दात पुढ आलेला हा लाजाळू भारतीय मुलगा जगातला “ग्रेटेस्ट रॉकस्टार” बनला.

फारुख बुल्सारा त्याच खर नाव. फारुख म्हणजे आनंदी. पण पाचगणीच्या त्या हायफाय शाळेत सगळे एकमेकाला इंग्लिशमध्ये हाक मारायचे. फारुखने स्वतःचं नाव धारण केलं फ्रेडी. आईवडील मूळचे गुजरातचे पारसी. पण वडील ब्रिटीश गव्हर्न्मेंटमध्ये नोकरीला होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नोकरी शाबूत टिकवण्यासाठी ब्रिटीशांच राज्य असलेल्या झांझिबारला राहायला गेले.
चांगलं शिक्षण मिळाव म्हणून फ्रेडीला पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये भरती करण्यात आलं होतं. पण त्याला एक प्रॉब्लेम होता, त्याला चार दात एक्स्ट्रा होते. त्या पुढ आलेल्या दातांमुळे फ्रेडी लाजून कोणाशी जास्त बोलायचा नाही. जास्त कोण मित्रदोस्त नव्हते. शिक्षकांच्या ही प्रश्नाला उत्तर द्यायचा नाही. पोरं तरीही त्याची जबरदस्त थट्टा उडवायची.
असा हा लाजाळू मुलगा शाळेच्या गॅदरिंगमध्ये मात्र अचानक फेमस झाला. कारण होतं त्याने गायलेलं गाण. फ्रेडी सिंगर आहे, त्याला बोलता येत हे सगळ्या शाळेला पहिल्यांदा कळाल. स्टेजवरच त्याच कॉन्फीडंट रूप कधीही न पाहिलेलं असं होतं. सातवीत असताना त्याने स्वतःचा वेगळा बँड बनवला. द हेक्टिक म्हणून ओळखला हा बँड फक्त वेस्टर्न पॉप गाणी म्हणायचा. दिवसरात्र रेडियोवर इंग्लिश गाणी ऐकून त्यातल्या पियानोची हुबेहूब नक्कल करत गाणी गाणारा फ्रेडी आजही त्याच्या मित्रांना लक्षात आहे.
त्याने पुढे कधीच आपल्या दाताना सरळ करायचा प्रयत्न केला नाही. त्या एक्स्ट्रा दातांमुळे जबड्यात झालेल्या स्पेसमुळे आपल्या आवाजात ठेहराव येतो असं त्याच म्हणण होतं.
शाळा संपल्यावर फ्रेडी आईवडिलांच्याकडे झांझिबारला आला. तिथे एकदिवस इंग्रज सरकारविरुद्ध स्थानिकांनी बंड पुकारलं. शेकडो भारतीय अरब वंशाचे लोक मारले गेले. सगळा अधिकारीवर्ग जीव मुठीत घेऊन पळाला. यात फ्रेडीची फॅमिली देखील होती.
टांझानिया मध्ये ऐशोआरामात मोठ्या घरात राहणारे बुल्सारा लंडनच्या एका छोट्याशा चाळीवजा घरात राहत होते. फ्रेडीने एका आर्ट कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. वेगवेगळ्या बँडसाठी गाणी गाऊ लागला. पण पोटापाण्यासाठी काही तरी नोकरी करावी लागणार होती. एयरपोर्टवर बॅगेज घेऊन जाणे, गल्लीमध्ये सेकंड हँड कपडे विकणे असले उद्योग चालू होते.
एकदिवस त्याला कळाल की एका चांगल्या बँडमध्ये लीड सिंगरची गरज आहे. फ्रेडी त्यांना भेटायला गेला. बँडचं नाव होतं स्माईल. त्याचा कर्ताधर्ता असणाऱ्या ब्रायन मे आणि रॉजर टेलरला फ्रेडी भेटला. आपण सिंगर होण्यासाठी आलोय असं सांगितल्यावर ते दोघेही हसले. रॉजर म्हणाला,
Not with those teeth, mate
आमच्या बँडचं नावच स्माईल आहे. या स्माईलला तुझे दात शोभून दिसणार नाहीत अशी चेष्टा त्यांनी केली. पण त्याने एक गाण गाऊन दाखवल्यावर त्यांना कळाल की त्या दात पुढ आलेल्या जबड्यात किती ताकद आहे ते. फ्रेडी या बँडची जान बनला. त्यानेचं स्माईलला नवीन नाव दिल, क्वीन!!
क्वीन साठी फ्रेडी गाणी तर गायचाच पण लिहायचा देखील. त्याने बँडसाठी लोगो डिझाईन करण्यापासून ते बँडमेम्बर्सचं कॉस्च्युम काय असाव हे ठरवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतला. तिथे त्याला मेरी ऑस्टिन नावाची गर्लफ्रेंड देखील मिळाली. क्वीनने त्याच आयुष्य बदलून टाकलं होतं. मध्यंतरी त्यानं आपल नाव सुद्धा फारुख बुल्सारा वरून फ्रेडी मर्क्युरी केलं होतं.
साठच्या दशकात अमेरिकेत रॉकबँड कल्चरने क्रांती केली होती. दहावर्षांनंतर क्वीनने ब्रिटनमध्ये तिची सुरवात केली. इंग्लंडच्या राणीचे सैनिक अशा वेशभूषेतले क्वीन बँडचे सैनिक पूर्ण देशात धुमाकूळ घालू लागले. लवकरचं स्वप्नांचा देश अमेरिकेतून त्यांना बोलवण आलं. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये पाउल ठेवण्यापूर्वी संपूर्ण युएसएमध्ये त्यांच्या शोचे तिकिटे बुक झाली होती.
फक्त क्वीननंं प्रुव्ह केलं होतं की अमेरिका सोडून बाकीच्या देशातले बँडही त्याच तोडीच संगीत बनवू शकतात. फ्रेडीचं सगळ जग बदलत चाललं होतं. त्याची गाणी रेकॉर्डब्रेक गाजत होती. अत्यंत लाजाळू असणाऱ्या त्याला या प्रसिद्धीची सवय नव्हती.
या अमेरिका दौऱ्यात त्याला आणखी एक शोध लागला, त्याच्या गे असण्याचा.
तिथल्या एका रेकोर्डिंग स्टुडियोमध्ये कुठल्यातरी एका पुरुष कर्मचाऱ्याबरोबर त्याचा पहिल्यांदा संबंध आला. त्याला जाणवलं की एवढी वर्ष आपण स्वतःला फसवत होतो. आपल्याला समलैंगिकतेमध्येचं खुश आहे. पण हे आपल्या गर्लफ्रेंडला कसं समजावून सांगायचं त्याला ठाऊक नव्हत.
मनाच्या द्विधा मनस्थिती मध्येच त्याने नवीन गाण लिहिलं. बोहेमियन राप्सोडी. सुरवातीला बाकीचे मेम्बर हे गाण खूप मोठ आहे या कारणामुळे नवीन अल्बम मध्ये हे गाण घेण्यासाठी तयार नव्हते. पण कधी नव्हे ते फ्रेडीने भांडण काढून हे गाण त्यात अॅड करायला लावलं. गाण सुपरहिट झालं. या गाण्यामुळे क्वीनच्या नव्या अल्बमच्या कित्येक कॉपी हातोहात खपल्या.
बोहेमियन राप्सोडीने फ्रेडी मर्क्युरीला जगभरात रॉकस्टार म्हणून मान्यता मिळवून दिली.
दरम्यान त्याचं आणखी एक गाण गाजलं. लव्ह ऑफ लाइफ. खर तर हे गाण त्याने आपल्या गर्लफ्रेंड साठी मेरीसाठी लिहिलं होतं. दोघांनी फ्रेडीच्या गे असल्यामुळे एकमेकापासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता पण त्याच्यासाठी तीच शेवटपर्यंत पहिलं प्रेम, बेस्ट फ्रेंड, त्याला समजावून घेऊ शकणारी व्यक्ती होती. त्याच तिच्यावर निरपेक्ष प्रेम होतं.
मेरी त्याच्या आयुष्यातून दूर झाली आणि त्याचा स्वतःवरचा बंध सुटला. बोहेमियन राप्सोडीनंतर आलेला वुई आर दी चम्पियन्स हे गाण देखील तुफान चाललं. पण याच अल्बम मधलं वुई विल रॉक यु या गाण्याने तर इतिहास रचला. हे गाण फ्रेडीचं नव्हतं.
प्रचंड आलेला पैसा, रॉकस्टार म्हणून तसलच तुफानी लाईफस्टाईल, मित्रमंडळ, तसलेच प्रेमी या सगळ्यामध्ये फ्रेडीचं आयुष्य वाहवत जाऊ लागलं. वुईविल रॉक युच्या यशानंतर क्वीनचे बाकीचे सभासद आता फ्रेडीने बँड सोडून स्वतःची वाटचाल करायला हरकत नाही असं सुचवून पाहिलं. यातून क्वीनमध्ये भांडणास सुरवात झाली. त्यात फ्रेडीचा बॉयफ्रेंड कम बँडचा मॅनेजर असलेल्या पॉलने आणखी गोंधळ घालून ठेवले. पत्रकारांशी भांडणे झाली.फ्रेडीच्या गे असण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली.
फ्रेडीच्या बेफिकीर वागण्याला मात्र ब्रेक लागला नाही. आय वोन्ट टू ब्रेकफ्री नावाच्या अल्बम मध्ये तर त्याने अश्लील कपडे घालून स्टेजवर परफोर्म करायला सुरवात केली. आधीच तो आपल्या रंगीत ड्रेसिंग सेन्स साठी ओळखला जात होता त्यात या अश्लील कपड्यामुळे त्याची कुप्रसिद्ध वाढीस लागली. एम टीव्हीने त्याच्यावर बन आणला.
अखेर फ्रेडी आणि पॉल क्वीनमधून बाहेर पडले. एकट्याच्या जीवावर त्याने आपलं म्युजिक करीयर सावरलं देखील असत पण पॉलने वेळोवेळी केलेली आपली फसगत लक्षात आल्यावर तो परत आला. तो पर्यंत बराच उशीर झाला होता. त्याच्या बेधुंद जगण्याने त्याच्यावर सूड उगवला होता. नव्यानेचं जगात आलेल्या एड्स या रोगाने त्यालाही घेरलं होतं.
आपल्या स्टेजवरच्या नुसत्या एंट्रीमुळे पब्लिकमध्ये विजेचा करंट सोडणारा हा रॉकस्टार हळूहळू आतून पोखरत चालला होता. याची भणक लागलेल्या इंग्लिश पत्रकारांनी त्याच जगन हराम करून सोडलं. तो जिथे जाईल तिथे फोटोग्राफर फिरत होते. पण पब्लिकचं त्याच्यावरच प्रेम कमी झालं नव्हत. अजूनही त्याच्या गाण्यांसाठी कपडे फाडून घेणारे लोक कमी नव्हते. दिज आर द डेज ऑफ आवर लाइफ या गाण्यात तो शेवटचा दिसला. निम्मा उरला होता, पण गाण्यातला जोश तसाच होता.
एक दिवस बातमी आली फ्रेडी मर्क्युरी गेला. दात पुढे असलेला लाजाळू भारतीय मुलगा इतिहासातला सर्वात ग्रेटेस्ट रॉकस्टार बनून जगाला हलवून गेला होता.
गेल्यावर्षी त्याच्या आयुष्यावर बोहेमियन राप्सोडी नावाचा सिनेमा देखील येऊन गेला. या सिनेमाने चार ऑस्कर मिळवून तिथेही धुमाकूळ घातला. आजही फ्रेडी मर्क्युरी या नावाची त्याच्या गाण्याची जादू कमी झालेली नाही. त्याच्या विक्रमी गाजलेल्या गाण्यांनी गिनीज बुकमध्ये सुद्धा आपली एंट्री केलेली आहे.
हे ही वाच भिडू.
- रॉकी बनवण्यासाठी ३ हजाराला विकायला लागलेला लाडका कुत्रा पुन्हा ३ लाख देवून घेतला.
- कधीकाळी बिनाटोपीचा हिमेश पहायची पण क्रेझ होती
- एकेकाळी लताची बदली सिंगर असणारी ही खरोखर लताला रिप्लेस करू लागली.