असाच पाठींबा मिळत राहिला तर संघासाठी खेळताना जीव देखील देऊ- सुनील छेत्री

 

“तुमचा जर असाच प्रतिसाद मिळत राहिला तर संघासाठी खेळताना आम्ही जीव देखील देऊ” भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने  आपल्या  १०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर प्रेक्षकांना धन्यवाद देताना ट्वीटरवर व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया. प्रेक्षकांना धन्यवाद देताना छेत्री भारावून गेला होता, तो प्रचंड भावनिक झाला होता. प्रेक्षकांनी संपूर्ण भरलेल्या स्टेडियमवर खेळणं ही खूप खास गोष्ट असते. आम्ही जेव्हा कधी मैदानावर असू, त्या प्रत्येकवेळी खेळासाठी सर्वतोपरी योगदान देण्याचं वचन देतो, असंही त्याने आपल्या प्रतिक्रियेत म्हंटलं.

सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने केनियाचा ३-० असा पराभव केला. या विजयामुळे भारताचं स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील स्थान पक्कं झालं आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्युझीलंड विरुद्ध असणार आहे.

भारत विरुद्ध केनिया यांच्या दरम्यानचा इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेतील हा सामना यासाठी देखील विशेष होता कारण भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याचा हा १०० वा  सामना होता. बाईचुंग भुतिया नंतर १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा सुनील छेत्री हा केवळ दुसराच भारतीय फुटबॉलपटू ठरला. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात जिथे फुटबॉलला प्रेक्षकांचा फारसा पाठींबा मिळत नाही, अशावेळी छेत्रीची ही कामगिरी निश्चितच दखलपात्र आहे. सुनील छेत्रीचा हा सामना संस्मरणीय बनवण्यासाठी मैदानात भारतीय संघाचा माजी कर्णधार बाईचुंग भुतिया आणि बॉलीवूड स्टार अभिषेक बच्चन हे देखील उपस्थित होते. सामन्यादरम्यान बाईचुंग भुतिया आणि आय.एम. विजयन यांच्या हस्ते सुनील छेत्रीचा ऐतिहासिक कामगिरीबद्दल  गौरव देखील करण्यात आला.

bhutia chettri

इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने चायनीज तैपेई संघाचा ५-० असा पराभव केला होता. परंतु या सामन्याला खूपच कमी प्रेक्षक उपस्थित होते. त्यामुळे केनिया विरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला सुनील छेत्रीने भारतातील फुटबॉल चाहत्यांना एका व्हिडीओद्वारे अतिशय भावनिक आवाहन केलं होतं. “तुमची उपस्थिती हिच आमच्यासाठी प्रेरणा आहे. आमचा खेळ बघण्यासाठी तुम्ही मैदानात या. मैदानावरील आमचा खेळ बघून हवं तर आम्हाला शिव्या घाला, पण मैदानावर उपस्थित रहा” अशा स्वरूपाचं भावनिक आवाहन सुनील छेत्रीने फुटबॉल चाहत्यांना केलं होतं. त्याच्या या आवाहनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार सचिन तेंडूलकर या दोघांनीही हा व्हिडीओ शेअर करत सुनील छेत्रीच्या आवाहनाला पाठींबा दिला होता.

सुनील छेत्रीच्या या आवाहनामुळे अल्पावधीतच भारत आणि केनिया दरम्यानच्या सामन्याचे सर्व तिकिटे विकली गेली आणि सामन्याला फुटबॉल चाहत्यांनी तोबा गर्दी केली. सुनील छेत्रीने देखील प्रेक्षकांना निराश केले नाही. मुसळधार पावसात खेळल्या गेलेल्या आपल्या १०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात २ गोल करत भारताच्या विजयात त्याने सिंहाचा वाटा उचलला.

Leave A Reply

Your email address will not be published.