सद्दामने केलेल्या हल्यात अडकलेल्या १ लाख ७० हजार भारतीयांना एअर इंडियाने बाहेर काढलं

रशिया आणि युक्रेनच्या भांडणांमध्ये आपले कित्येक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकलेत. पण त्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्याच्या भारत सरकारच्या हालचाली चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेदरम्यान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी व नागरिकांचा मुद्दा मांडला. याबाबत पुतीन यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या चर्चेनंतर अवघ्या २४ तासांच्या आत भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांच्या परतीचा मार्ग खुला झाला आहे. 

युक्रेनमधून ४७० भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतणार आहे. त्यांच्यासाठी भारतातून एअर इंडियाची दोन रवाना होणार होणार असून लवकरच तिथून विशेष विमानाने त्यांना मायदेशी आणले जाणार असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे…या दोन्ही देशामधील तणावग्रस्त वातावरण पाहता परिस्थिती कधी आटोक्यात येईल हे सांगणं आता तरी सांगणं शक्य नाहीये मात्र भारत अशा परिस्थितीमध्ये त्या-त्या देशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणते याचा दावा आपण इतिहासातल्या काही घटना पाहून करूच शकतो..

इतिहासाचा संदर्भ लढण्याचा मुद्दा म्हणजे, अशीच एक गंभीर परिस्थिती आपल्यावर ओढवली होती. थेट आपल्या देशावर नसली तरी आपल्या भारतीय नागरिकांवर ओढावली होती जे कुवेत मध्ये स्थायिक होते. 

पण आपण या घटनेचा इतिहास विसरलोत. सुमारे ३२ वर्षांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट १९९० मध्ये सद्दाम हुसेनच्या नेतृत्वाखाली इराकने शेजारच्या कुवेतवर हल्ला केला. त्यावेळी सुमारे एक लाख सत्तर हजार भारतीय युद्धग्रस्त कुवेतमध्ये अडकले होते. एअर इंडियाने भारतीय लष्कराच्या मदतीने फक्त ५९ दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने भारतीयांना सुखरूप परत आणले होते. 

भारताच्या या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी बचाव मोहीम ठरलेली आहे.. या ऑपरेशनसाठी अनेक पातळ्यांवर केलेल्या नियोजनामुळे आणि पूर्णत्वास नेलेल्या मोहिमेला यश मिळाले होते. 

नेमका काय इतिहास आहे या घटनेचा ?

१९९० मध्ये आखाती युद्धादरम्यान सद्दाम हुसेन ने कुवेतवर हल्ला केला होता.  २ ऑगस्ट १९९० रोजी अचानक कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांना बातमी कळली कि इराकने या कुवेतवर हल्ला केलाय. आपल्या देशापासून हजारो मैल दूर या आखाती देशात राहणाऱ्या भारतीयांवर संकटाचा डोंगर कोसळला. तसं तर कुवेतचे इराकपासूनचे अंतर फारसे नव्हते आणि सद्दामच्या सैन्यासमोर उभे राहण्याचे धाडस करण्याइतकी त्याची ताकदही नव्हती. 

कुवेतचे सुरक्षा दल घाबरून काही तासांतच पळून गेले आणि तिथला शासक असलेला अमीरही जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतः सुरक्षित स्थळी निघून गेला. कुवैतीचे राजघराणे सौदी अरेबियाला पळून गेले होते. काहीच तासात इराकींनी शहर ताब्यात घेतले होते. संध्याकाळपर्यंत कुवेतच्या रस्त्यावर इराकी रिपब्लिकन गार्ड दिसू लागले. सगळीकडेच सशस्त्र इराकी गार्डस पाहून कुवेतचे स्थानिक लोकं घाबरून गेले, त्यात भारतीयांचाही समावेश होता. तेंव्हाच्या मोघम आकडेवारीनुसार, त्यावेळी सुमारे अडीच लाख भारतीय कुवेतमध्ये राहत होते. 

यापैकी बहुतेक लोकं कुवेतीच्या उद्योगांमध्ये कामावर होते. इराकच्या गार्डसने तसे कुणाचेही नुकसान केले नव्हते पण त्यांची जबरदस्त दहशत होती. इराकचे लोकं रस्त्यांवर दिसलेल्या लोकांना अडवत होते. निर्माण झालेलं वातावरण इतकं भयानक होतं कि, या अचानक ओढवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये प्रत्येकांनी स्वतःला आहे तिथे कैद करून घेतले होते. काही लोकांनी स्वतःला घरांमध्ये कैद करून घेतले होते. तर काहींनी ऑफिसमध्ये.  

कुवेतच्या अमीराने देश सोडल्यानंतर, परिस्थिती आटोक्यात येण्याचा काही चान्सच दिसत नव्हता.  कारण सद्दाम हुसेनने कुवेतला आपल्या देशाचा भाग मानून येथे इराकी राजवट घोषित केली होती. सद्दाम हुसेनने आपल्या भावाला ज्याचं नाव अली हसन अल-माजिद होतं, त्याला केमिकल अली म्हणूनही ओळखले जायचं. त्याला कुवेतचे नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्त केले होते. 

कुवेतचं सुरक्षा दल पळून गेलं, शासक देखील पळून गेला शेवटी भारतीय समुदायाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी भारत सरकारवर आली आणि म्हणूनच सर्वात मोठ्या हवाई निर्वासन मोहिमेला सुरुवात झाली. या दरम्यान, कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी तत्कालीन चंद्र शेखर सरकारने पावले उचलली. या कामगिरीची जबाबदारी तत्कालीन परराष्ट्रमंत्री इंदर कुमार गुजराल यांच्यावर सोपवण्यात आली होती, ते लगेचच या मुद्द्यावर सक्रिय झाले आणि त्यांनी जेद्दाहमध्ये इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांची भेट घेतली. 

मात्र, या दोन्ही नेत्यांची भेट घडवून आणण्यात कुवेतमध्ये राहणाऱ्या एका निनावी भारतीय अब्जाधीशाची भूमिका महत्वाची होती असं मानलं जातं..

त्यांनी दोन्ही नेत्यांची भेट घडवून आणली आणि त्यानंतरच १ लाख ७० हजार भारतीयांना कुवेतमधून बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली. २०१६ मध्ये या निनावी व्यक्तीवर अक्षय कुमारचा ‘एअरलिफ्ट’ पिक्चर आला होता ज्यामध्ये त्याने रणजीत कात्यालची भूमिका केली होती. रणजीत कात्यालने एअर इंडियाच्या मदतीने १ लाख ७० हजार भारतीयांना एअरलिफ्ट करण्याचा एकट्याने प्रयत्न केल्याचा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे.पण आजपर्यंत याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नसला तरी, ही कारवाई भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांचा एकत्रित प्रयत्नाने शक्य झाल्याचे मानले जाते. 

या मोहिमेत प्रथम सर्व भारतीयांना जॉर्डनच्या सीमेवर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर या ६० दिवसांच्या मोहिमेत भारतीय विमान कंपनी ‘एअर इंडिया’ने रात्रंदिवस एकूण ५०० उड्डाणे केली, ज्यामध्ये बहुतांश भारतीयांना येथून बाहेर काढण्यात यश आले होते. 

पण कुवेतमधून भारतीय समुदायाला बाहेर काढणे सोपे काम नव्हते. कुवेतमध्ये त्यांनी आयुष्यभर कमावलेले सर्व काही सोडायला लोकं तयार नव्हते. त्यांनी परिस्थिती काय याचं गांभीर्य न ओळखता  त्यांचं तेथील सेटल आयुष्य ते सोडायला नव्हते, त्यांना विश्वासात घेऊन पार्ट आणणं हे भारत सरकारसाठी मोठं जिकिरीचं होऊन बसलं होतं. आणि दुसरा एका अडचणीचा मुद्दा बनला होता तो म्हणजे,  तेथे राहणाऱ्या अनेक भारतीय लोकांकडे वैध प्रवासी कागदपत्रे नव्हती कारण त्यांनी ती त्यांच्या मालकांना दिली होती, जे मालक त्या धावपळीत एकतर बेपत्ता झाले होते.

या नंतर एअर इंडिया आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या या मोहिमेचे जगभरात कौतुक झाले होते.  इतक्या लोकांनी एकत्र एअरलिफ्टिंग केल्यामुळे या कामगिरीचा उल्लेख ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झालेला. भारताची ही अनोखी ताकद जगाने प्रथमच पाहिली होती अन सगळेच हैराण झाले होते. 

भारत सरकारने वेळोवेळी हे सिद्ध केले आहे की जगातील कोठेही संकट येवो भारत सरकार आपल्या लोकांना सुरक्षितपणे देशात परत आणण्यात कोणतीही कसर सोडत नसते.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.