गेली सव्वाशे वर्ष या जंगलात ‘तंट्या भिल्लला’ सलामी देण्यासाठी रेल्वे थांबवली जाते?

नर्मदा आणि तापी नद्याच्या बेचक्यात असलेला सातपुडा पर्वत. एकीकडे महाराष्ट्रातील खानदेश तर दुसरीकडे मध्यप्रदेशातील निमाड प्रांत.

दोनशे वर्षांपूर्वी इथे मराठेशाहीचा अंमल होता. उत्तरेला होळकर, पूर्वेला नागपूरकर भोसले. डोंगर आणि जंगलात आदिवासींची वस्ती होती.

यात भिल्ल होते, पावरा,वारली, डांगी, मवाली, रावळ, गारसिया या जमाती होत्या. भिल्ल जमातीच्या या पोटजमाती. हे भिल्ल डोंगराळ भागात राहत. जंगलातल्या कंदमूळ, फळे,शिकारी यावर त्यांची उपजीविका चाले. राहायला साधीशी झोपडी. मोठ्या गरजा काही नव्हत्या. विपुल वनसंपत्तीवर त्यांचं भागत होत.

दुर्दैवाने मराठेशाहीचा अस्त झाला. छोट्या मोठ्या जहागिरी संपल्या. ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली. त्यांनी बेसुमार जंगल तोड सुरू केली. आदिवासींवर बंधने आणली. त्यांच्या डिंक गोळा करणे अशा उद्योगावर बंदी आणली.

भिल्लांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला.

दुसरीकडे जे श्रीमंत जमीनदार होते त्यांनी या जंगलातल्या बऱ्याच जमिनी बळकावल्या होत्या. ही मंडळी सावकारी करत. आदिवासी भिल्ल त्यांच्या शेतावर मजूर म्हणून राबत. त्यांनी काढलेल्या छोट्या मोठ्या कर्जाचे व्याज सावकार एवढे लावत की ते फेडता फेडता सगळं घर दार विकायची पाळी येई.

असच सातपुड्याच्या रांगेत पाल या गावी एक भिल्ल पाटलाच्या सावकारी मुळे जेरीस आला होता. तात्या त्याच नाव.

तात्या साधाभोळा होता. आपली वडिलोपार्जित जमीन परत मिळावी एवढीच त्याची माफक अपेक्षा होती. मात्र आजोबाच्या कर्जात त्याला प्रचंड गुंतवण्यात आलं. त्याच्यावर खोटे आळ घेऊन जेलमध्ये टाकण्यात आलं.

तिथून परत आल्यावर तात्याने शेतमजुरी सुरू केली मात्र त्याला परत गावकऱ्यांनी पाटलाच्या पोरीच्या प्रेम संबंधाचा ठपका ठेवून हुसकावून लावलं. परत जेल, सक्त मजुरी या चक्रात तात्या अडकला.

माणूस म्हणून जगण्याची धडपड करणाऱ्या तात्याला जमीन हडप करणारे सावकार, मालगुजर, त्याना साथ देणारे पोलीस, ब्रिटिश प्रशासन या सगळ्यांनी जगणे असह्य करून ठेवले होते.

अन्यायाने पिचून गेलेला साधा भोळा तात्या बदलत गेला. त्याने शस्त्र हाती घेतले. त्याला काही साथीदार सुद्धा येऊन मिळाले. तात्याची नवी ओळख तंट्या डाकू बनली. सावकारांना लुटू लागला. व्यवस्थेशी लढू लागला. पोलिसांच्या चौक्यावर हल्ला करू लागला.

पोलीस हात धुवून त्याच्या मागे लागले.

ब्रिटिशांच्या लेखी तंट्या भिल्ल एक लुटारू दरोडेखोर होता. मात्र आदिवासींच्या दृष्टीने त्यांची सुटका करण्यासाठी आलेला तो एक देवदूत होता. दुष्काळात सावकारांची आणि सरकारची गोदामे फोडणे आणि ती गरिबांच्यात वाटणे हे त्याचं मुख्य उद्देश असायचं.

त्याने ब्रिटिशांच्या तोंडचं पाणी पळवल. जेव्हा बाकीचे राजेरजवाडे ब्रिटिशांची हुजुरी करण्यात धन्यता मानत होते तेव्हा तंट्या भिल्ल जमातीमध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवून ब्रिटिश सत्तेशी एकाकी टक्कर घेत होता.

सातपुड्याच्या जंगलाचा सार्वभौम राजा, गरिबांचा वाली, त्यांचा रक्षणकर्ता अशी त्याची ख्याती पंचक्रोशीत पसरली.

त्याच्या जिवंतपणीच त्याच्या आख्यायिका खानदेश नर्मदा खोऱ्यात पसरल्या. गोरे अधिकारी देखील त्याला भारतीय रॉबिनहूड म्हणून ओळखत होते. तंट्या भिल्लाच्या पराक्रमावर लोकगीते रचली जात होती.

तंट्याला पकडून देणाऱ्याला 10,500 रुपये आणि पंचविसशे एकर जमीन देण्याची घोषणा ब्रिटिशांनी केली होती. होळकरांनी देखील  वेगळं बक्षीस जाहीर केलं होतं. 

तंट्याला पकडायला तंट्या पोलीस नावाची वेगळी फौज निर्माण करण्यात आली होती. गावागावात मोर्चे उभारण्यात आले. सावकारांना संरक्षणाच्या नावाखाली मोफत शस्त्रे वाटण्यात आली, पण तरीही शूरवीर तंट्या भिल्ल 11 वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन डोंगरदऱ्यात तळपत राहिला.

आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक, तंट्या भिल्ल अखेर स्वकीयांच्या घातामुळे पकडला गेला. 

त्याला अटक इंदूर संस्थान मध्ये करण्यात आली मात्र त्याच्यावर खटला मात्र ब्रिटिश राज्यात चालवायचा अस ठरल. जबलपूरच्या कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन निघाले तेव्हा त्याला पाहण्यासाठी लाखोंची गर्दी गोळा झाली. वाटेत सुद्धा प्रत्येक स्टेशनवर प्रचंड जनसमुदाय गोळा व्हायचा.

तंट्याची लोकप्रियता ब्रिटिश सत्तेला धडकी भरवणारी होती. गडबडीत त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

3 डिसेंबर 1889 च्या रात्री हातात तुरकामठा घेतलेल्या उघड्या बोडक्या भिल्लांचा जनसागर लोटला. त्यांनी जबलपूरच्या सेंट्रल जेल ला वेढा घातला. तंट्या मामा म्हणून गजर सुरू होता.

मात्र ब्रिटिश मागे हटले नाहीत. त्यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे तंट्या भिल्लाला फासावर चढवलं.

एक धगधगत वादळ शांत झाल. जमलेल्या लोकांनी आक्रोश सुरू केला. स्वातंत्र्याच एक समर संपुष्टात आलं होतं. मात्र त्यांनी आदिवासी समाजात पेटवलेली ठिणगी शांत झाली नाही. या ना त्या स्वरूपात देशभरात त्यांनी तंट्या भिल्लाचा लढा सुरूच ठेवला.

ब्रिटिशांनी तंट्या भिल्ल यांचा मृतदेह मध्यप्रदेशमधील पातालपाणी जवळच्या कालाकुंड येथे जंगलात फेकून दिले. या क्रांतिसूर्याच मंदिर तिथे स्थापन करण्यात आलेला आहे. तिथून जवळच रेल्वे ट्रॅक जातो.

Martyr Tantya Bheel Temple

आजही तिथून जाणारी प्रत्येक रेल्वे दोन मिनिटासाठी कालाकुंडच्या जंगलात थांबते.  इंजिनचा ड्रायव्हर तंट्या मामाचा आशीर्वाद घेतो आणि मगच ट्रेन पुढे जाते.

याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना विचारलं तर ते सांगतात की हा रेल्वे ट्रॅक धोकादायक असल्यामुळे रेल्वे इंजिनाचे ब्रेक चेक करण्यासाठी रेल्वे थांबते. पण गावकऱ्यांच म्हणणं आहे की इथे जर थांबलं नाही तर रेल्वे ला हमखास अपघात होतो. तसे अनुभव देखील आहेत.

कारण काही का असेना, गेली अनेक वर्ष आजही ही प्रथा पाळण्यात येते, तंट्या भिल्लाचे कार्य त्यांच्या कथा-दंतकथा, त्यांच्या शौर्यावर लिहलेली लोकगीते आजही जिवंत आहे हे नक्की.

संदर्भ- महाराष्ट्राचे शिल्पकार तंट्या भिल्ल, लेखक बाबा भांड

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.