सद्दाम हुसेनच्या हातावर तुरी देऊन हे भारतीय अणुशास्त्रज्ञ इराक मधून निसटले होते.

अण्वस्त्र सुसज्ज देश, हा कोणत्याही देशासाठी संरक्षणाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा असणारा विषय. त्यातही प्रत्येक देश आपल्या देशात असे संशोधन व्हावे म्हणून प्रयत्न करत असतो. जपानमध्ये झालेल्या अपरिमीत हानी नंतर युद्धातला शेवटचा पण अचूक पर्याय म्हणून अनेक बलाढ्य राष्ट्रानी स्वत:ला अण्वस्त्रसज्ज करण्याकडेच भर दिला. अमेरिका, रशिया सारख्या विकसित राष्ट्र अण्वस्त्र सज्ज झाली असली तरी विकसनशील राष्ट्रासाठी अण्वस्त्र सज्ज होणं हि कठिण अशी गोष्ट होती. मात्र भारताने हि गोष्ट साध्य करुन दाखवली.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच नेतृत्व आणि डॉ. होमी भाभा, विक्रम साराभाई यांच्यासारख्या संशोधकांमुळे भारत अणुसंशोधनात मोलाच काम करत होता. पुढे इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली दिनांक १८ मे १९७४ रोजी पोखरण येथे अणुस्फोट चाचणी करण्यात आली. या अणुस्फोट चाचणीत महत्वाचा सहभाग होता तो, 

“राजा रामण्णा” यांचा. 

राजा रामण्णा हे एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. एक विख्यात अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रज्ञ होते. टेक्नॉलॉजिस्ट, प्रशासक, पुढारी, संगीतज्ञानी, संस्कृत पंडित आणि तत्त्वज्ञ होते. सैद्धांतिक आणि प्रायोगिक भौतिकीच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांचा सहभाग मोलाचा होता.

भारतातील पहिली अणुचाचणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. दिनांक १८ मे १९७४ रोजी, राजस्थानातील वाळवंटात करण्यात आलेल्या या अणुस्फोटाचे वर्णन राजा रामण्णांनी अशा प्रकारे केलं होतं, 

 “भारतातील अणुसंशोधनाच्या इतिहासात पोखरणमधील प्रयोग ही एक लक्षवेधी घटना होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने ज्या क्षेत्रातील प्रगतीस पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला, त्या तंत्रशास्त्रीय प्रगतीची ती सिद्धता होती.”

पोखरण मधील यशस्वी चाचणी नंतर डॉ. रामण्णा यांना वेगवेगळ्या देशांतून खास आमंत्रित करण्यात येत होते. विशेष सन्मानीत पाहूणे म्हणून ते वेगवेगळ्या देशांमध्ये जावून खुल्या मनाने आण्विक संशोधनाबद्दल मत सांगत असतं. पोखरणच्या चाचणीनंतर चारच वर्षात असेच एक निमंत्रण खुद्द सद्दाम हुसेनकडून देण्यात आले होते. इराकसारख्या राष्ट्राने देखील स्वत:च्या विकासासाठी अण्विक उर्जाच्या कार्यक्रम हाती घ्यावा असे त्यांचे मत होते.

म्हणून त्यांचे निमंत्रण मान्य करत ते इराकला गेले. 

इराकमध्ये आल्यानंतर मात्र त्यांना वेगळाच संशय येवू लागला. मोठ्या सन्मानाने त्यांना सद्दाम हुसेन भेटायला आला आणि पहिल्याच भेटीत त्यांने आपल्या देशाला अण्वस्त्रसज्ज करण्यासाठी त्यांनी इराकमध्येच थांबावे अशी इच्छा बोलून दाखवली.

डॉ. रामण्णा यांचा योग्य पाहूणचार करत त्यांना खुष करण्याचे हरएक प्रयत्न करण्यात आले होते. अशाच आपल्या देशातील एक अणुप्रकल्प दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना सद्दाम हुसेन तुग्था या प्रकल्पाच्या ठिकाणी घेवून गेला. प्रवासाच्या शेवटच्या टप्यावर अखेर सद्दाम हुसेन यांने आपला प्रस्ताव डॉ. रामण्णा यांच्या पुढे मांडला.

सद्दाम हुसेन म्हणाला,

“आपण आपल्या देशासाठी पुरेसे काम केले आहे, आत्ता परत जाऊ नका. येथे रहा आणि इराकमध्ये अणु संशोधन सुरू करा. तुम्हाला पाहिजे तितकी  रक्कम मी देईन.”

ब्रिटीश पत्रकार श्याम भाटिया आणि डॅनियल मॅकग्रॉ यांनी लिहिलेल्या “सद्दामस बॉम्ब” या पुस्तकात या  विधानाच उलेख करण्यात आला आहे.

सद्दामच्या उत्तरावर त्या ठिकाणी प्रत्युत्तर देणं शक्य नव्हतं. मोठ्या शिताफीने त्यांनी मी आपणासोबत काम करण्यास तयार असल्याचा आभास निर्माण केला. सद्दाम हुसेन देखील भारताचा एक मोहरा आपल्या ताब्यात आल्याच्या खुषीत होता. मात्र दुसऱ्याच क्षणाला विलंब न करता डॉ. रामण्णा भारताच्या विमानात बसून भारतात परतले. याबद्दल ते बोलताना म्हणाले होते, मी तिथून कसा परतलो ते मलाच ठावूक आहे. कोणत्याही मोहांना बळी न पडता ते भारतात परतले होते.

डॉ. रामण्णा देशभक्त होते. त्याकाळच्या विकसित देशात राहण्याच्या मोहाचा त्याग करत भारताच्या विकासासाठी झटणाऱ्या  होमी भाभांच्या हाकेला ओ देऊन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सशक्त देश विकसित करण्याच्या भारताच्या उद्देशासाठी ते झटले होते. डॉ.रामण्णा एक कुशल प्रशासक होते. त्यांनी अनेक प्रतिष्ठेची पदे भूषवली होती. ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक होते. ते संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार, डी.आर.डी.ओ. चे प्रमुख संचालक आणि भारत सरकारचे संरक्षण संशोधन सचिवही होते. ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. जे.आर.डी. टाटांनी निर्माण केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज, बंगलोर चे ते पहिले संचालक होते.

जानेवारी ते नोव्हेंबर १९९० मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही काम केलेले होते. रामण्णा राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते. अशा या थोर शास्त्रज्ञानाच भारताने यशोचित सन्मानच केला, त्यांच्या देशासाठी झटल्याच कार्य लक्षात ठेवत असताना, देशप्रेमासाठी सद्दाम हुसेनची ऑफर नाकारणारा शास्त्रज्ञ म्हणून देखील त्यांना लक्षात ठेवायला हवे.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.