म्हणून हे भारतीय नागरिक फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना मतदान करतात…

आज राष्ट्रीय मतदार दिवस. भारताचा “मतदार दिवस” आहे म्हणल्यानंतर आत्ता सगळे भारतीय नागरिक भारतासाठीच मतदान करणार हे फिक्सय. म्हणजे कस लोकसभा, विधानसभा इथपासून ते ग्रामपंचायतपर्यन्त सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे भारताच्या. मतदान करणारे नागरिक पण भारताचे. म्हणजे तुम्ही जर शाळेत नागरिकशास्त्र व्यवस्थित शिकला असता तर आम्हाला इतकी लांबड लावावी लागली नसती.

असो, तर इथे मॅटर वेगळा आहे. इथे निवडक भारतीय नागरिक “फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष” निवडून देत असतात. नेमका काय आहे हा मॅटर ते आम्ही मतदार दिवसाच्या शुभमुहूर्तावर सांगत आहोत.

फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणारे भारतीय हे पोंडीचेरी या केंद्रशासीत प्रदेशात मोठ्या प्रमाणात आहेत. तिथे त्यांची संख्या जवळपास ५००० च्या आसपास आहे. हे शक्य होऊ शकतं कारण १९५४ सालापर्यंत पोंडीचेरी ही फ्रेंचांची वसाहत होती. त्यामुळे तिथे आजही अनेक फ्रेंच नागरिक राहतात. या नागरिकांना फ्रेंच आणि भारतीय अशी दुहेरी नागरिकता आहे. फ्रांस सरकारने जिथे कुठे फ्रेंचांच्या वसाहती होत्या त्या देशातील सरकारशी बोलून तश्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. रंजक गोष्ट अशी की या निवडणुकीत मतदान करणाऱ्या अनेकांनी अजून देखील फ्रांस बघितलेला नाही.

पोंडीचेरी व्यतिरिक्त तमिळनाडूतील करैकल, केरळमधील माहे आणि आंध्र प्रदेशातील यानम या ठिकाणी देखील फ्रेंचांच्या वसाहती होत्या. त्यामुळे तिथे देखील काही फ्रेंच नागरिक आहेत. त्यांना देखील फ्रांसच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. निवडणुकीच्या वेळी फ्रांसच्या दुतावासात त्यांना मतदानासाठी मतदान केंद्र सुरु करण्यात येतं आणि तिथे जाऊन हे नागरिक मतदान करू शकतात.

२०१७ साली जेव्हा जेव्हा इम्यॅन्यूअल मॅक्रोन फ्रांसचे राष्टाध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यावेळी आंध्र प्रदेशमधील यानम येथून त्यांना ५१ मते मिळाल्याची माहिती समोर आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.