इथं वनडेमधले राडे थांबेनात, त्यात रहाणेच्या स्टेटमेंटमुळं नवाच विषय चर्चेत आलाय…

एक जमाना होता जेव्हा लोक भारतीय क्रिकेट टीमचे फॅन असायचे. नंतर आयपीएल आली, संघातले वाद पुढे आले… आणि बरेच जण रोहितचे फॅन, विराटचे फॅन, चेन्नईचे फॅन, मुंबईचे फॅन असे डिव्हाईड झाले. पण तसं बघायला गेलं, तर हे कितीही काय झालं तरी भारताची मॅच असली की सगळे कार्यकर्ते एक होतात. फक्त मॅच हरल्याचं खापर कुठं फोडायचं हा प्रश्न असतोय…

आता हे पुराण सांगायचं कारण म्हणजे, अजिंक्य रहाणेनं एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य. रहाणे काय बोलला हे तर सांगतोच, पण त्याआधी थोडीशी बॅकग्राऊंड दिलीच पाहिजे.

सध्या रहाणेचा टाईम जरा खराब सुरु आहे. बॅटमधून रन्स निघेनात, त्यात कसोटीचा कॅप्टन म्हणून विराट कोहलीनं राजीनामा दिला, तेव्हा असं वाटलं की अनुभव आहे आणि एवढा सिनिअर आहे म्हणल्यावर शंभर टक्के रहाणे कॅप्टन होईल. पण कॅप्टन बनायचं स्वप्न सोडा, रहाणेचं व्हाईस कॅप्टन पदही गेलं. त्यात फॉर्म इतका गंडलाय की, पुढच्या सिरीजमध्ये रहाणेला चान्स मिळणार की नाही याच्या चर्चा जवळपास रोज कट्ट्यांवर होताना दिसतात.

हे कमी होतं की काय म्हणत, तोंडावर आलेल्या रणजी ट्रॉफीमध्येही एक किस्सा झालाय. सगळ्यात सिनिअर प्लेअर असलेल्या रहाणेच्या जागी मुंबईच्या रणजी टीमचा कॅप्टन म्हणून पृथ्वी शॉची निवड झालीये. साहजिकच रहाणेवर प्रेशर असणार…

रहाणे नेमकं काय बोलला..?

क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांनी रहाणेची मुलाखत घेतली, त्यात रहाणे बोलत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्याविषयी बोलताना रहाणे म्हणला, ‘मी तिथं काय केलंय हे मला माहीत आहे. ते कुणाला सांगण्याची गरज नाहीये. स्वतःहून जायचं आणि क्रेडिट घ्यायचे हा माझा स्वभाव नाही. काही गोष्टी अशा होत्या, ज्याबाबत मी मैदानावर किंवा ड्रेसिंग रुममध्ये निर्णय घेतले पण, त्याचं क्रेडिट भलत्याच कुणीतरी घेतलं. माझ्यासाठी हे महत्त्वाचं होतं की आम्ही जिंकावं. ती सिरीज जिंकणं ऐतिहासिक होतं आणि माझ्यासाठी खास पण.’

पुढे रहाणे म्हणाला, ‘त्यानंतर लोकांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया किंवा मी हे केलं, ते केलं, हा माझा निर्णय होता हे सांगणं.. हे त्यांचं बोलणं आहे. मी मैदानावर काय निर्णय घेतले हे माझं मला माहितीये. आम्ही मॅनेजमेंट सोबत या गोष्टी बोलायचो, पण हे सगळं हसत हसत व्हायचं. मी कधीच स्वतःबद्दल बोलत नाही किंवा स्वतःचं कौतुक केलं नाही. मी ऑस्ट्रेलियात काय केलं हे मला चांगलं माहितीये.’   

आता रहाणेनं मारलेला बाण रवी शास्त्रीला उद्देशून होता, की दुसऱ्या कुणाच्या हे आता अजून काय स्टेटमेंट आलं, तर समजेलच… पण रहाणेचं क्रेडिट मारलं असेल, तर काय बरोबर झालं नाय.   

आता रहाणे फक्त ऑस्ट्रेलियावरच बोलला असं नाही. त्याचा फॉर्म हा इतका चर्चेतला विषय आहे, म्हणल्यावर तो तर छेडला जाणारच की. आपल्या फॉर्मबद्दल आणि संघातल्या स्थानाबद्दल बोलताना रहाणेनी एकदम वाढीव मत व्यक्त केलं, तो म्हणला, ‘जेव्हा लोकं म्हणतात की माझं करिअर संपलंय, तेव्हा मी फक्त हसतो. ज्या लोकांना खेळातलं कळतं, ते अशा गोष्टी बोलत नाहीत. ऑस्ट्रेलियामध्ये आणि त्याआधीही काय झालंय, माझं रेड बॉल क्रिकेटमधलं योगदान काय आहे हे सगळ्यांना माहितीये. ज्यांना खेळ आवडतो, ते जरा विचार करुनच बोलतील…’

ऑस्ट्रेलियामध्ये रहाणेनं केलेली कामगिरी कोणीच विसरु शकत नाही. त्यानं ज्या प्रकारे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचं नेतृत्व केलं, संघ संकटात असताना मेलबर्न टेस्टमध्ये दमदार शतक केलं आणि संघातले मुख्य खेळाडू नसतानाही नव्या पोरांना हाताशी घेऊन टीमची नौका पार लावली, त्याचा नादच नाही.

पण आता क्रेडिट घेण्यावरुन आणि देण्यावरुन नवा वाद सुरू झाला नाही म्हणजे मिळवलं. त्यातही आपल्यात अजूनही क्रिकेट बाकी आहे म्हणणाऱ्या रहाणेला आणखी चान्स मिळतात की नाही.. हे सुद्धा बघावं लागेल…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.