ब्रिटेनच्या नोटेवर झळकणार, जगदीशचंद्र बोस…?

महान भारतीय वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस यांची जयंती २ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना इंग्लंडमधून आलेली एक बातमी भारतीयांना सुखावणारी आहे. बातमी अशी की,

“बँक ऑफ इंग्लंडकडून ५० पौंडाच्या नोटांवर जगदीशचंद्र बोस यांचा फोटो छापण्याची शिफारस करण्यात आलीये”

बँक ऑफ इंग्लंडकडून २०२० साली ५० पौंडाच्या नवीन नोटा छापण्यात येणार आहेत. या नोटांवर कुणाचा फोटो असावा यासंदर्भात बँक ऑफ इंग्लंडने तेथील जनतेला नाव सुचविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

नोटांवर छापण्यासाठी सुचविण्यात येणारा व्यक्ती विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असावा आणि या क्षेत्रात त्या व्यक्तीने इंग्लंडला भरीव योगदान दिलेलं असावं, ती व्यक्ती जिवंत नसावी, अशी अट ठेवण्यात आली होती.

लोकांनी ज्या अनेक शास्त्रज्ञांची नाव सुचवली त्यात बोस यांच्याशिवाय महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, एलन ट्युरिंग, ग्राहम बेल, अलेक्झांडर फ्लेमिंग, पेट्रिक मूर इत्यादींसह ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या नावांचा देखील समावेश आहे. थॅचर बाईंचं नाव त्यांनी पंतप्रधान म्हणून नव्हे, तर रसायनशास्त्रज्ञ म्हणून दिलेल्या योगदानासाठी सुचविण्यात आलंय.

‘विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात इंग्लंडला दिलेलं भरीव योगदान’ हा निकष ठरविण्यात आल्यामुळे या यादीत फक्त शास्त्रज्ञांचीच नाव आहेत. पण हे निकष ठरविण्यापूर्वी भारतीय वंशाच्या गुप्तहेर नूर इनायत खान यांचा फोटो नवीन नोटांवर असावा यासाठी इंग्लंडमध्ये एक मोहीमच सुरु केली होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नूर इनायत खान यांनी इंग्लंडसाठी थेट क्रूरकर्मा हिटलरचीच हेरगिरी केली होती.

सर जगदीश चंद्र बोस. 

१९७८ सालच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचे विजेते सर नेव्हील मोट यांनी ज्यांच्या बाबतीत ‘आपल्या काळाच्या ६० वर्षे पुढचा माणूस’ असं म्हंटलं होतं, त्या सर जगदीशचंद्र बोस यांनीच जगाला सर्वप्रथम सांगितलं होतं की ‘वनस्पतीमध्ये देखील जीव असतो.’

बोस यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील बंगालमधला. ३० नोव्हेंबर १८५८ सालचा. प्राथमिक शिक्षण आपल्या गावातच पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलकात्यातील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी आणि त्यानंतर केम्ब्रिजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी संशोधनात काम  करायला सुरु केलं.

१० मे १९०१ रोजी लंडनच्या रॉयल सोसायटीत आपल्या क्रेस्कोग्राफ या उपकरणाच्या आधारे सर जे.सी. बोस यांनी सप्रमाण सिद्ध केलं होतं की माणसाप्रमाणेच वनस्पती देखील सजीव असतात. त्यांच्यात देखील जीव असतो.

जीवशास्त्रातील संशोधनाशिवाय त्यांनी भौतिकशास्त्रात देखील मोठं काम करून ठेवलंय. साधारणतः वायरलेस रेडीओच्या संशोधनाचं श्रेय नोबेल पारितोषिक विजेते गुलइलमो मार्कोनी यांना दिलं जातं.

पण असं देखील समजलं जातं मार्कोनीच्या पूर्वीच बोस यांनी रेडीओ लहरींचा वापर केला होता.

बोस यांच्या संशोधनासाठी १९०४ साली त्यांना अमेरिकेचं  पेटंट मिळालं. त्यावेळी ते अमेरिकन पेटंट मिळविणारे पहिले भारतीय ठरले होते. हे पहिलंपण काही फक्त पेटंटच्या बाबतीतच नव्हतं, तर १९२० साली जेव्हा ब्रिटनच्या रॉयल सोसायटीने त्यांची फेलो म्हणून निवड केली होती, त्यावेळी देखील रॉयल सोसायटीने सन्मानित केलेले ते पहिलेच भारतीय ठरले होते.

ब्रिटीश सरकारने देखील विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेताना ‘नाईट’ उपाधी देऊन त्यांचा गौरव केला होता.

हे ही वाच भिडू.  

Leave A Reply

Your email address will not be published.