भारताचा पहिला गली बॉय रॅपर.

बालपणीचा तो काळ सुखाचा असं कोणी तरी म्हटलय. आम्हा नाईनटीज किड्स साठी तो काळ आई बापाच्या मास्तरांचा मार खाण्यात गेला. पण दोस्तानो आपण कधी नाराज झालो नाही. जागतिकीकरणाची फळ अजून कच्ची होती तेव्हा त्यांचा प्रयोग आमच्यावर होत होता.

आज काय टिकटॉकचा जमाना आहे. घरटी एक युट्यूबर आहे. कोणी बीबीके वाईन बनवतय तर कोण आईच्या हातची रसोई खाऊ घालतय. या जिओ और जिने दोच्या जमान्यात अजून एक पीक आलंय. रॅपर.

हां हां तेच ते रणवीर सिंग गल्ली बॉय बनून करतोय ते. “मेरी गाडी मेरे जुतेमेरी दारू मेरी छोकरी”

आमच्या काळात असं काही नव्हत हो. म्हणजे आम्हाला छायागीत चित्रहार रंगोली आकाशवाणी आणि लग्नात गणपतीमध्ये टेपवर वाजवली जाणारी गाणी एवढंच आमच सांगीतिक विश्व होत.

जागतिकीकरणामूळ हळूच केबल नावाची गोष्ट आली. झी,सोनी या एन्टरटेमेंट चॅनल बरोबर एम टीव्ही व्ही टीव्ही आणि एटीएन अशी म्युझिक चनल आले. त्याच्याबरोबर पॉपसंगीताने हळूच आमच्या घरात शिरकाव केला. घरच्यांना रागावण्यासाठी नवीन कारण मिळाले. “बंद करा तो धांगडधिंगा”

आणि एक दिवस तो आला. भारतातला पहिला रॅपर बाबा सहगल.

आईशप्पत सांगतो रॅप म्हणजे काय आम्हाला तेव्हा ठावूक नव्हत. पण बीटला धरून बाबा काही तरी गद्य गाण्याच्या मध्ये मध्ये डुलत डुलत फास्ट न कळणाऱ्या शब्दात काही तरी म्हणायचा, खूप वर्षांनी त्याला रॅप म्हणतात हे कळाल.

बाबा सेहगल म्हणजेच महान गायक के.एल.सेहगल यांचा नातू अशी थाप आम्हाला आमच्या मोठ्या भावाने मारली होती. आईशप्पत तेव्हा के एल सेहगल पण माहित नव्हता.

बाबा सेहगल म्हणजे खरा हरजीतसिंग सेहगल. जन्मला आणि वाढला लखनौमध्ये. तिथे त्याने इलेक्ट्रिक इंजिनियरिंगची डिग्री घेतली. आपल्या प्रोफेशन मध्ये खुश नसणाऱ्या आजच्या समस्त इंजिनियर्स पिढीचा हा आद्य गुरु रॅपर कसा बनला हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल.

झालं असं तर तेव्हा हरजित सेहगलला लहनपणी कोणीतरी तू किशोरकुमार सारखा गातोस असं सांगितलं होत. बाबाला तेव्हा किशोर कुमार आवडायला सुरु झाला.

किशोर कुमार व्हायचं म्हणून तो मुंबईला आला. इथं उन्हातान्हात स्टुडिओचे चक्कर काधून काढून फाटली. दोन फ्लॉप म्युजिक अल्बमनंतर लक्षात आलं की इथ हजारो किशोर कुमार रफी आपल्यापेक्षा जास्त वर्ष स्ट्रगल करत आहेत. या गावात सर्वाइव्ह करायचं झालं तर काही तरी वेगळं केलं पाहिजे.

अशाच एका स्ट्रगलींगच्या दौऱ्यामध्ये त्याला एमटीव्ही स्टुडीओमध्ये इंग्लिश रॅप ऐकायला मिळालं. नव्याने सुरु झालेल्या एम टीव्हीवाल्यांना वेस्टर्न म्युझिक आणून आपली छाप पडायची होती. ते भारतात रॅप करू शकेल अशा सिंगरच्या शोधात होते. बाबाने तेव्हा चान्स मारला. त्याची शिकायची तयारी होती. स्वतःचं नाव कमवायचं होत.

एम टीव्हीकडून त्याने अनेक रेकॉर्डस नेले. एकलव्यासारख शिकला आणि बनवला भारतातलं पहिलं रॅपसॉंग. व्हॅनिलाच्या “Ice Ice baby” या गाण्यावरून बनलेलं “ठंडा ठंडा पानी”.

यात बाबाने रॅप केलेला,

“मै फाइव्ह स्टार हॉटेल में पहिली बार गया. उधर देखा मैने पानीसे भरा स्विमिंग पूल”

गाण ऐकून एम टीव्ही वाल्यांनी त्याच्या पुढे हात जोडला की बाबा पुरे आता.

बाबा सेहगलकडे एक गुण आहे. कोणी काहीही म्हणो आपली चिकाटी सोडायची नाही. त्याने एमटीव्हीच्या मागे लागून “ठंडा ठंडा पानी” रिलीज केला. काय जादू झाली कुणास ठाऊक अल्बम सुपरहिट झाला. त्याकाळात १० लाख कॅसेट विकण्याचा विक्रम बाबा सेहगलने केला.

एमटीव्ही बरोबर अख्खा देश चाट पडला. काहीही नॉनसेन्स लिरिक्स घालून गाण्याच्या मध्ये मध्ये बडबडणे म्हणजे रॅप भारताला धडा शिकायला मिळाला.

बाबा सेहगल की तो निकल पडी. याच अल्बम मध्ये आणखी एक गाण होत “दिल धडके”. यात बाबा स्वतः आफ्रिकन रॅपरसारखा कंबर हलवत होता. हां त्याच्या डोक्यावर केस होते. अंगावरच्या शर्टची बटने मोकळी आणि समोर फॅनच्या वाऱ्यात ड्रेस उडणारी सेक्सी पूजा बेदी. एम टीव्हीवर झळकलेल हे पहिलं हिंदी अल्बम सॉंग मानलं जात.

थंडा थंडा पानी नंतर दुसरा प्रसिद्ध अल्बम मै भी मडोना. बाबा सेहगल पासूनच अल्बमचे व्हिडीओ साँग करण्याची पद्धत सुरू झाली. बाबा सेहगल ला पिक्चरच्या ऑफर आल्या. सुपरहिट मुकाबला नावाची डीडी मेट्रोवरची सिरीयल मिळाली.

मिस ४२० नावाचा भयानक पिक्चर आला. त्यात बाबा सेहगल हिरो होता. पिक्चर सुपरफ्लॉप झाला पण एक गाण चाललं. “आजा मेरी गाडी मै बैठ जा” बाबाची पुन्हा हवा झाली. भारताचा हा पॉप स्टार परदेशातही हवा करण्यासाठी प्रयत्न करू लागला. 

पण आलाच इथंपण. २०००साल उजाडल. रिमिक्स चा जमाना. कांटा लगा वगैरे च्या लाटेत बाबा सहेगल उडून गेला. रॅपरचं करीयर लॉंग टर्म असत नाही या खास अमेरिकन संकल्पनेला भारतीय रॅपर खरा उतरला. त्यानंतर गोल टकलू बाबा सेहगल गायबच झाला.

बाबा सेहगलला लोक विसरले पण बाबा लोकांना विसरला नाही. बिग बॉस वगैरे मधून परत येण्याचा प्रयत्न करत राहिला. नव्या पिढीचे यो यो हनी सिंग, रफ्तार यांच्या स्पीडला पकडणे पन्नाशीच्या बाबा सेहगलला अशक्य होते. त्याच्या गाण्यात योयो सारखी अश्लीलता नव्हती पण त्याच्या गाण्यात रॅपची चमक नव्हती. 

आजसुद्धा बाबा नव्या पिढीशी जुळवून घ्यायला बघत आहे. तो युट्युबवर असतो, तो ट्वीटरवर असतो. तो मोदिजींच्या जीएसटीवर रॅप करतो,चिकन फ्राइड राइस,आलू पराठापासून ट्रम्प का मॅनिया पर्यंत कित्येक रॅप करतो. पण “आजा मेरी गाडी मै बैठ जा” ची गंमत त्यात नाही. नाईनटीजची पिढी मोठी झालीय, त्याच्या नॉनसेन्स रॅपला भुलत नाही आहे.

त्याला रोज त्याच्या ट्वीटवरून खुळ्यात काढलं जात. पण बाबा एक दिवस “अपना टाईम आयेगा” हे सांगत येईल असच मनातून वाटत राहत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.