रशिया-युक्रेनच्या युद्धा दरम्यान भारतीयांना माजी परराष्ट्रमंत्री आठवतायेत

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर रशिया- युक्रेनच्या युद्धाला सुरुवात झालीये. २४ फेब्रुवारीपासून रशियानं युक्रेनवर आक्रमण सुरु केलंय. रशियाच्या लढाऊ विमानांनी युक्रेनची राजधानी कीवसोबत २०० ठिकाणी हल्ले केलेत. ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होतायेत. या हल्ल्यात २४ तासात १३७ लोकांचा जीव गेलाय तर ३१६ जण जखमी आहेत, आणि या आकड्यात वाढ होतच चाललीये.  

हल्ल्यामुळं सगळ्या युक्रेनमध्ये दहशतीचं  वातावरण तयार झालंय. लाखो लोक जीव वाचवण्यासाठी भुयारी मार्ग, मेट्रो स्टेशन आणि अंडरग्राउंड शेल्टरमध्ये थांबलेत. अनेकांनी देश सोडलेत, पण आता विमान उड्डाण सुद्धा जवळपास नाहीच्या बरोबर आहे. अशात आपले भारतीय सुद्धा युक्रेनमध्ये अडकलेत.

आतापर्यंत जी माहिती मिळालीये त्यानुसार ४ हजार भारतीय सुखरूप परत आलेत, पण विमान उड्डाणाच्या कमतरतेमुळे अजुनही २० हजारांच्या आसपास भारतीय युक्रेनमध्ये अडकलेत. ज्यात सगळ्यात जास्त विद्यार्थी आहेत. पंतप्रधान रशियाच्या राष्ट्रपती पुतीनशी बोलायच्या प्रयत्न करतायेत. भारतीयांना पोलंडच्या मार्गाने आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली जात आहे.  पण इतक्या दिवसानंतर सुद्धा कुठलीच ठोस पावल उचलली जात नाहीयेत.

अँबसीला युक्रेनमध्ये अकडकेले भारतीय आणि त्यांच्या नातेवाईकांकडून  हजारो फोन केले जातायेत,  पण अजूनही भारत सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाहीये. अशा परिस्थितीत मात्र ट्विटरवर missing #sushmaswaraj मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतंय. 

नागरिकांचा आरोप होतोय कि, सुषमा स्वराज यांच्या काळात ज्याप्रकारे अडकलेल्या भारतीयांना सुखरूप आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न केला गेलेला तसा प्रयत्न आता केला जात नाहीये. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना एका ट्विटवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी लगेच मदत पाठवायच्या.

 

आता सुषमा स्वराज यांना आठवण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे, त्यांच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयाची व्याख्याच बदलली होती. म्हणजे परराष्ट्र मंत्रायल एक प्रकारे दुसऱ्या देशांशी चांगले संबंध तयार करण, इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये भारताला रिप्रेझेन्ट करणं. ऐकून काय परराष्ट्र मंत्रालय म्हणजे एकदम हाय- फाय मंडळींचं मंत्रालय असायचं.

 पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सुषमा स्वराज यांच्याकडे हे खातं आलं आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याबरोबरच आम आदमीला सुद्धा या खात्याशी जोडून घेतलं. कुठल्याही देशात वादग्रस्त परिस्थिती किंवा अडचण तयार झाली, तिथल्या भारतीयांना मदत करणं किंवा सुखरूप आपल्या देशात परत आणणं, हे काम मंत्रालयानं हाती घेतलं. 

२०१४ ते २०१९ पर्यंत सुषमा स्वराज यांनी या मंत्रालयाचा कारभार सांभाळला. पण या पाच वर्षात काळात जवळपास १८० पेक्षा जास्त देशांमधल्या १ लाख भारतीयांची मदत केलीये.   

म्हणजे २०१५ सालची गोष्ट. येमेनमध्ये सौदी समर्थक सेना आणि हुती बंडखोरांमध्ये मोठं युद्ध झालेलं. येमेनची राजधानी साना येथे बॉम्बहल्ले सुरु होते. अशात येमेनमध्ये सुद्धा हजारी भारतीय अडकले होते. परिस्थिती जेव्हा गंभीर बनली तेव्हा तिथे अडकलेल्या कामगारांनी  सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीचे आवाहन केलं. पण लढाऊ विमानांच्या सततच्या हल्ल्यांमुळे कुठलंही विमान उतरवणं शक्य नव्हतं.

अशा परिस्थितीत सुषमा स्वराज यांनी सौदी अरेबियाशी चर्चा करून काही काळ हल्ले थांबवायला सांगितलं. आता भारताचे आणि सौदीचे संबंध चांगले असल्या कारणाने सौदीने आठवडाभर दिवसा बॉम्बफेक थांबवली जेणेकरून भारतीय विमान सुखरूप उडाण करू शकतील. याच दरम्यान तिथे अडकलेले ५ हजारांच्या पेक्षा जास्त भारतीय सुखरूप आपल्या देशात परतले. सुषमा स्वराज यांच्या या ऑपरेशनला ‘ऑपरेशन राहत’ असं म्हंटल गेलं.

महत्वाचं म्हणजे या ऑपरेशन दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे बरेच अधिकारी स्वतः युद्ध सुरु असलेल्या भागांमध्ये जाऊन भारतीय नागरिकांना देशात आणायचे. आणि यात फक्त भारतीयचं नाहीत तर ४८ देशांमधल्या २ हजारपेक्षा जास्त परदेशी नागरिकांना सुद्धा या ऑपरेशन अंतर्गत भारतात आणल गेलं होत. बऱ्याच परदेशी सरकारांनी भारताला त्यांच्या नागरिकांना युद्धग्रस्त भागातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. ज्यांनंतर परदेशी नागरिक भारतीयांसोबत भारतात यायचे आणि नंतर इथून आपल्या देशात जायचे.

एवढंच नाही २०१६ मध्ये सुद्धा जेव्हा दक्षिण सुदानमध्ये युद्ध सुरु होत, तेव्हा तिथे अनेक भारतीय नागरिक अडकले होते. अशावेळी सुषमा स्वराज यांच्याकडून ‘ऑपरेशन संकटमोचन’ चालवलं गेलं. ज्या अंतगत ५०० भारतीय नागरिकांना तिथून भारतात आणलं गेलं होत.

सुषमा स्वराज यांनी अश्या परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी ट्विटरवर मोहीम सुरु केलेली.  भारताबाहेर अडकलेल्या नागरिकांसाठी एका ट्विटवर त्या मदत पोहोचवायच्या. मग ते लिबिया युद्धावेळची मदत असो, एखाद्याला भारतात उपचार घ्यायचे असतील किंवा उपचारासाठी भारताबाहेर जायचे असले. परदेशात पासपोर्ट जप्त केला असेल किंवा इतर काही अडचणी असतील. एका ट्विटने सुषमा स्वराज आपल्या सगळ्या टीमसोबत कामाला लागायच्या. 

 एकदा एका यूजरला रिप्लाय देताना सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की, ‘तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी तुमच्या मदतीसाठी भारतीय दूतावास तिथे पोहोचेल.’

अशा परिस्थितीत रशिया- युक्रेन युद्धाची चाहूल गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु होती, त्यात कालपासून युद्धाला सुरुवात सुद्धा झालीये. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची संपर्क साधले जातायेत. पण कोणती मदत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपर्यंत पोहचू शकली नाहीये. त्यात युक्रेनमधली भारतीय अँबसी बंद करण्यात आलीये. त्यामुळे  तिथे अडकलेल्या भारतीयांच्या अडचणीत वाढ झालीये. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.