भारताच्या राजकुमारीने आंदोलन केले म्हणून इंग्लंडच्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला

भारतात संविधानाने महिलांना व इतर सर्वांना मतदानाचा समान अधिकार दिला आहे. तुमचे सामाजिक स्थान, लिंगभेद व जातिभेद यांना त्यात थारा नसतो. प्रत्येक व्यक्तीला एक मत असा समान अधिकार आपल्याला आपोआप मिळाला आहे.

मात्र विकसित देशांमध्ये हा अधिकार मिळण्यासाठी महिलांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला होता. इंग्लंडमध्ये यासाठी मोठी चळवळ चालवली गेली होती. या चळवळींमध्ये अनेक महिलांनी आपल्या जीवाची बाजी लावली. महिलांना मतदानाचा समान अधिकार मिळावा यासाठी अनेक संघटना काढून स्त्रिया लढत होत्या. २१ नोव्हेंबर १९११ मध्ये संसदेच्या निवडणुकीत  उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा या कारणासाठी स्त्रियांनी लंडनमध्ये मोठा मोर्चा काढला होता. या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला चढवला होता. म्हणून हा दिवस तेथे लोकशाही अधिकार दिनासाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो.

पण यामागे मोठी प्रेरणा देणारी आणि धडाडीने सहभाग घेणारी वरच्या फळीतील एक महिला नेता चक्क भारतीय होती.

इंग्लंडमधल्या स्त्रियांसाठी तिने आपल्या प्राणाची बाजी लावली. महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी तिने मोठी चळवळ केली. तिचे नाव होते राजकुमारी सोफिया अलेक्झांड्रा दुलीप सिंग.

युनायटेड किंग्डम मध्ये तिला आजही महिला अधिकाऱ्यांसाठी लढणारी बिनीची कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.

सोफीया यांचा जन्म 8 ऑगस्ट 1876 मध्ये बेलग्रावीया शहरात झाला. महाराजा दुलिप सिंग हे शीख साम्राज्याचे शेवटचे राजे होते. त्यांच्या तिसऱ्या मुलीच्या रूपाने सोफिया हिला राजेशाही थाटात वाढवण्यात आले. त्यांचे लहानपण सफोल्क या शहरामध्ये गेले.त्यांची आई ‘बांबा’ ही जर्मनीचा प्रसिद्ध व्यापारी लुडविग म्युलर यांची मुलगी होती. टॉड म्युलर अँड कंपनी या युरोपमधील प्रतिष्ठित संस्थेमध्ये या माणसाचे मोठे वजन होते.

त्यामुळे सोफीया यांच्यावर युरोपीय आणि भारतीय दोन्ही पद्धतीचे संस्कार झाले. महाराजा आणि बांबा म्युलर यांना एकूण मिळून दहा मुले झाली. त्यापैकी सहा मुले जगू शकली होती. सोफिया ही त्यांच्यापैकीच एक.

वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना टायफाईडची लागण झाली होती. त्यांच्या आजारपणाचा काळातच त्यांच्या आईलाही हा रोग झाला. या रोगामध्येेच त्यांचे निधन झाले.

तेव्हापासून सोफिया यांची सर्व जडण-घडण ही आई नसताना झाली होती. त्यामुळे त्यांना इंग्लंडच्या समाजांमधील अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. सोफिया दहा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांनी भारतात परत जाण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटिश सरकारने या गोष्टीला परवानगी दिली नाही.

1886 झाली त्यांच्या वडिलांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत भारतात जाण्याचा प्लॅन केला. पण तो यशस्वी झाला नाही. येमेनमध्ये जवळ पोहोचताच त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले. त्यामुळे दुलीप सिंह यांना परत माघारी फिरावे लागले होते. या गोष्टीचा सोफिया यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.

आता आपले आयुष्य इंग्लंडमध्येच जाणार आहे याची त्यांना खात्री झाली होती.

सोफियाचा इंग्लंडची क्वीन विक्टोरिया यांना विशेष लळा होता. समाजामध्ये विविध गोष्टी जाणून घेण्याची आणि लोकांची संबंध ठेवत राजकारणाची जोडले राहण्याची शिकवण त्यांनी सोफिया हिला दिली.

त्यामुळे लहानपणापासूनच सोफिया हिने फोटोग्राफी शिकणे, सायकल चालवणे, मोठ्या मेजवान्यांना हजेरी लावणे आणि वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांना पाळणे असे त्याकाळात स्त्रियांसाठी अगदीच नवखे असणारे छंद जोपासले होते.

आपल्या कुटुंबाकडून इंग्लंडच्या राजघराण्याने आपले राज्य चोरून घेतले. आपला वारसा हरवला आणि एखाद्या पाहुण्यासारखी वागणूक आपल्याला आपल्याच देशामध्ये दिली जाते याचे कारणही इंग्रज आहेत हे त्यांना समजले.

गोपाळकृष्ण गोखले यांनी चालवलेल्या लढ्याचे त्यांनी कौतुक केले होते. जेव्हा लाला लजपतराय यांना अटक झाली तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला. तेव्हा या घटनेने सोफिया नाराज झाल्या. त्यांचे मत ब्रिटिश सरकारच्या विरोधात बनले.

1909 साली महात्मा गांधी इंग्लंडला गेले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी वेस्टमिनस्टर पॅलेस हॉटेलात पार्टी ठेवण्यात आली होती. त्या सभेचे संपूर्ण नियोजन सोफिया सिंग यांनीच केले होते.

भारताचा सम्राट पाचवा जॉर्ज याच्या राज्यकारभारात यामुळे अनेक अडचणी येऊ लागल्या. एका वेळी त्याने संतापून “आपला तिच्यावर काहीच वचक नाही का?” असा सवाल ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांना केला होता.

ब्रिटनमध्ये भारताप्रमाणेच दोन सभागृहे आहेत. यापैकी हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे लोकसभा हे महत्त्वाचे मानले जाते. सोफीया यांनी काही महिलंसमवेत 18 नोव्हेंबर 1910 साली ब्रिटनच्या लोकसभेला वेढा दिला होता. यावेळी पंतप्रधानांची भेट व्हावी म्हणून त्या अडून बसल्या होत्या.

होम सेक्रेटरी म्हणजे इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने आपल्या सचिवाला बोलावून या महिलांना तेथून हटण्यास सांगितले. मात्र पंतप्रधानांशी बोलून, आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्याशी भेट झाल्याशिवाय तेथून हलणार नाही असा निर्णय सोफिया आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सर्वच महिलांनी घेतला.

त्या हटत नसल्याचे बघून थेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. सहकार्य न केल्यास या महिलांवर थेट लाठीहल्ला करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. तरीही या महिला डगमगल्या नाहीत. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला. अनेक महिला यात जबर जखमी झाल्या. हा दिवस इंग्लंडच्या इतिहासात महिलांच्या प्रतिष्ठेचा काळिमा फासणारा दिवस म्हणून नोंदवला गेला.

त्यामुळेच आजही 18 नोव्हेंबर हा दिवस तिकडच्या इतिहासात ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखला जातो.

त्यांना 22 मे 1911 रोजी आपल्या कार्यकर्त्यांच्या कामासाठी ब्रिटिश सरकारच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांचा अपराध होता सोबत जंगली कुत्री बाळगणे आणि हत्यारे ठेवणे. एका महिलेने अशा गोष्टी आपल्या सोबत बाळगणे सरकारला धोक्याचे वाटत होते. सरकारची अशी भूमिका होती की लायसन्स असल्याशिवाय कुणीही बंदुका वापरू नयेत. लायसन मिळण्यासाठी कर भरावा लागे.

सोफीया यांची भूमिका अशी होती की

“महिलांनी कर भरावा अशी सरकारची इच्छा असेल तर कर भरण्यासाठी आधी मतदानाचा अधिकार द्यावा लागेल.”

अमेरिकेतील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेली ना प्रतिनिधी ना कर ही घोषणा त्यांनी थेट अमलात आणली. त्यांनी दंड भरण्यास थेट नकार दिला. सरकारनेही चवताळून दंड गोळा करण्यासाठी सोफिया यांच्या निवासस्थानी पोलिसांना पाठवले. त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्यास नकार दिला.

तेव्हा पोलिसांनी त्यांची सोन्याची अंगठी हिरावून घेतली. या अंगठीचा लिलाव करून आम्ही आपला दंडगोळा करू असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या अंगठीचा जाहीर लिलाव केला.

पण गमतीची गोष्ट म्हणजे की अंगठी त्यांच्यात एका मित्राने विकत घेतली आणि विकत घेऊन ती पुन्हा सोफीया यांना परत केली.

1913 साली त्यांना पुन्हा कुत्री बाळगल्या वरून दंड करण्यात आला. याच काळात इंग्लंडचे पंतप्रधान होते एच एच ऍसक्विथ. ते आपल्या गाडीतून जात असताना सोफिया यांनी थेट त्यांच्या गाडीसमोर झेप घेतली. यावेळी त्यांच्या हातात ‘गिव्ह वूमन द वोट’ असे पोस्टर होते.

सुदैवाने ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवले म्हणून त्यांचा जीव वाचला होता. अशाप्रकारे महिलांच्या हक्कांसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारी ही राजकुमारी होती.

त्यांनी ब्रिटनमध्ये जास्तीत जास्त बॉम्ब बनवण्याच्या कामाला आपला पाठिंबा दर्शवला. ब्रिटनमध्ये अराजकता आली पाहिजे या मताच्या त्या होत्या.

पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतातून आलेल्या लष्कराला आणि सैनिकांना सोफिया यांनी मदत केली होती. त्यांच्यासोबत जवळपास दहा हजार महिलांनी या कामात सहभाग घेतला होता. महिलांच्या तुकडीलाही आघाडीवर पाठवण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती.

ब्रिटिश रेड क्रॉस या सैनिकांना मदत करणाऱ्या व उपचार करणाऱ्या संस्थेसाठी त्यांनी काम केले. जवळपास दोन वर्षे त्यांनी हे काम केले होते. अनेक सैनिकांना यावेळी त्या स्वतः मलमपट्टी करत. भारतीय सेनेमध्ये पंजाबमधून आलेल्या शीख सैनिकांचा मोठ्या प्रमाणात भरणा होता.

“शिख साम्राज्याचा पाया घालणारे महाराजा रणजीत सिंग यांची नात आपल्या शेजारी बसून आपल्याला मलमपट्टी करते आहे” यावर अनेक सैनिकांचा विश्वास बसत नव्हता.

पहिले महायुद्ध संपल्यानंतर इंग्रज सरकारने त्यांच्या मागण्यांचा सविस्तर विचार सुरू केला. शेवटी 1918 साली ब्रिटनच्या संसदेने एक कायदा संमत केला. रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल असे या कायद्याचे नाव होते. या कायद्यामार्फत स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. मात्र वयाची तीस वर्षे पूर्ण केल्यानंतरच स्त्रियांना मतदान करता येणार होते.

सोफीया यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले होते. मात्र तरीही त्यांनी आपला लढा थांबवला नाही.

सोफिया सिंग यांना अटक करण्याची ब्रिटिश प्रशासनाची कधीच हिम्मत झाली नाही. त्यांना अटक केल्यास अथवा त्यांना शिक्षा करून ठार केल्यास या एक शहीद म्हणून अजून मोठ्या बनतील अशी भीती प्रशासनाला होती.

22 ऑगस्ट 1948 साली झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या काही काळ आधी त्यांनी आपले अंतिम संस्कार हे अस्सल भारतीय शीख पद्धतीने व्हावेत आणि आपली राख भारतामध्ये पसरून देण्यात यावी अशी इच्छा नोंदवली होती. 2018साली ब्रिटन सरकारने आपल्या पोस्टाच्या कामासाठी त्यांच्या नावाने काही तिकिटे सुरू केली.

ब्रिटनमध्ये भारतातील स्त्रीने जाऊन तिथल्या स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणे हे कौतुकास्पद होते.

लंडनच्या संसदेसमोर असणाऱ्या एका स्मारकावर त्यांचे नाव कोरले आहे. यावर त्यांचे चित्रही लावण्यात आले आहे. अनेक पुस्तकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये त्यांचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.