राजकारणात करियर करु इच्छिणाऱ्या मुलांसाठी डॉ. बाबासाहेबांनी ट्रेनिंग स्कुल सुरू केलं होतं

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहताना एक वेगळंच कन्फ्यूजन असतंय. आंबेडकरांच्या पुढं नेमकं कोणतं विशेषण लावायचं. एक विद्वान, एक समाजसुधारक, राज्यघटनेचे शिल्पकार, एक राजकारणी, एक धार्मिक विचारवंत आणि अजून कितीतरी. आंबेडकरांनी असं एक क्षेत्र सोडलं नसेल ज्यामध्ये त्यांनी योगदान दिलं नसेल.

आणि असंच क्षेत्र होतं राजकारणाचं. राजकारण हे लोकसेवेचं माध्यम असल्यानं चांगल्या लोकांनी राजकारणात यावं यासाठी आंबेडकर नेहमीच आग्रही असायचे. त्यातूनच त्यांनी आयडिया आणली होती राजकारण्यांसाठीच्या ट्रेनिंग स्कुलची.

जुलै १९५६ मध्ये मुंबईत प्रशिक्षण शाळेची स्थापना करण्यात आली होती.

 ‘राजकारणात प्रवेशासाठी प्रशिक्षण शाळा’

(‘Training School for Entrance to Politics’)

असं या शाळेचं नाव ठेवण्यात आलं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेचे संचालक होते आणि त्यांचे निकटचे सहकारी एस.एस.रेगे हे शाळेचे कुलसचिव होते.

हे असं ट्रेंनिंग स्कुल चालू कारण्यामागं आंबेडकरांनी बराच डीप विचार केल्याचं दिसून येतं.

एकतर त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्यात ही शाळा चालू केली होती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी या आधी वेग -वेगळ्या शैक्षणिक संस्था काढल्या असतानाही त्या संस्थांअंतर्गत ही शाळा चालू न करता एक सेपरेट इन्स्टिटयूट म्हणून ही शाळा चालू केली होती. बहुतेक आंबेडकरांनी भारताच्या शिक्षणव्यवस्थेचं चांगले लीडर तयार करण्यात आलेलं अपयश ओळखलं होतं.

या स्कुलमागील प्रमुख उद्देश होता विचारांची योग्य बैठक असेलेले पुढारी तयार करणे.

त्यामुळं या स्कुलमध्ये निवडणुका कशा जिंकायच्या, व्होट बँक कशी तयार करायची असलं काय शिकवलं जात नव्हतं. तर त्याऐवजी त्यांना सामाजिक शास्त्राच्या विविध विषयांचे प्रशिक्षण  द्यायचे होते

त्यांना संसदीय कार्यपद्धती माहित असलेले आणि वर्तनाने सज्जन असलेले  पुढारी  करायचे होते. भविष्यातील राजकीय नेत्यांनमध्ये गौतम बुद्धांचा दृष्टीकोन बिंबवून त्यांना प्रशिक्षण देणे हा ही शाळेचा एक अत्यंत महत्त्वाचा उद्देश होता.

त्याचबरोबर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या RPI पक्षात एंट्री करण्यासाठी आंबेडकरांनी या शाळेतून प्रशिक्षण घेण्याची अट देखील घातल्याचं सांगण्यात येतं.

असे विधायक विचार पुढे ठेऊन चालू झालेली हि शाळा भारतातील राजकारणात प्रवेशासाठी पहिली प्रशिक्षण शाळा  होती. शाळेच्या पहिल्या तुकडीत १५ विद्यार्थी होते.

दुर्दैवाने, त्याची पहिली बॅच शेवटची बॅच ठरली कारण १९५६ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर शाळा बंद करण्यात आली होती. 

शाळा केवळ आठ महिने सुरू होती. डॉ. आंबेडकर शाळेसाठी चांगल्या मुख्याध्यापकाच्या शोधात होते. डॉ. आंबेडकर १० डिसेंबर १९५६ रोजी वक्तृत्व कौशल्यावरील प्रशिक्षणार्थींना संबोधित करणार होते, परंतु त्यापूर्वी चार दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले.

काही तज्ज्ञांच्या मते आंबेडकरांच्या  शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या या अहवानाला धरूनच या शाळेचं महत्व होतं. कारण या शाळेत शिकून संघर्षासाठी संघटित झालेल्या बहुजन समाजाला चांगलं नेतृत्व देण्याची क्षमता होती.

मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आंबेडकरांच्या बाकीच्या अनेक विचारांसारखा हा ही विचार मागे पडला आणि राजकारणात त्यांच्या विचारांपेक्षा त्यांचं नावंच वापरलं गेलं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.