भारताच्या पहिल्या फेमिनिस्ट पंडिता रमाबाईंच्या एका पत्राने विवेकानंदांची झोप उडवली होती.
अभ्यासात प्रगाढ पंडित, अनेक भाषांबद्दल असणारी माहिती आणि कणव, जनकल्याणासाठी केलेली अनेक मोठी कामे, अमेरिकेत जाऊन भारताच्या संस्कृतीचा केलेला प्रचार आणि समाजसुधारणा या सगळ्या उक्त्या ज्यांना चपखलपणे ज्यांना लागू होतात ते म्हणजे स्वामी विवेकानंद आणि पंडिता रमाबाई यांना. विशेष गोष्ट म्हणजे एकाच कालखंडात आपल्या कार्याविषयी सक्रिय असणाऱ्या या दोघांचे आपापसात प्रचंड मतभेद होते.
पंडिता रमाबाई यांना पहिल्या भारतीय लिबरल फेमिनिस्ट म्हणून ओळखले जाते. २३ एप्रिल १८५८साली म्हैसूरमधील एका ब्राम्हण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आईवडील पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांच्यावर लहानपणी चांगले संस्कार झाले. आईकडून त्यांनी संस्कृत भाषेचे धडे गिरवले. स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे असा त्यांच्या वडिलांचा आग्रह होता. १८७७ साली रमाबाईंच्या आईवडिलांचं अकाली निधन झालं. १८७८ साली भावासोबत त्या कोलकात्त्याला आल्या. अनेक दिवस प्रवास करत त्यांनी वयाच्या २२व्या वर्षी ३०००० संस्कृत श्लोक पाठ केले.
कन्नड, मराठी, बांगला आणि हिब्रू सोबत एकूण आठ भाषा त्यांना येत होत्या. रमाबाईंच्या या शिक्षणाने बंगालमधल्या विद्वानांमध्ये दहशत निर्माण केली. केशवचंद्र सेन या प्रगाढ पंडितांनी त्यांना पंडिता हि पदवी दिली. पुढे आंतरजातीय विवाह करून त्यांनी स्रियांना एक नवा आयाम घालून दिला. पण त्यांच्या पतीचंही अकाली निधन झालं. वडील, आई, बहिण, भाऊ, पती यांच्या मृत्यूनंतरही त्या खचल्या नाहीत. ३१ मे १८८२ रोजी आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिला सोबत घेऊन त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या.
रमाबाईंच्या आंतरजातीय विवाह आणि उच्च शिक्षणावर लोकांनी टीकेची झोड उठवली मात्र सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांच्याकडून त्यांना भक्कम पाठिंबा मिळाला.
पुण्यामध्ये त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि मुलींना शिकवायला सुरवात केली. या संस्थेअंतर्गत बालविवाह, स्त्री शिक्षण बंदी, सती प्रथा याविरोधात काम चालवले जाऊ लागले. त्यांनी केलेलं एक विधान मात्र जास्त महत्वाचं होतं,
या देशातले १०० पैकी ९० पुरुष स्त्रियांना शिक्षण देण्यास नकार देतात, शिकलेल्या महिलेची छोटीशी चूक मोठी करून सांगतात. देशाला जर प्रगती करायची असेल तर महिला शिक्षिका आणि डॉक्टर यांची संख्या जास्त पाहिजे.
रमाबाईंचे हे विचार जेव्हा महाराणी व्हीकटोरीयाला समजले तेव्हा त्यांनी रमाबाईंना कैसर ए हिंद हि पदवी दिली. या घटनेने प्रेरित झालेल्या महाराणीने अमेरिकेत असलेले भारतीय स्त्री शिक्षणावरचे कठोर नियम हटवले.
भारतातून आनंदीबाई जोशी यांच्या ६ मार्च १८८६ रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणून त्या फेब्रुवारी १८८६ मध्ये अमेरिकेस गेल्या. महाराष्ट्रात रमाबाईंनी स्त्रीयांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलं. विधवा स्त्रियांचे प्रश्न त्यांनी अत्यंत परखडतेने मांडले.
वैयक्तिक दुःखांची किंवा अडचणींची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. त्यांनी जरी दीनदुबळ्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारले, ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तरी कोणताही विशिष्ट ख्रिस्ती धर्मपंथ त्यांनी स्वीकारला नाही. त्या धर्माने ख्रिस्ती झाल्या; मात्र त्यांनी हिंदू समाज व संस्कृती कधी सोडली नाही. शेवटपर्यंत त्या शाकाहारी राहिल्या.
ब्रिटन प्रवासात त्यांनी एक पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव होतं द हाय कास्ट हिंदू वुमन. या पुस्तकात त्यांनी हिंदू महिला असल्याचे दुष्परिणाम, जातीव्यवस्था, बालविवाह सारख्या जाचक रुढींवर आघात केला. अमेरिकेत जाऊन त्यांनी लेक्चर देण्यास सुरवात केली.
याच काळात स्वामी विवेकानंदसुद्धा अमेरिकेत हिंदू संस्कृतीचे महत्व वाढवण्यासाठी अमेरिकेत आले होते. १८९३ साली जेव्हा विवेकानंदानी हिंदू स्त्री आणि संस्कृती या विषयावर शिकागोमध्ये भाषण केलं तेव्हा रमाबाईंनी या भाषणाला उद्देशून एक पत्र लिहिलं त्यात त्यांनी सांगितलं कि,
मी माझ्या तमाम स्त्री जातीला सांगू इच्छिते कि महान आणि शिकलेले लोकं स्त्रियांची घरात मुस्कटदाबी करतात आणि स्वतः पुढे जातात, स्त्रियांनी प्रतिकार करून ह्या प्रथा मोडायला हव्या. हिंदू जातीव्यवस्थेत स्त्रियांचं शोषण इतकं भयानक पद्धतीने चालत कि तुमचा विश्वास बसणार नाही.
यावर विवेकानंदानी पत्रात उत्तर दिलं कि,
मला माहिती नाही रमाबाई मला त्या लोकांमध्ये का मोजत आहे असो आपण कितीही चांगलं कार्य केलं तरी लोक त्याला नाव ठेवतातच त्यामुळे आपण आपलं काम नेटाने उभे न्यायला हवं. शिकागोत आल्यापासून मला रोज अशा गोष्टी ऐकायला मिळत आहेत.
इथे मात्र रमाबाई आणि विवेकानंद दोघेही आपापली बाजू मांडत होते. कोणीच चूक नव्हतं आणि कोणीच बरोबर नव्हतं मात्र त्यातल्या त्यात हे पत्राचं प्रकरण चांगलंच गाजलं. विवेकानंद त्यांच्या पत्राच्या धाकाने वैतागले होते कि आपण आपल्या देशाची संस्कृती मांडतोय आणि रमाबाई आपल्याच स्त्रियांचे वाभाडे काढत आहे.
मला भारतातील सर्व स्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदुमात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व ससुधारण करण्याच्या कामापासून मी पराङमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा व्रत मी धारण केले आहे. इतक्या साध्या शब्दात पंडिता रमाबाईंनी आपल्या कार्याचा शुभारंभ सुरु केला होता.
हे हि वाच भिडू :
- कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक उभारण्यात या मराठी माणसाचा सिंहाचा वाटा होता
- स्वामी विवेकानंद यांच्या एका भाषणाने मार्गारेट नोबेलच भविष्य बदलून गेलेलं.
- नरेंद्रला ‘स्वामी विवेकानंद’ बनवलं ते या राजेसाहेबांनी…