भारताचे पहिले अर्थमंत्री, जे पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले !

लियाकत अली खान.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी १९४६ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं होतं. या अंतरिम सरकारमध्ये अर्थमंत्री पदावर विराजमान होते लियाकत अली खान, जे पुढे दीड वर्षानंतर वेगळ्या पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले.

१ ऑक्टोबर १८८५ रोजी करनाल येथे जन्मलेल्या लियाकत अलींनी आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून पूर्ण केलं होतं आणि पुढच्या शिक्षणासाठी ते ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले होते. उच्च शिक्षण घेऊन परतले लियाकत अली त्यानंतर राजकारणात सक्रीय झाले. काँग्रेसने त्यांच्यासमोर  पक्षात येण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण तो नाकारत त्यांनी मोहोम्मद अली जिना यांच्या मुस्लीम लीगची निवड केली.

लियाकत अलींनीच २ फेब्रुवारी १९४६ रोजी नेहरूंच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. ते मोहोम्मद अली जिना यांचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे जिना यांच्यानंतर मुस्लीम लीग मधील सर्वात मोठे नेते समजल्या जाणाऱ्या  लियाकत अलींचा  मुस्लीम लीगचे प्रतिनिधी म्हणून अंतरिम सरकारमध्ये समावेश करण्यात आला होता.

लियाकत अली यांनी मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प अतिशय वादग्रस्त ठरला होता. या अर्थसंकल्पात त्यांनी व्यावसायिकांवरील कर दुप्पट केल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक त्यांच्यावर नाराज झाले होते. लियाकत अलींवर असा देखील आरोप झाला होता की मंत्रिमंडळातील हिंदू मंत्र्यांच्या खर्चास मंजुरी देण्यास ते जाणीवपूर्वक उशीर करतात.

nehru and liaqat
जवाहरलाल नेहरू आणि लियाकत अली

फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान ही २ वेगवेगळी राष्ट्रे म्हणून अस्तित्वात आली आणि लियाकत अलींची निवड पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान म्हणून करण्यात आली. ८ एप्रिल १९५० रोजी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि लियाकत अली यांच्यादरम्यान एक करार झाला होता. दोन्ही देशांमधील अल्पसंख्यांक समाजाच्या हिताचं संरक्षण करणं या उद्देशाने हा करार करण्यात आला होता.

नेहरू आणि लियाकत अली या दोघांनाही या करारामुळे आपापल्या देशांमध्ये टीकेचा सामना करावा लागला. याच मुद्द्यावर नेहरूंच्या सरकारमध्ये मंत्रीपदावर विराजमान राहिलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि जनसंघाची स्थापना केली. आजचा भारतीय जनता पक्ष हे या जनसंघाचंच अपत्य.

१६ ऑक्टोबर १९५१ रोजी लियाकत रावळपिंडी शहरात अलींची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्यांना लगेच पकडून ठार करण्यात आलं. त्यामुळे त्यांची हत्या नेमकी का करण्यात आली, यावरचा पडदा अजूनपर्यंत उठलेला नाही. काही लोकांच्या मते यात अमेरिकेचा हात होता तर काहींच्या मते धार्मिक कट्टरतावादी शक्तींनी त्यांची हत्या घडवून आणली होती.

लियाकत अलींच्या हत्येनंतर साधारणतः ६ महिन्यांच्या काळातच पाकिस्तानी जनरल अयुब खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने देशात सत्तापालट घडवून आणत देशाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यावेळी जी पाकिस्तानची सूत्रे लोकनियुक्त सरकारच्या हातातून सैन्याच्या हातात गेली ती आजतागायत त्यांच्याकडेच आहेच.

पाकिस्तानात निवडणुका होऊन पंतप्रधानपदी कुणाची तरी नियुक्ती होते, पण हे सगळेच नेते सैन्याच्या हातातले बाहुले असतात आणि ते सैन्याच्या इशाऱ्यावरच राज्यकारभार चालवतात. अप्रत्येक्षपणे सत्ता सैन्याच्याच हातात असते.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.