.
बिशनसिंग बेदी पासून ते अगदी अनिल कुंबळे पर्यंत सर्वानीच सुभाष गुप्तेंच्या महानतेचा महिमा कधी ना कधी गायलाय.
विनू मंकडने देखील म्हणून ठेवलय की,
“क्रिकेट जर जादू असेल तर, सुभाष गुप्ते हे जादुगार होते.”
२००२ साली गुप्ते गेले, पण त्यांचा वारसा कायमच भारतीय क्रिकेटच्या सोबत आहे.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एकाच डावात प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वच्या सर्व फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी करणारे सुभाष गुप्ते हे पहिलेच भारतीय होते. १९५४-५५ च्या हंगामात मुंबईच्या संघाकडून खेळताना ७८ रन्स देऊन १० विकेट्स मिळवत त्यांनी हा विक्रम आपल्या नावे केला होता.
पुढे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत देखील अशीच संधी त्यांना मिळाली होती.
१९५८-५९ साली वेस्ट इंडीजचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यावरील कानपूर कसोटीत त्यांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली होती. वेस्ट इंडीजच्या ९ बॅट्समनने त्यांच्या फिरकीसमोर सपशेल शरणागती पत्करली होती.
भारताचा विकेट कीपर नरेन ताम्हणेने जर स्टंपमागे लान्स गिब्जचा कॅच सोडला नसता तर, अनिल कुंबळेला जो रेकॉर्ड करताना बघायला भारतीय क्रिकेटरसिकांना १९९९ सालातील पाकिस्तानविरुद्धच्या कोटला कसोटीची वाट बघायला लागली तो रेकॉर्ड १९५९ सालीच सुभाष गुप्तेंच्या नावे जमा झाला असता.
कसोटीच्या एका डावात १० विकेट्स मिळविणारे गुप्ते पहिले भारतीय ठरले असते.
सुभाष गुप्ते भारतासाठी फक्त ३६ कसोटी सामने खेळले, त्यात त्यांनी १४९ विकेट्स मिळवल्या. क्रिकेट कारकिर्द अगदी जोमाने सुरु असतानाच त्यांच्यासोबत एक वाईट किस्सा घडला आणि त्यातच या महान खेळाडूची कारकीर्द वयाच्या ३२ व्या वर्षी संपुष्टात आली.
१९६१ सालच्या दिल्ली कसोटीतील गोष्ट.
गुप्ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने आपल्याला फोनवरून त्रास देण्यात येत असल्याची तक्रार केली. जेव्हा फोनचे रेकॉर्ड्स तपासण्यात आले, त्यावेळी तो फोन गुप्तेंच्या रूममधून आल्याचे स्पष्ट झाले. गुप्तेंचे रुममेट कृपाल सिंग यांनी हा कॉल केला होता. कृपाल सिंग हे रिसेप्शनिस्टला डेट करू इच्छित होते.
या संपूर्ण प्रकरणात गुप्तेंचा सहभाग कुठेच नव्हता. परंतु असं काही करण्यापासून गुप्तेंनी कृपाल सिंग यांना थांबवायला हवं होतं. तसं त्यांनी केलं नाही म्हणून या प्रकरणात व्यवस्थापनाने गुप्ते यांना दोषी धरलं आणि पुढच्या दौऱ्यासाठी त्यांना टीममधून डच्चू देण्यात आला. त्यामुळे हीच कसोटी त्यांची भारतीय संघासाठी शेवटी कसोटी ठरली.
त्यानंतर ते वेस्ट इंडीजमध्ये स्थायिक झाले आणि २००२ मध्ये वेस्ट इंडीजमध्येच त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा.
- भारतीय क्रिकेटचा बाजीराव, खंडेराव मोरेश्वर रांगणेकर.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा पहिला स्पिनर, ज्याने एकही नो-बॉल टाकला नाही !
- तर भारतीय क्रिकेटचे जन्मदाते रणजीत सिंह इंग्लंड संघाचे कॅप्टन झाले असते !!!
- भारतीय क्रिकेटमधील खलनायक, ज्याने स्वार्थापोटी देशहित फाट्यावर मारलं !
- चेतन चौहान हा विक्रम करणारे जगातील पहिलेच क्रिकेटपटू ठरले होते.