एका पोलिसाने महिलेशी गैरवर्तन केलं म्हणून नेहरूंनी थेट केरळचं सरकार बरखास्त केलं

केरळ. अगदी सुरुवातीपासूनच कम्युनिस्टांचा हक्काचा बालेकिल्ला. इथं सातत्यानं त्यांचा प्रभाव दिसून येतो. ज्या काळात “कम्युनिस्ट लोक निवडणुका लढवत नाहीत, ते केवळ हुकूमशाही पद्धतीनं कारभार चालवतात” असा समज देशभरात पसरला होता, त्या काळात त्यांनी केरळच्या पहिल्या निवडणुकांमध्ये उतरत ती जिंकून दाखवली होती. ते वर्ष होतं १९५७.

यानंतर त्यांनी देशातील कम्युनिस्टांचा पहिलं सरकार स्थापन केलं. पण ते पुढची जेमतेम अडीच वर्षच चाललं. कारण हे सरकार जाण्यास कारणीभूत ठरली होती एका पोलिसांची चुकी.  

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९५६ साली भाषावार प्रांतरचना झाली. त्यात मल्याळम बोलणाऱ्या भागांना जोडून सध्याच केरळ राज्य अस्तित्वात आलं. १९५७ साली राज्यात विधानसभेच्या पहिल्या निवडणूक पार पडल्या. एकूण १२६ जागा असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी ६४ जागा बहुमतासाठी आवश्यक होत्या.

त्या निडवणुकीत डाव्यांनी इ. एम. एस. नम्बूदरीपाद यांच्या नेतृत्वात तब्बल ६० जागा जिंकल्या. तर देशभरात हवा असणाऱ्या काँग्रेसला ४३ जागांवर समाधान मानावं लागलं. आश्चर्यकारक म्हणजे जवळपास १४ अपक्ष त्या विधानसभेत निवडून आले होते. डाव्यांनी तात्काळ हालचाली करत अपक्षांचा पाठिंबा मिळवला आणि भारतातील कम्युनिस्टांच पहिलं सरकार स्थापन केलं.  

त्या वेळी जगात शीत युद्ध टोकाला होतं. इतकं कि पुढच्या काही वर्षातच अमेरिकेन क्युबा आणि रशियावर हल्ला करण्याचं नियोजन केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये कम्युनिस्टांनी लोकांमधून निवडणून येणं ही आश्चर्याची गोष्ट होती.

मुख्यमंत्री बनले इ. एम. एस. नम्बूदरीपाद

खुद्द पंतप्रधान नेहरू हा प्रयोग बघण्यास उत्सुक होते, त्यांना हे सरकार निवडून आल्यामुळे काहीच अडचण वाटत नव्हती.

पण अडचण तर तेव्हा सुरु झाली जेव्हा नम्बूदरीपाद यांनी राज्यात शिक्षणासंबंधित एक विधेयक मांडलं. असं नेमकं काय होतं त्या विधेयकात? तर त्यात प्रस्ताव असा होता की, प्रायव्हेट शाळा आणि कॉलेजमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना चांगला पगार आणि सोयीसुविधा मिळतील.

पण त्यानंतर शाळा चालवणाऱ्या बऱ्याच कॅथलिक चर्चना वाटलं की, हा निर्णय म्हणजे त्यांच्या अधिकारांवर गदा येत आहे. उच्चवर्ग समजला जाणारा आणि बरीच शाळा कॉलेज चालवणारा ‘नायर’ समाज यामुळे देखील दुखावला गेला.    

परिस्थिती बघून राज्यातील काँग्रेस नेते देखील आक्रमक झाले. त्यांनी नुकतीच निवडणूक हारली होती. सरकार विरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली. आंदोलनाला नाव दिलं स्वतंत्रता संघर्ष. नायर समुदायातील नेते असलेले मन्नत पद्मनाभा पिल्लई यांना आंदोलनाचा चेहरा बनवलं. त्यांची ओळख म्हणजे एकदम महात्मा गांधी यांचे पटशिष्यचं.

काँग्रेसने आंदोलन तीव्र केलं, राज्यात दंगलीची परिस्थिती झाली. लोक मोर्चा काढून सरकार विरोधात घोषणा देऊ लागले. आंदोलन शांत करण्यासाठी सरकारनं लाठीचार्जचे आदेश दिले. जवळपास दीड लाख लोकांना जेलमध्ये डांबलं गेलं. त्या लाठीमारात २५० जणांचा मृत्यू झाला. 

या बातम्या वाचून नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी आमंत्रण पाठवलं. त्यांना या विधेयकशी कोणतीही हरकत नव्हती. पण ते झालेल्या आणि होणाऱ्या हिंसेच्या विरुद्ध होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न सामोपचारानं मिटवण्याचा सल्ला दिला. पण काहीच निर्णय होऊ शकला नाही.

कम्युनिस्टांनी याला कम्युनिज्मच्या विरोधात असलेलं षडयंत्र असा आरोप केला. तर असं म्हंटल जात की त्यावेळी केरळमधल्या काँग्रेस नेत्यांच्या पाठीमागे इंदिरा गांधी उभ्या होत्या. 

अशा या तापलेल्या वातावरणात केरळमध्ये एक घटना घडली.

एका पोलिसानं एका गरोदर महिलेला मारलं, आणि त्यानंतर हे चुकून झालं असल्याचं जाहीररीत्या सांगितलं. प्रशासनानं काही तरी कारवाई करावी म्हणून मागणी होऊ लागली. झालं काँग्रेस कार्यकर्त्यांना आणखी एक कारण मिळालं. त्यांनी आंदोलन आणखी तीव्र केलं. पंतप्रधान नेहरूंना राज्याच्या परिस्थिती संबंधातील सर्व माहिती दिली. 

त्यावेळी हे सरकार बरखास्त करण्याच्या निर्णयाला नेहरूंचा पूर्णपणे विरोध होता. पण स्थानिक कार्यकर्ते आणि इंदिरा गांधी यांच्या दबावात येऊन नेहरूंनी सरकार बरखास्तीच्या निर्णयाला तयार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. याच कारणावरून इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी देखील चिडले. ते या निर्णयाच्या विरोधात होते.

पण अखेरीस ३१ जुलै १९५९ रोजी बातमी आलीच.

केरळच नम्बूदरीपाद सरकार बरखास्त, राष्ट्रपती राजवट लागू.

देशाचे सर्वात मोठे समाजवादी नेता अशी ओळख मिळवल्या नेहरूंनी कम्युनिस्टांच सरकार घालवलं.

१९६० मध्ये नव्यानं झालेल्या निवडणुका काँग्रेसच्या पथ्यावर पडल्या. काँग्रेसने ६३ जागा जिंकत सरकार स्थापन केलं. २० जागा जिंकणाऱ्या प्रजा समाजवादी पक्षानं त्यांना पाठिंबा दिला. याच सरकारमध्ये पहिल्यांदा मुस्लिम लीग देखील सहभागी झाली. त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.