क्वालिफाय व्हायला १५-० स्कोअर हवा होता, भारतानं १६-० नं डाव खिशात टाकलाय

सध्या बातम्यांमध्ये काय असतंय, तर आयपीएलमध्ये कोण जिंकलं? कोण हरलं? कोण कुणावर चिडलं आणि कोण नाही? या बातम्यांच्या गर्दीत एक सगळी स्पर्धाच हरवून गेली होती, ती म्हणजे आशिया कप हॉकी.

हॉकी म्हणलं की आधी आपल्याला मेजर ध्यानचंद आठवायचे, नंतर ही जागा ‘चक दे इंडिया’नं घेतली आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडलला गवसणी घालणाऱ्या भारतीय संघानं. दुर्दैव असं आहे, की भारतीय हॉकी संघानं काहीतरी मोठा धमाका केल्याशिवाय, त्यांच्याकडे कुणाचं लक्ष जात नाही.

पण सुदैव असं आहे, की भारतीय हॉकी संघ इतका चिवट आहे की तो मोठा धमाका केल्याशिवाय राहतही नाही.

आशिया कप २०२२ मध्ये भारतीय संघानं असाच एक धमाका केलाय. गुरुवारी भारतीय संघाची मॅच होती, इंडोनेशिया सोबत. स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये दाखल होण्यासाठी ही भारताची शेवटची संधी होती. विशेष म्हणजे फक्त जिंकून चालणार नव्हतं, तर १५-० अशा मोठ्या फरकानं विजय हवा होता.

भारताला समोरच्या टीमचा प्रॉपर बाजार उठवायचा होताच, पण स्वतः एकही गोल खायचा नव्हता. कधीकधी एक गोल मारणं कर्मकठीण असताना, १५ गोल मारायचे होते आणि तेवढ्याच ताकदीनं स्वतःच्या गोलपोस्टला अभेद्य बनवायचं होतं.

भारतासाठी ही मॅच प्रचंड महत्त्वाची होती, पण ती चर्चेत आली ती निकालानंतर…

कारण निकाल चर्चा करण्यासारखाच होता. भारतानं इंडोनेशियाला १६-० अशा मोठ्या फरकानं नेस्तनाबूत केलं.

या एकहाती विजयामुळं भारताचं सुपर फोरमधलं स्थान तर पक्कं झालंच, पण सोबतच कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानलाही बाहेरचा रस्ता पाहावा लागलाय.

यंदाच्या आशिया कपमधला हा विजय आणखी खास असण्याचं कारण म्हणजे, भारतानं काहीशी ताज्या दमाची, नव्या पोरांची टीम स्पर्धेत उतरवली होती. सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये भारताचे कच्चे दुवे उघडे पडू लागले आणि साहजिकच पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

स्पर्धेतलं आव्हान टिकवण्यासाठी आणि आपली ताकद दाखवून देण्याची एक खडतर संधी या पोरांना मिळाली आणि त्यांनी १६ वेळा बॉल गोलपोस्टमध्ये मारत, तिचं खऱ्या अर्थानं सोनं केलं.

पण ही मॅच नेमकी कशी झाली..?

पहिल्या क्वार्टरमध्ये भारतानं ३ गोल मारले. आक्रमक खेळाचं उदाहरण पहिल्या क्वार्टरपासूनच दिसत होतं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुन्हा तीन गोल बसले. गेम तिसऱ्या क्वार्टरमध्ये गेली, तेव्हा भारतानं चार गोल मारले. दुसऱ्या बाजूला इंडोनेशियाची पाटी मात्र कोरीच होती. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या आक्रमणानं कहर केला आणि विक्रमी सहा गोल्सचा पाऊस पाडला.

१६ गोल होऊनही इंडोनेशियाला फक्त एकदाच भारताच्या गोलपोस्टपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता आला.

जर मॅचची आकडेवारी पाहिली, तर भारतानं ८० टक्के पझेशन स्वतःकडे ठेवलं होतं. इंडोनेशियाच्या गोलकिपर्सला भंडावून सोडत, ३६ शॉट्स गोलपोस्टवर मारले. या मॅचमध्ये भारतानं तब्बल २१ पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यातल्या आठ कॉर्नरचा निकाल लागला… गोल!

हा सगळं चित्र इमॅजिन करुन पाहिलं तर एक गोष्ट सहज लक्षात येते, की भारतानं इंडोनेशियाच्या संघाला प्रचंड बॅकफूटवर ढकललं होतं.

या मॅचमधले भारताचे हिरो कोण आहेत..?

 खरंतर ११ जणांच्या पूर्ण प्रयत्नांमुळं भारतानं बाजी मारली. भारताचं खातं उघडलं ते ९ व्या आणि १० व्या मिनिटाला गोल मारणाऱ्या पवन राजभरनं. दिप्सन तिर्कीनं ४ गोल्स मारले (यातले २ गोल्स ५८ व्या मिनिटाला आले), सुदेव बेलीमग्गानं ४४, ४५ आणि ५४ व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक मारली.  एसव्ही सुनील आणि सेल्व्हम कार्थीनं प्रत्येकी दोन गोल्स केले. उत्तम सिंग, नीलम संजीप क्सेस आणि कॅप्टन बिरेंद्र लाक्रानं प्रत्येकी एक गोल केला.

आशिया कप ही पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप साठीची क्वालिफायर स्पर्धा आहे. ही स्पर्धा भारतातच होणार असल्यानं भारताचं स्थान पक्कं आहेच. मात्र आशिया कपमधला विजयही भारताचं मनोबल वाढवण्यात महत्त्वाचा ठरणार आहे.

सिनियर खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक गाजवलंय, तर नवख्या खेळाडूंनी १६-० अशा फरकानं विजय मिळवत आशिया कपमध्ये हवा केलीये. दोन्ही विजयांमुळं एक गोष्ट मात्र पक्की झालीये…

चक दे इंडियाचा फील फक्त पिक्चरमध्येच नाही, खऱ्या आयुष्यातही येऊ शकतोय. फक्त आपण हॉकीच्या मॅचेसकडे लक्ष द्यायला हवं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.