इंदिरा गांधींच्या काळात भारतातली पहिली मेट्रो धावली होती

सध्या देशभरात मेट्रोचं जाळं पसरत आहेत. आधी फक्त दिल्ली, मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरात असेलली मेट्रो आता छोट्या शहरांमध्येही तयार होतेय. वाहतूक कमी करून लोकांचा प्रवास सुखकर आणि  जलद व्हावा, या हेतूने मेट्रोचा विस्तार करण्यात येतोय. ज्यामुळे देशाच्या विकासातही हातभार लागतोय.

पण तुम्हाला माहितेय देशातली पहिली मेट्रो सर्व्हिस कधी सुरु झाली होती.

तर, केंद्र सरकारच्या संमतीने गजबजलेल्या कोलकाता शहरातील वाहतूक- व्यवस्थेच्या समस्यांवर मात करण्यासाठी १९७२ पासून ‘मेट्रो रेल्वे’ची योजना हाती घेतलेली होती. या योजनेचा पहिला टप्पा १९८४ मध्ये पुर्ण झाला आणि २४ ऑक्टोबर, १९८४ पासून देशातील पहिली भमिगत मेट्रो रेल्वे कोलकात्यातील एक्सप्लनेड -भवानीपूर या स्थानकांदरम्यान यशस्वीरीत्या धावू लागली.

खरं तर १९४७ नंतर अल्पावधीतच कोलकाता या महानगरातील वाहतूक- व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांवर विचार लगेचच सुरू झालेला होता. १९४९ मध्येच पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बी. सी. रॉय यांनी कोलकाता महानगराकरता भूमिगत रेल्वेची संकल्पना मांडली होती. त्यानुसार फ्रान्समधील तज्जञांच्या पथकाने सर्वेक्षणही केलं होतं, परंतु त्या वेळी ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती.

पुढे या महानगराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या यामुळे वाहतुकीवरील ताण वाढतच गेला. या समस्येवर उपाय योजण्यासाठी १९६९ मध्ये ‘महानगरी वाहतूक प्रकल्प (रेल्वे) स्थापन करण्यात आला. या प्रकल्पाद्वारे १९७१ मध्ये कोलकाता महानगरासाठी भूमिगत रेल्वेची योजना तयार करण्यात आली. त्यामध्ये कोलकात्याच्या उत्तर व दक्षिण भागांना जोडणाऱ्या दमदम ते टॉलीगंज या १६.४५ कि.मी. लांबीच्या मार्गाला प्राधान्य देण्यात आलं.

जून १९७२ मध्ये या योजनेला केंद्र सरकारची संमती मिळून २९ डिसेंबर, १९७२ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं.

भूमिगत लोहमार्गाच्या उभारणीचं काम प्रत्यक्षात १९७३ मध्ये सुरू करण्यात आल. परंतु, पुरेशा निधीचा अभाव, जमीनसंपादनातील अडचणी, तांत्रिक समस्या आदींमुळे ही योजना लांबत गेली.

सुमारे १२ वर्षांच्या काळानंतर २४ ऑक्टोबर, १९८४ रोजी एक्सप्लनेड ते भवानीपूर हा २.४० कि.मी.चा पहिला टप्पा पूर्ण होऊन या मार्गावर मेट्रो रेल्वे धावू लागली. पुढे २९ एप्रिल, १९८६ रोजी दहा किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला, तर उर्वरित सुमारे सात किलोमीटरचा टप्पा पूर्ण होण्यास
आणखी आठ वर्षं लागली.

अखेर २७ सप्टेंबर, १९९५ रोजी ही योजना पूर्ण होऊन संपूर्ण १६.४५ कि. मी. चा भूमिगत मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. आधुनिक सुविधांनी युक्त भूमिगत रेल्वे स्थानकं, मार्गावरून  धावणाऱ्या रेल्वेगाड्यांविषयी ताजी माहिती उपलब्ध करणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, आधुनिक बांधणीच्या आकर्षक व उच्च प्रवासी क्षमतेच्या अतिजलद रेल्वेगाड्या ही कोलकाता मेट्रोची वैशिष्ट्यं ठरली.

मेट्रो  व्यवस्थेमुळे कोलकाता महानगरातील भूपृष्ठीय वाहतुकीवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाला.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.