आयुष बदोनीनं याआधीही हवा केलेली, पण अर्जुन तेंडुलकरच्या नादात कुणी लक्ष दिलं नाय

आयपीएलच्या सोनेरी ट्रॉफीवर एक वाक्य लिहिलंय, ‘यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोति.’ सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर इथं टॅलेंटला संधी मिळते. दरवर्षी आयपीएल आपल्याला एक नवा हिरो मिळवून देते. यंदाची आयपीएल सुरू होऊन आठवडा पण झाला नाहीये, पण तरी एका पोराचं नाव आपण सारखंच वाचतोय.

कारण त्याच्या बॅटिंगमध्ये खतरनाक दम आहे. त्याचं नाव… आयुष बदोनी.

जसं आयपीएलमधून नवं टॅलेंट मिळतं, तशीच आणखी एक गोष्टही गेल्या काही वर्षात सातत्यानं घडतीये. मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात घेतेच. अर्जुननं अजूनतरी आयपीएल पदार्पण केलं नसलं, तरी मुंबई इंडियन्समुळं तो लाईमलाईट मध्ये येतोच.

आता तुम्ही म्हणाल अर्जुन आणि आयुष बदोनीचं काय कनेक्शन?

तर भिडू विषय आहे संधीचा आणि ग्लॅमरचा. सुरूवातीला संधी दोघांना मिळाली, पण ग्लॅमर एकट्या अर्जुनच्या वाट्याला आलं. आता परिस्थिती अशी आहे, की ग्लॅमर बदोनीकडे आहे… तेही फक्त दोनवेळा मिळालेल्या संधीचं सोनं केल्यामुळं.

आधी हार्दिकच्या गुजरात टायटन्सला आणि मग धोनीच्या (आता जडेजाच्या) चेन्नई सुपर किंग्सला मजबूत धुणारा हा बदोनी आहे तरी कोण, हे आधी माहिती करून घेऊ.

वय वर्ष फक्त २२ असलेला बदोनी, मूळचा दिल्लीचा. त्याच्यामागं ना कुठल्या मोठ्या नावाचा सपोर्ट होता, ना त्याचं आडनाव सगळ्या जगाला माहिती होतं. दिल्लीच्या सॉनेट क्लबमध्ये तो क्रिकेटचे धडे घेत होता आणि घराच्या टेरेसवर त्याचे वडील दगडांमधून गॅप काढायला लावत, त्याची बॅटिंग घोटवून घेत होते.

प्रचंड टॅलेंट असूनही बदोनीला मोठ्या स्टेजवर येण्यासाठी वाट पाहावी लागली. २०१८ मध्ये आशिया कपसाठी भारताच्या अंडर-१९ टीममध्ये जेव्हा बदोनीला संधी मिळाली, तेव्हा त्यालाही असं वाटलं असणार… की हाच तो क्षण आपलं भविष्य घडवणारा. पण आशिया कपनंतर झालेल्या वर्ल्डकपमध्ये मात्र बदोनी संघाबाहेरच राहिला.

आपल्या आयुष्यात वाईटातून पण चांगलं घडत असतंय…

अंडर-१९ टीमचा कोच होता द्रविड. कितीही म्हणलं, तरी पोरं पारखण्याच्या बाबतीत द्रविड अगदी बादशहा आहे. त्यानं दिल्ली क्रिकेट असोसिएशनला बदोनी पुढं जाऊन सुपरस्टार होऊ शकतोय, हे आधीच सांगितलं होतं. पण दिल्ली क्रिकेट बोर्डानं काय हालचाल केली नाही. त्याला अनेकदा संभाव्य खेळाडूंमध्येच समाधान मानावं लागलं.

त्यानंतर भारताचे माजी क्रिकेटर अतुल वासन यांनी बदोनीला मुंबई इंडियन्सच्या ट्रायल्ससाठी पाठवलं. पण तिथंही सिलेक्शनच्या यादीत त्याचं नाव आलं नाही. पुढं अर्जुन तेंडुलकरची मात्र मुंबई इंडियन्सच्या संघात निवड झाली.

आता आपल्या भारतात क्रिकेटचं येड कितीही असलं, तरी अंडर-१९ टेस्टची फार चर्चा काय होत नाही. पण एका टेस्टवेळी मीडियापासून लोकांपर्यंत सगळ्यांचं लक्ष त्या मॅचकडे होतं… कारण लय सिम्पल होतं.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर भारताकडून खेळत होता.

चांगला प्लेअर असला, तरी ती मॅच मात्र अर्जुनची नव्हती. कारण त्या मॅचमध्ये त्याच्या खात्यात फक्त दोन विकेट्स जमा झाल्या आणि बॅटिंगमध्ये तो शून्यावर आऊट झाला. लोकांमध्ये आणि मीडियामध्ये एकच चर्चा होती, 

की सचिनचं पोरगं शून्यावर आऊट झालं.

पण त्याच मॅचमध्ये आणखी एक प्लेअर होता, जो कुठंच बातमीमध्ये आला नाही. त्यानं बॅटिंग करताना, ७ नंबरला येत नॉटआऊट १८५ रन्स चोपले. बॉलिंगचं बोलाल तर, दोन्ही इनिंग्समध्ये मिळून त्याच्या नावावर ६ विकेट्स जमा होत्या. त्यानं मॅच सिंगल हॅंड गाजवली.

त्या पोराचं नाव होतं, आयुष बदोनी.

सलग तीन आयपीएल ऑक्शनमध्ये बदोनीचं नाव अनसोल्ड प्लेअर्सच्या लिस्टमध्ये येत होतं. २० लाखाच्या बेस प्राईजवरही त्याला कुणी घेईना. दिल्लीकडून मुश्ताक अली स्पर्धेत खेळला असला, तरी तिथंही त्याला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती.

पण त्याच्या नावाची चर्चा क्रिकेट वर्तुळात होती… ती त्याची मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात शॉट खेळण्याची ताकद आणि कितीही प्रेशरमध्ये थंड डोकं ठेवण्याचं स्किल या दोन गोष्टींमुळं. दिल्लीतलं हे टॅलेंट दिल्लीकर गौतम गंभीरनं ओळखलं आणि यंदाच्या ऑक्शनमध्ये गंभीर मेंटॉर असलेल्या लखनौ सुपर जायंट्समध्ये बदोनीला संधी मिळाली.

प्रॅक्टिस मॅचमध्ये केलेल्या कडकडीत फिफ्टीजनंतर त्याची पहिल्या सामन्यापासूनच अंतिम संघात निवड झाली. गुजरात टायटन्स विरुद्ध संघाची अवस्था ४ आऊट २९ असताना, तो बॅटिंगला आला आणि खणखणीत फिफ्टी मारली. 

दुसऱ्या मॅचमध्ये अवघड रनचेसचं टार्गेट, अनुभवी बॉलर्स आणि धोनी-जडेजाचे माईंडगेम्स असं प्रेशर असतानाही, तो शांतपणे खेळला. त्यानं शिवम दुबेला परत परत बघावा वाटणारा छकडा हाणला आणि मुकेश चौधरीलाही सिक्स मारत थाटात मॅच संपवली.

हे २२ वर्षांचं पोरगं आता भारी-भारी प्लेअर्सच्या कौतुकाचा विषय आहे, जगातल्या बाप बॉलर्सला किरकोळीत हाणतंय आणि सगळ्यात कडक गोष्ट म्हणजे… त्याचं नाव आता प्रत्येक घरात, प्रत्येक पेपरात पोहोचलंय. 

तेही धोनी, जडेजा, केएल राहुल, एविन लुईस असा तगडा गराडा आजूबाजूला असताना.  

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.