मणिशंकर अय्यर म्हणतायत, २०१४ नंतर आपण स्वतंत्र नाही, तर अमेरिकेचे गुलाम झालोय

अभिनेत्री कंगना राणावतनं, ‘देशाला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक आहे. देश खऱ्या अर्थानं २०१४ मध्ये स्वतंत्र झाला,’ असं वादग्रस्त विधान केलं. त्याच्यावरुन देशातलं वातावरण चांगलंच तापलं. अनेकांनी कंगणाच्या बेताल वक्तव्यावर सडकून टीका केली. मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिला आणि तेही टीकेच्या भक्ष्यस्थानी पडले.

त्यानंतर देशात अनेकांनी स्वातंत्र्य लढ्याबाबत वेगवेगळी वक्तव्य केली. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यरही अशाच एका वक्तव्यामुळं चांगलेच चर्चेत आलेत. तशी चर्चेत येण्याची मणिशंकर अय्यर यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांची अनेक वक्तव्य अनेकदा गाजली आहेत.

काय म्हणालेत मणिशंकर अय्यर-

इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी गेल्या सात वर्षांतलं भारताचं परराष्ट्र धोरण, भारत-रशिया मैत्री यावर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच १९५५ पासून भारत आणि रशियामधले संबंध सातत्यानं दृढ होत गेले. काँग्रेस सरकारच्या काळात हे संबंध आणखी सुधारले. इतक्या वर्षांची ही मैत्री २०१४ पर्यंत टिकून होती. मात्र २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं आणि भारत व रशियामधलं अंतर वाढत गेलं.’

‘सरकार आपल्याला सांगतं की, आपण चीनपासून वाचलं पाहिजे. पण चीनच्या सगळ्यात जवळ हे सरकारच आहे. यांच्यामुळं २०१४ पासून देश अमेरिकेचा गुलाम झाला आहे. गेल्या सात वर्षांत अलिप्ततावाद धोरणाची कोणतीही चर्चा झालेली नाही. शांतता प्रस्थापित करण्याबाबतही चर्चा झालेली नाही, हे सगळं आपण पाहतोयच,’ असंही अय्यर म्हणाले.

जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा दाखला

भारत आणि रशियाचे संबंध दृढ करण्यात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मोठे प्रयत्न आहेत याचा दाखलाही मणिशंकर अय्यर यांनी दिला. ते म्हणाले, ‘जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यामुळं भारत आणि रशियात सर्व क्षेत्रांतले संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळं रशियानं प्रत्येकवेळी भारताची साथ दिली. इंदिरा यांना रशियामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. उझबेकिस्तानमध्ये तर अनेकांनी आपल्या मुलीचं नाव इंदिरा ठेवलं होतं. त्यांच्या लोकप्रियतेमुळं इंदिरा हे नाव रशियन वाटू लागलं होतं.’

याआधीही मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता…

२०१७ मध्ये गुजरात निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान मणिशंकर अय्यर यांनी, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीच प्रकारचे व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडे कोणतीही सभ्यता नाही,’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ उठला आणि मोदींनी जाहीर सभेतून, ‘मणिशंकर अय्यर मला नीच आणि निम्न जातीचा म्हणाले, गटारीतला किडा म्हणाले. हा गुजरातचा अपमान नाही का?’ असं प्रत्युत्तर दिलं.

पुढं निवडणुकीत भाजपला याचा चांगलाच फायदा झाला. मणिशंकर अय्यर यांना मात्र हे वक्तव्य महागात पडलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिशंकर अय्यर यांनी त्वरित माफी मागावी, अशी अपेक्षाही केली होती. या वक्तव्यामुळं काँग्रेसनं अय्यर यांचं निलंबनही केलं होतं.

त्यानंतर, काँग्रेसनं त्यांना पुन्हा पक्षातही घेतलं. मध्यंतरी अय्यर यांनी ऐतिहासिक व्यक्तींबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं. ते म्हणाले होते, ‘अकबरानं देशावर ५० वर्ष राज्य केलं. त्यामुळंच, मी राहत होतो त्या रस्त्याचं नाव अकबर रोड असं ठेवण्यावर आमची काहीच हरकत नव्हती. आम्ही त्या रस्त्याला महाराणा प्रताप यांचं नाव द्या असं कधीच म्हणलो नाही. कारण आम्ही अकबराला परकं मानत नाही, आम्ही त्याला आपलंच मानतो.’ या वक्तव्यावरूनही त्यांच्यावर टीकेची झोड उडवण्यात आली होती.

आता त्यांच्या भारत आणि अमेरिकेबाबतचच्या वक्तव्यावरुन आणखी नवा वाद सुरु होणार का? आणि आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला याचा फायदा होणार की फटका बसणार? याकडे लोकांचं लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.