चीनच्या युद्धात वेळेत तेल पुरवठा न झाल्याने नेहरूंनी इंडियन ऑईलचा पाया रचला
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आपली इंडियन ऑईल. भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीय तेल कंपनी. भारतातील एकूण पेट्रोलियम उत्पादन आणि विक्रीत तब्ब्ल ४७ टक्के तर तेल शोधनात ४० टक्के वाटा असलेली सर्वात जुनी कंपनी.
२०१६-१७ या एका आर्थिक वर्षातील इंडियन ऑईलची एकूण उलाढाल ५ लाख ६ हजार ४२८ कोटी रुपये होती. तर त्यातून कंपनीला मिळालेला निव्वळ नफा २१ हजार ३४६ कोटी रुपये इतका होता. याला भारत सरकारचा महारत्नचा दर्जा देखील प्राप्त आहे.
या एवढ्या मोठ्या कंपनीच्या जन्माचं कारण मात्र ठरलं होतं ते भारताला चीनच्या युद्धात विदेशातून तेलाचं नीट न झालेला पुरवठा.
साधारण १९५८ ची गोष्ट. भारतामध्ये तेलाचं शोधन आणि रिफायनिंग यावर जोर देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून इंडियन रिफाइनरीज़ लिमिटेड या १०० टक्के सरकारी मालकीच्या कंपनीची स्थापना झाली.
त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे ३० जून १९५९ राजी पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीवर जोर देण्यासाठी सरकारने ‘इंडियन ऑईल कंपनी लिमिटेड’ची स्थापना केली, आणि त्यांच्यावर देशाच्या कानाकोपऱ्यात पेट्रोलियम उत्पादनांना पोहचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
भारतामधील तेलाचं संपूर्ण मार्केट त्यावेळी बर्मा शेल, एस्सो ईस्टर्न इंक, कॅल्टेक्स (इंडिया) लिमिटेड, इंडो-बर्मा पेट्रोलियम कंपनी लि. आणि आसाम ऑईल कंपनी लिमिटेड यांसारख्या सगळ्या मोठ्या कंपन्यांच्या हाती होतं.
इंडियन ऑईलच काम सुरु झालं ते रशियावरून तब्बल ११ हजार ३९० टन तेल आयात करूनच. मुंबईमधल्या बंदरावर हे तेलं उतरून घेण्यात आलं.
इंडियन ऑईल कंपनीसमोरच सगळ्यात पाहिलं आणि प्राथमिक आव्हान होतं ते भारतात सुस्थितीत असलेल्या या कंपन्यांशी स्पर्धा करणं त्यात स्पर्धेत टिकून राहणं. आपल्या पहिल्या वर्षात कंपनीने केलेली एकूण विक्री केवळ ०.०३८ मिलियन टन होती. ज्याची उलाढाल होती केवळ ०.८ कोटी रुपये.
दुसऱ्या बाजूला इंडियन रिफाइनरीज लिमिटेडने आपल्या कार्याला प्रारंभ केला तो १९६२ मध्ये. रोमानिया देशाच्या मदतीने आसाममधील गुवाहाटीजवळच्या नूनमतीमध्ये रिफायनरीची स्थापना केली. नेहरूंच्या हस्ते याच उदघाटन देखील झालं.
त्याच वर्षी भारत बेसावध असताना भारत चीन युद्धाला देखील सुरुवात झाली. त्यावेळी जरी इंडियन ऑईल कंपनीची स्थापना झाली असली तरी जेवढं तिन्ही सेनादलांसाठी तेल लागत असे तेवढा पुरवठा करण्याइतकी मोठी कंपनी नव्हती. परिणामी भारत सेनादलांसाठी लागणार तेल परदेशातूनच आयात करत असे.
पण नेमकं त्या युद्धाच्या प्रसंगी विदेशातून येणार तेल भारतापर्यंत नीट पोहचू शकलं नाही. आपल्या सैन्याच्या रणगाडे, वाहतुकीच्या गाड्या यासाठी लागणाऱ्या तेलाचा मुबलक पुरवठा झाला नाही. ही गोष्ट नेहरूंना समजत होती, पण त्याक्षणी ते काहीच करू शकत नव्हते.
पण ते स्वस्थ बसले नाहीत. जसं देशात तेल आवश्यक होतं त्याच प्रमाणे सैन्यासाठी देखील तेल अत्यावश्यक होतं.
इकडे उत्पादन वाढीसाठी १९६४ मध्ये इंडियन रिफाइनरीजने ४३५ किलोमीटर लांबीची गुवाहाटी-सिलीगुडी पाइपलाईन आणि सिलिगुडी टर्मिनलची स्थापना केली. त्यानंतर लगेचच बरौनी आणि कोयालीमध्ये रशियाच्या सहयोगाने दोन आणखी रिफायनरींची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, त्याच कारण होतं आसाम आणि गुजरातमध्ये शोधलेल्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याचं काम जलदगतीनं होऊ शकले.
नेहरूंच्या डोक्यात अजूनही चीन युद्धामधील तेल पुरवठा नीट न झाल्याची सल कायम होती. तसेच भविष्यात असे प्रसंग उभा राहिला तर? अखेर यावर उपाय म्हणून एप्रिल-मे १९६४ मध्ये नेहरूंनी इंडियन ऑईल कंपनी आणि इंडियन रिफाइनरीज लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच एकत्रीकरण करून त्यांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेतला.
आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचा जन्म झाला.
१ सप्टेंबर १९६४ पासून तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू करण्याचं ठरलं. यामागे शास्त्र असं होतं की, जर तेलाचं शोधन, रिफायनींग आणि विक्री या तिन्ही गोष्टी एकाच कंपनीकडे असेल तर त्यामध्ये सुसूत्रता येऊन उत्पादन वाढचं काम जलद गतीनं होऊ शकेल.
या ऐतिहासिक विलीनीकरणाची घोषणा करताना तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम आणि रसायन मंत्री हुमायूँ कबीर म्हणाले होते,
इंडियन ऑईल लवकरच देशातील एकूण बाजारपेठेच्या अर्ध्यापेक्षा जास्त व्यापार करण्यापर्यंत पोहोचेल.
५ वर्षातच त्यांचं म्हणणं खरं ठरलं. १९६९ पर्यंत इंडियन ऑईलची एकूण पेट्रोलियम विक्री देशाच्या व्यापाराच्या तुलनेत ५० टक्यांपर्यंत गेली होती. तर १९७४ पर्यंत ६४.२ टाक्यांवर पोहोचली होती.
आणि तेव्हापासून सैन्याला नियमित तेल पुरवठा देखील चालू झाला :
आपल्या स्थापनेच्या वर्षीपासूनच इंडियन ऑईलने सैन्याच्या विमानांना इंधनाचा पुरवठा चालू केला. त्यानंतर नेहरूंच्या मनात भविष्यात असा प्रसंग उभा राहिला तर काय? अशी असलेली भीती १९६५ मध्येच खरी ठरली. पण त्यावर्षी इंडियन ऑईलने कोणत्याही अडथळ्याविना सैन्याला तेलाचा पुरवठा केला.
त्यानंतर १९७१ च्या युद्धाप्रसंगी उभ्या राहिलेल्या आपत्कालीन परिस्थितीत देखील इंडियन ऑईलनं सैन्याला तेल पुरवठा केला. त्यासोबतच मार्च १९७२ मध्ये बांगलादेश मधील चिटागांग इथल्या रिफायनरीसाठी कच्च्या तेलाचा पुरवठा देखील करायला सुरुवात केली.
युद्धानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने पहिल्यांदाच युद्धातील विधवा, जखमी सैनिकांसाठी, स्वातंत्र्य सैनिकांसाठी विक्री केंद्रातील डिलरशिपसाठी आरक्षण देऊ केलं. ही सवलत आज देखील सुरु आहे.
१९९९ च्या कारगिल मधील ‘ऑपरेशन विजय’ सुरु असताना लेह आणि कारगिलमधील इंडियन ऑईलचा डेपोंवर गोळीबार होऊन देखील त्यांनी सैन्यासाठी युद्ध क्षेत्रात तेलाची कमतरता भासू दिली नाही. सोबतच युद्धात शाहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी मदतीचा हात दिला होता.
या दरम्यानच्या काळात इंडियन ऑईलने १९७५ मध्ये हल्दिया रिफायनरी, १९८२ मध्ये मथुरा रिफायनरी, १९८८ मध्ये पानिपत रिफायनरी अशा देशभरात विविध रिफायनरीची सुरुवात केली. नव्या पाईपलाईन टाकल्या. टर्मिनल आणि विमान इंधनासाठी स्टेशन्सची निर्मिती केली. बिटुमन, समुद्रातील बंकर यासारख्या नव्या व्यवसायात प्रवेश केला. देशात डीलर्स आणि डिस्ट्रीब्यूटर्सना नियुक्त केलं.
कदाचित या सगळ्यामुळेच सरकारला वर्षाला २१ हजार ३४६ कोटी रुपयांचं नफा मिळवून देणारी कंपनी बनू शकली आहे.
हे हि वाच भिडू.
- संसदेच्या आवारात एका महिलेने थेट नेहरूंची कॉलर पकडून जाब विचारला होता, अन् आत्ता
- आर्मीला रॉयल एन्फिल्ड बुलेट हवी होती, नेहरूंनी अट घातली मेड इन इंडियाचं पाहिजे.
- नेहरूंनी काय केलं विचारणारे शहा जिथे ॲडमीट होतात ते एम्स हॉस्पीटल नेहरूंमुळे उभारलं गेल