देशातला पहिला मोबाईल कॉल यांनी केला होता..

मोबाईलबद्दल चार शब्द लिहून, थोडीशी ग्रीप पकडून नंतर मुद्याला हात घालायला हवा असा विचार केला होता पण मोबाईलबद्दल काय लिहावं हा प्रश्न पडला. म्हणजे आत्ता तूम्ही हा लेख वाचत असाल तो पण मोबाईलमध्येच. घरात चार माणसं असली तरी दहा मोबाईल झालेत. थोडक्यात मोबाईल आत्ता चिल्लर गोष्ट झालेय.

अशा वेळी प्रश्न पडतो भारतात पहिल्यांदा मोबाईल वरुन कोण बोललं असेल. साहजिक पहिला फोन म्हणल्यानंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच बोलले असतील. आत्ताच्या सारखी राजकीय व्यवस्था त्या काळात असती तर पंतप्रधान आणि गृहमंत्री बोलले असते हे फिक्स आहे.

पण उत्तर शोधायला गेल्यानंतर वेगळीच नावे समोर आली.

भारतात पहिल्यांदा मोबाईल कॉल केला होता तो प.बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी. आणि हा कॉल करण्यात आला होता तो दूरसंचार मंत्री सुखराम यांना.

आत्ता ते फोनवरून काय बोलले होते हे सांगता येत नसलं तरी बाकीच्या डिटेल्स उपलब्ध आहेत. ज्योती बसूंनी हा फोन लावला होता. ज्योती बसूंनी मोबाईलवरून कॉल करण्यासाठी नोकिया २११० या मॉडेलचा उपयोग केलेला तर सेवा देणाऱ्या कंपनीचं नावं मोदी टेल्स्ट्रा होतं. (आलं बाबा मोदींच नाव आत्ता कसं बरंबरं वाटतय)

आत्ता या संपुर्ण ऐतिहासिक घटनेचा सारांश.

तर झालेलं अस की भारतात टेलिकॉम क्षेत्रात मोबाईल क्रांन्ती होणार होती. म्हणजे मोबाईल येणार हे फिक्स होतं पण ते नेमकं काय असतं हे कोणाला समजत नव्हतं. साल होतं १९९४ चं. नुकतच भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला असल्याने खाजगी क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या भारतात टेलिफोन सेवा देण्यासाठी इच्छुक होत्या. अशाच कंपनीपैकी एक कंपनी होती मोदी टेल्स्ट्रा. या कंपनीचे चेअरमन होते बी.के. मोदी. पं. बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू आणि बी.के.मोदी यांचे चांगले संबध होते. ते अनेकदा सहज गप्पा मारण्यासाठी भेटत असत.

१९९४ साली ज्योती बसू यांनी अशाच सहज गप्पा मारण्यासाठी बी.के.मोदींना कलकत्त्यातल्या रायटर्स बिल्डिंगच्या सचिवालयात बोलवलं होतं. नेहमीसारख्या गप्पा रंगल्यानंतर बी.के.मोदींनी ज्योती बसूंना एक ऑफर दिली. त्यांनी बसूंना सांगितलं की भारतातलं पहिलं मोबाईल नेटवर्क सिटी म्हणून आपण कोलकत्ता बनवू शकतो. बसूंनी ही ऑफर स्वीकारली. त्यानंतर मोदींनी हे मिशन मनावर घेतलं आणि त्यासाठी नोकियासोबत भागिदारी केली.

मोबाईलसेवा देण्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे १९९४ मध्ये आठ कंपन्यांनी अर्ज केले होते. मोदी टेल्स्ट्राचा देखील त्यामध्ये समावेश होता. हीच कंपनी नंतरच्या काळात स्पाईस टेलिकॉम या नावाने ओळखली गेली.

३१ जूलै १९९५

या दिवशी ज्योती बसूंना भेटण्यासाठी बी.के. मोदी गेले. मात्र यावेळी ते पुर्ण तयारीने आले होते. त्यांच्याकडे नोकियाचा २११० हा मोबाईल फोन होता. कोलकत्ता येथे त्यांच्या कंपनीने मोबाईल सेवा देण्याची तयारी पुर्ण केली होती. आत्ता फक्त पहिला फोन लावून सोपस्कार पुर्ण करण्याची गरज राहिली होती.

बी.के.मोदींनी आपल्याकडचा फोन बसू यांच्याकडे सुपूर्त केला आणि ज्योती बसूंनी पहिला फोन तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांना लावला. अशा प्रकारे देशात पहिल्यांदा मोबाईलवरून दोन व्यक्तींमध्ये संभाषण पुर्ण झाले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.